विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मांचूरिया- चीनचें साम्राज्य. हा प्रांत चिहलीप्रांत व अमुरनदी यांच्यामध्यें आहे. क्षेत्रफळ सुमारें ३६३६१० चौ. मैं असून लोकसंख्या सुमारें दोन कोटी असावी. शेंगकिंग (राजधानी मुकडेन), किरिन (राजधानी किरिन), आणि हीलुंग चिआंग (राजधानी सितसिहर) हे मांचुरियाचे तीन विभाग पाडलेले आहेत. चीनमधील विभागांप्रमाणेंच या विभागांचा राज्यकारभार चालतो. वरचे गव्हर्नर चिनी सरकार नेमितें. मांचूरियांतील मुडेन (राजधानी), न्यूच्वंग, अन्तुंग, ततुंग-कौ, तीहलिंग, तुंगचिआंगझु व फकुमेन हीं शहरें व्यापारास सर्वांनां खुलीं आहेत.
आज मांचूरियांत मांचू लोकवस्ती नसून त्यांच्या कांहीं थोडया जाती इकडे तिकडे आढळतात. चीनच्या उत्तर-प्रांतांतून लोक पाठवून त्यांची मांचूरियांत वसाहत करण्याची चीन सरकारची खटपट चालू आहे. 'सोया-बीन' धंद्याच्या वाढीमुळें व रेल्वेच्या सोयीमुळें चीनमधील दुसऱ्या कोणत्याहि प्रांतापेक्षां मांचूरिया फार झपाटयानें समृद्ध झाला. हा प्रदेश मूळचा शेतकीप्रधान असून जमीन अतिशय सुपीक आहे. १९२१ सालीं २२७४४५०५ एकर जमीन लागवडीखालीं होती. वाटाणे, बाजरी, गहूं, व तांदूळ हीं मुख्य पिकें होत. गव्हाचें पीक फार फायद्याचें असतें. पूर्वी गहूं बाहेर पाठवीत पण हलीं पिठाच्या गिरण्या निघाल्यानें बऱ्याचशा गव्हाचें येथेंच पीठ करण्यांत येतें. मांचूरियांत जंगलहि बरेंच आहे. कोळसा, लोखंड, सोनें, रुपें, शिसें व अस्बेस्टस हीं खनिजें काढण्यांत येतात.
१९०५ च्या रूसो-जपानी तहानें दक्षिण मांचूरिया रेल्वे जपानकडे आली. या रेल्वेची लांबी ६९३ मैल आहे. १९१७ त कोरियांतील सर्व रेल्वे या रेल्वेच्या देखरेखांखालीं आली त्यामुळें फुसन या कोरियन बंदरापासून पेट्रोग्राडपर्यंत आगगाडी झाली आहे. साउथ मांचूरिया रेल्वेखेरीज मांचूरियांत चायनीज ईस्टर्न रेल्वे आणि चायनीज गव्हर्नमेंट रेल्वे या रेल्वे आहेत.
इ ति हा स.- मांचू हें लोकांचें नांव असून ते रहाणाऱ्या प्रदेशाला मांचूरिया म्हणूं लागले. हें नांव १३ व्या शतकाच्या आरंभी उदयास आलेल्या एका राजानें धारण केलें. त्यापूर्वी मांचू लोक निरनिराळया पोटजातींतून विखुरले असून त्यांवर राज्य करणाऱ्या घराण्यांचीं नांवें ते आपणाला लावून घेत. १० व्या शतकांतच प्रथम खितान या नांवानें मांचू लोक प्रसिध्दीस आले. या खितानांनीं पोदाई राज्य जिंकून चीनमध्यें प्रवेश केला व चीन साम्राज्याच्या उत्तर भागांत लिआओ (लोह) घराणें स्थापन केलें. पण पुढे दोन शतकांनीं त्यांनां दुसऱ्या एका मांचुरियांतील नुचिह नांवाच्या लोकांनीं पराभूत केलें व 'किन' (सुवर्ण) घराणें स्थापिलें. यानंतर एक शतकानें मंगोल लोकांनीं नुचिहांनां चिनांतून हांकलून लाविलें पण या घराण्याच्या अंतकाळीं ऐसिन गिओरो नांवाची दंतकथात्मक (खरी वा खोटी) व्यक्ति पुढें येऊन तिनें वरील तिन्ही जातींवर आपलें वर्चस्व स्थापिलें. या गिओरोविषयीं एवढीच माहिती आहे कीं त्यानें आपल्या प्रजेला 'मांचू' (पवित्र) हें नांव दिलें. नुऱ्हाचु नांवाच्या गिआरोच्या एका वंशजानें मोठा पराक्रम करून सबंध मांचूरियावर आधिपत्य मिळविलें (१६०४). पुढें चीनवर मांचू घराणें अधिष्ठित झालें. यासंबंधीचा इतिहास 'बुध्देत्तर जग' विभागांत (पृ. ४८०) व 'चीन' या लेखांत पहा.
१९ व्या शतकाच्या अखेरीच मांचुरियावर रशिया आपला हक्क सांगू लागला व १९०० सालीं त्याचा बराचसा भाग रशियन सैन्यानें व्यापला. यामुळं रूसो-जपानी युद्धला सुरुवात झाली. या युध्दांत रशियाचा पराभव होऊन जपाननें मांचूरिया चीनच्या हवालीं केला. यापुढें जपानचा मांचूरियाशीं हितसंबंध कशा प्रकारचा राहिला हें 'जपान' लेखांत (ज, पृ. ७७) सांपडेल.
चीनच्या मध्यवर्ती सरकारामध्यें बेदिली माजल्यामुळें व रशियन सरकारच्या १९१७ सालीं पाडाव झाल्यामुळें मांचूरियामध्यें जपानचें आर्थिक व राजकीय वर्चस्व प्रस्थापित होणें सुलभ झालें. अमेरिकेच्या प्रयत्नानें व ब्रिटिश व जपान सरकारमधील वाटाघाटीमुळें मांचूरियावर जें जपाननें वर्चस्व प्रस्थापित केलें होतें व मांचूरियामध्यें आपले हितसंबध दृढ करण्याचें धोरण ठेवलें होतें त्या बाबतींत अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड व चीन यांनां जपाननें कांहीं सवलती देऊं केल्या पण त्याच वेळीं आपल्या हितसंबंधाला कोणताहि धक्का लागतां कामा नये अशी अट घालून ठेवली. या जपानच्या धोरणासंबंधीं १९२१ सालीं वॉशिंग्टन-परिषदेमध्यें पुन्हां प्रश्र्न उपस्थित होऊन त्यावर बरीच चर्चा झाली. जपानच्या व्यापारी धाडसामुळे मांचूरियाची सांपत्तिक परिस्थिति बरीच सुधारली. मांचूरियामधील खाणीं खणण्यांत आल्या; शेतकी, व जंगल या बाबतींत पुष्कळ सुधारणा झाली. चीनमधील राज्यक्रांतीनंतर मांचूरियाचा राज्यकारभार ट्शून (लष्करी गव्हर्नर) व शेंगचंग (सिव्हिल गव्हर्नर) या जोडीच्या देखरेखीखालीं देण्यांत आला. पण १९१८ सालापासून मुकडेन व अमूर हे दोन प्रांत एकाच गव्हर्नराच्या देखरेखीखालीं सोंपविण्यांत आले. १९२० सालीं मुकडेनचा ट्शून शंगत्सोलीन हा चीनमधील राजकारणांत प्रमुख असून त्यानें चीनवर सुलतानशाही गाजविण्यास सुरवात केली होती.