विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मांग- महाराष्ट्रांतील एक अस्पृश्य जात. दक्षिण, कर्नाटक, वऱ्हाड, नागपूर, गुजराथ इत्यादि भागात यांची बस्ती आढळते. यांची लोकसंख्या सुमारें ७ लाख आहे. आपला मूळ पुरुष यम ॠषि होय असें मांगांचें म्हणणें आहे. मातंग या शब्दापासून मांग हा शब्द आला असावा. यांच्या स्थलपरत्वें दखने, खानदेशी, वऱ्हाडे, घोडके इत्यादि पोटजाती आहेत. याशिवाय डफळे, उचले, पिंढारी, होलर, गारोडी, ककरकाढे इत्यादि अनेक उपजाती आहेत. यांच्यामध्यें भिसे, चव्हाण, जाधव, जगताप इत्यादि आडनांवें आढळतात. यांचें व महारांचें नेहमी भांडण असतें. हे देवी, सरस्वती, मरीआई, महादेव, खंडोबा इत्यादि देवतांची पूजा करतात. कुत्रा, मांजर, गाढव, यांचें मांस हे खात नाहींत. यांचे बहुतेक सर्व संस्कार हिंदूंप्रमाणेंच आहेत. गुरें खच्ची करणें, दोरखंड वळणें, संदल, चाबूक तोबरे इत्यादि चामडयाची कामें मांग करतात. वाजंत्री वाजविणें, भंग्याचीं कामें करणें, शेतकी इत्यादीहि धंदे हे करतात. यांनां चेटुकविद्या अवगत असते असा समज आहे. गुजराथमध्यें मांगेला नांवाची एक मांगाची पोटजात आहे. ती जात मांगांत अगदीं कनिष्ठ समजली जाते. ठाणें जिल्ह्यांतहि ही जात आढळते, तिचा मासे धरण्याचा मुख्य धंदा आहे. गारुडी मांगांची जात गुन्हेगार जातीमध्यें मोडते. यांच्यांतील बायका व पुरुष चोरी करण्यांत पटाइत असतात. यांच्यात शिक्षणाचें मान अद्यापिहि फारच कमी आहे. ('अस्पृश्यता' पहा.)