विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महेश्वर– मध्यहिंस्थान, इंदूर संस्थान. नेमाड प्रांतांत नर्मदा नदीच्या काठीं हें गांव वसलेलें आहे. लोकसंख्या (१९०१) ७०४२. येथें पुष्कळ देवळें आहेत. येथील घाट व अहिल्याबाईचा राजवाडा हीं प्रेक्षणीय आहेत. महेश्वरास प्राचनी काळीं महिष्मती असें म्हणत असत. कारण येथें रेडे पुष्कळ होते व आहेत. रामायणांत व महाभारतांत याचा उल्लेख केलेला आढळतो. बौद्ध वाङ्मययांत हें नांव आढळतें. (राजवाडे-ज्ञानेश्वरी प्रस्तावना; रा. रा. भागवत-वि-विस्तार पृ. २२, पृ १००)
या गांवी फार प्राचीन काळीं कार्तवीर्यार्जुन रहात होता अशी लोकांची समजुत आहे. कर्तवीर्यार्जुनाचे वंशज हैहय या नांवानें प्रसिद्ध होते. यांच्या ताब्यांत मध्यहिंदुस्थानाचा पूर्व भाग तीनशें वर्षें (९-१२ व्या शतकापर्यंत) होता. त्यावेळीं ही नगरी त्यांच्या राज्यांत होती. हैहयांचा चालुक्यवंशीय विनयादित्यांनीं पराभव केल्यावर हें गांव विनयादित्यांच्या ताब्यांत गेलें; पण त्यांनीं हैहयांनां तेथून हांकलून न देतां आपले मांडलिक म्हणून त्यांनां तसेंच राहूं दिलें. यापुढें गावास उतरती कळा लागली. मुसुलमानांच्या वेळेस तर याचें महत्त्व फारच कमी झाले. १४२२ सालीं हें गुजराथच्या पहिल्या अहंमदानें माळव्याच्या राजापासून घेतलें. अकबराच्या काळीं हें गांव चोली मंडलेश्वरमहालाचें मुख्य ठिकाण होतें. स. १७३० त तें मल्हारराव होळकरानें घेतलें. अहिल्याबाईच्या कारकीर्दीत महेश्वर येथें होळकराची राजधानी होती. त्यावेळीं याचें महत्त्व फार वाढलें होतें. इंदुरास राजधानी नेल्यापासून याच्या उतरत्या कळेस पुन्हां सुरवात झाली. येथं अहिल्याबाईंचा मोठा पुतळा आहे. यशवंतरावाच्या भावाची छत्री बघण्यासारखी आहे. येथें लुगडीं फार चांगली होतात. याबद्दल हें गांव महाराष्ट्रीय स्त्रियांत प्रसिद्ध आहे.
महेश्वर- प्रसिद्ध ज्योतिषी. सिध्दंतशिरोमणिकार भास्कराचार्य याचा पिता. याचा जन्म शके १००० च्या सुमारास असावा आणि याचे ग्रंथ १०३०।४० च्या सुमाराचे असावे. शेखर नांवाचा करणग्रंथ, लघुजातकटीका, प्रतिष्ठाविधिदीपक व वृत्तशत असे याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.