विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महावंसो (संस्कृत महावंश)- पाली भाषेंतील एक प्रसिद्ध प्राचीन महाकाव्य. हें पांचव्या शतकाच्या चतुर्थ पदांत असेल्या महानाम नामक हा कवीनें लिहिलें. या महाकाव्यांत, ख्रि. पू. पांचव्या शतकापासून तो ख्रिस्तोत्तर पांचव्या शतकापर्यंतच्या सीलोनच्या इतिहासाची हकीकत आली आहे. प्रथमतः गौतमबुद्धची हकीकत दिल्यानंतर सीलोनमधील इतिहास देऊन गौतमबुद्धनें सीलोनला भेट देऊन तेथें आपल्या धर्माची ध्वजा कशी उभारली या संबंधीचें विवेचन केलें आहे. नंतर गौतमानें आपला धर्म स्थापन केल्यापासून तो बौद्धधर्माचा ५ व्या शतकापर्यंतचा इतिहास व त्यांतल्यात्यांत धर्मसंस्थांचें वर्णन आलेलें आहे. अशोक राजाच्या चरित्रानें यांत बराच भाग व्यापिला आहे. अशोकाच्या कारकर्दीत, महिंदाला सीलोनमध्यें पाठविण्यांत आल्यानंतर पुढच्या भागांत केवळ सीलोनसंबंधीचा इतिहास यांत आढळतो. भरतखंडांतील एका राजकन्येला सिंहापासून सिंहबाहू व शिवाली अशीं दोन मुलें झालीं. पुढें एका भावाबहिणींच्या समागमापासून विजय नांवाचा राजा उत्पन्न झाला. याच्यापासून सीलोनच्या राजवंशाला सुरुवात झाली. याच्या वंशातील देवानां पियतिस्स हा अशोकाच्या वेळीं सीलोनवर राज्य करीत होता व त्याच्या कारकीर्दीत महिंदानें बौद्धधर्म सीलोनमध्यें पसरविला; व संघमितानामक महिंदाच्या भगिनीनें सीलोनमध्यें बोधिवृक्षाची शाखा लाविली. यासंबंधीचें विस्तृत वर्णन महावंशामध्यें केलेलें आढळतें, त्यानंतर सीलोनच्या इतर राजांमध्यें ग्ट्ट-गामिनी व महासेन राजांचें विस्तृत वर्णन आलें आहे. महासेनाच्या मरणापर्यंतचेंच या काव्यांत कथानक आलें आहे. दीपवंश (पहा) व महावंश या ग्रंथांतील कथानक बहुतेक सारखेंच आहे, पण दीपवंशापेक्षां तीच हकीकत महावंशामध्यें नवीन नवीन माहिती घालून अधिक विस्तारानें देण्यांत आली आहे. महावंशाची ऐतिहासिक दृष्टया फारशी किंमत नाहीं. हा ग्रंथ काव्यपर आहे असे ग्रंथकत्यानें स्वतःच आपल्या प्रस्तावनेंत म्हटलें आहे. तथापि या काव्यग्रंथामुळें तत्कालीन इतिहासासंबंधीं बरीच माहिती मिळते. काव्यदृष्टया मात्र महावंशाची योग्यता निःसंशय मोठी आहे. यांतील कांहीं भाग जगांतील कोठल्याहि भाषेंतील सुंदर भागांच्या तोडीचे आहेत. यांतील भाषा सुंदर असून वृत्तरचनेंतहि कवीचें चातुर्य दिसून येतें. महावंशातील कथानक हें तत्पूर्वीच्या सिंहली भाषेंतील इतर कथानकांवरून व विशेषतः प्राचीन उपलब्ध असलेल्या महावंश नामक एका ग्रंथाच्या आधारावरून रचिलेलें आहे असें दिसतें. या महावंशाची मागाहून सुधारून वाढलेली आवृत्तिहि उपलब्ध आहे. मूळ महावंशांत २९१५ श्लोक तर या नवीन आज्ञावृतींत ५७९१ श्र्लोक आढळतात. महावंशावर महावंश-टीका नांवाची एक टीका प्रसिद्ध आहे.