विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महाकाव्य- संस्कृत साहित्यशास्त्रकारांनीं महाकाव्याचें लक्षण सविस्तरपणें दिलें आहे. साहित्यदर्पणकार म्हणतो; सर्गबंधो महाकाव्य तत्रैको नायकः सुरः। सद्वंश:क्षत्रियोवापि धीरोदात्तगुणान्वितः। ... ... इतिहासोद्भवं वृत्तमन्यद्वा सज्जनाश्रयं। ... ... अस्मिन्नार्षे पुनः सर्गा भवन्त्याख्यानसंज्ञक:। इत्यादि )सा. द. ६.३१५-३२८). या वाख्येप्रमाणें रघुवंश, कुमारसंभव, किरातार्जुनीय, शिशुपालवध आणि नैषधचरित हीं पंचमहाकाव्यें म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण व महाभारत यांनां आर्ष (ॠषिप्रणीत) महाकाव्यें म्हणतात. वास्तविक गंभीर स्वरूपाचें महाकाव्य म्हणजे फार मोठें काव्य अशा अर्थानें जगांतील ईलियड, ओडेसी, निवेलुंगेनलाइ वगैरें महाव्यें लक्षांत घेतां संस्कृत वाङ्मयांत महाभारत व रामायण हीं दोनच महाकाव्यें असून मराठींत तर महाकाव्य अद्याप निर्माण झालेलें नाहीं असें म्हणावें लागतें; आणि रघुवंशादि पांच काव्यें केवळ लघुकाव्यें ठरतात. महाकाव्य याला इंग्रजी शब्द 'एपिक' असून त्यांत एपोंस म्हणजे गोष्ट असा धात्वर्थ आहे. म्हणजे अत्यंत उदात्त व विस्तृत असें कथात्मक (पौराणिक व ऐतिहासिक वृत्तपर) काव्य अशी याची व्याख्या करतात. यूरोपांतील सर्वांत जुनीं महाकाव्यें ग्रीक कवि होमर (ख्रिस्तपूर्व ९०० च्या सुमारास) याचीं ईलियड व ओडेसी हीं होत. त्यानंतर ग्रीक कवींनीं महाकाव्यें लिहिण्याचा प्रयत्न केला, त्यांत ऱ्होडसच्या पीसांडर कवीचें 'हेराक्लिआ, ' कोलोफोनच्या अँटिमेकसचें 'थेबैस' वगैरे महाकाव्यें आहेत. 'ओडेसी' या ग्रीक महाकाव्याचें लॅटिन भाषेंत भाषांतर झाल्यावर रोमन कवीचें लक्ष महाकाव्यें रचण्याकडे ओढलें गेलें. व्हर्जिल कवीचें ख्रिस्तपूर्व ३० च्या सुमारास लिहिलेलें 'एनीयड' हें सर्वांत उत्तम लॅटिन महाकाव्य आहे. त्याशिवाय ल्यूकनकविकृत 'फार्सालिया, ' स्टेशियसकृत 'थेबाइड,' क्लॉडियनकृत (इ. स. ४०० च्या सुमारास) 'रेप ऑफ प्रॉसर्पोइन' वगैरे लॅटिन महाकाव्यें प्रसिद्ध आहेत. यूरोपच्या मध्ययुगांतील महाकाव्यांचे (इ. स. ५०० ते १४००) टयूटॉनिक (इंग्रजी व जर्मन), आईस्लँडिक व फ्रेंच असे तीन प्रकार असून बेऑवुल्फ, वॉल्डेयर, दि ले ऑफ माल्डॉन व फिनेसबर्ह हीं इंग्रजी महाकाव्यें; हिल्डे ब्रँड व निबेलुंगेनलाइड हीं जर्मन महाकाव्यें (इ. स. ८०० चा सुमार); सागा (ॲटलमाल, दि एल्डर एड्डा वगैरे) हें आइस्लँडिक महाकाव्य; आणि रोलंड, व चॅसन्स डी जेस्टे ही फ्रेंच महाकाव्यें प्रसिद्ध आहेत. नंतर अर्वाचीन काळांत इटलीमध्यें डांटेकृत 'डीव्हाईन कॉमेडी, ' टी. टॅसोकृत 'जेरुशलेम डिलिव्हर्ड' (दि काँक्वेस्ट ऑफ जेरुशलेम); पोर्तुगीज वाङ्मयांत ब्रँडाओकृत 'एलेगायडा, ' क्वेव्हेडोकृत 'आल्फॉन्सो ऑफ आकिा, ' मेनेझेसकृत 'कॉन्क्वेस्ट ऑफ मलाका, ' आणि कॅमोएन्सकृत 'लुसिअड्स; ' स्पेनमध्यें 'पोएम ऑफ दि सीड,' 'रॉड्रिगो, ' 'कॉन्क्वेस्ट ऑफ बेटिका, ' 'टीअर्स ऑफ अँजेलिका, ' 'अरौकाना, ' आणि इंग्लंडमध्यें स्पेन्सरकृत 'दि फेअरी क्वीन, ' मिल्टनकृत 'पॅराडाइस लॉस्ट, ' टेनिसकृत 'आयडिअल्स ऑफ किंग ऑर्थर' वगैरे महाकाव्यें झालीं आहेत. फ्रान्समध्यें महाकाव्य म्हणण्यासारखें एकहि झालें नाहीं.
महाकाव्याचा उदय समाजाच्या एका विशिष्ट परिस्थितींत होत असून जगाच्या इतिहासाकडे पाहिल्यास सदरहू परिस्थित पुन्हां पुन्हां प्राप्त होत असते असें दिसून येतें. बहुतेक राष्ट्रें समान सामाजिक प्रक्रियेंतून गेलेलीं आढळतात; ती प्रक्रिया म्हणजे निरनिराळया मानववंशाचे लोक एकत्र येणें आणि ते पूर्णपणें एकजीव होऊन एक राष्ट्र बनण्यापूर्वी त्या मिश्र समाजांत मोठी खळबळ उडून जाणें हीं होय. हा जो खळबळीचा काळ त्याला साधारणतः ''शौर्याचें युग'' (हीरॉइक एज) असें नांव देण्यांचा परिपाठ पडला आहे. हा काळ अत्यंत खळबळीचा व मानवी पराक्रमाच्या दृष्टीनें अत्यंत तेजस्वी असतो. या काळापूर्वीचा जो रानटीपणाच्या आयुष्याचा (सॅव्हेजरी) काळ त्यांत विचार, भावना, धर्म व सामाजिक व्यवस्था हीं सर्व 'सामुदायिक' स्वरूपाच्या पायावर उभारलेलीं असतात, कारण रानटी समाजांत पृथक्करणाची क्रिया अज्ञान असल्यामुळें 'वैय्यक्तिक' (इंडिव्हिजुॲलिटी) पणाची कल्पना उत्पन्न झालेली नसते. रानटी माणसाचें सर्व जीवित त्याच्या टोळीकरितां असतें. पुढें अशी टोळी स्थलांतर करून दुसरीकडे जाते. तेव्हां दुसऱ्या ठिकाणच्या टोळीशीं संबंध येतो; किंवा एका ठिकाणच्या टोळीवर परक्या ठिकाणची टोळी येऊन हल्ला करते. अशा रीतीनें दोन टोळया एकत्र येतांच वैयक्तिक शौर्याचे विविध प्रकार दृष्टीस पडूं लागतात. आणि त्या मिश्र समाजांत मोठी खळबळ उडून जाते. अशा प्रकारचें ''शौर्याचें युग'' होमरपूर्वी, तसेंच 'निंबेलुंगेनलाइड,' 'बेओवूल्फ, ' व उत्तरेकडील 'सागा' हीं महाकाव्यें लिहिलीं जाण्यापूर्वी त्या त्या समाजांत प्राप्त झालें होतें. सदरहू प्रकारचें युग यूरोपांत प्राचीन कालांप्रमाणें अर्वाचीन काळांतहि उगवलें होतें; तो काळ म्हणजे यूरोपवरील मुसुलमानी स्वाऱ्यांचा आणि धर्मयुध्दंचा (क्रूसेड) काळ होय. या ''शौर्याच्या युगा'' नंतर ''पूर्ण सुधारणेचें युग'' (सिव्हिलिझेशन) अवतरतें. सुधारणेच्या युगाचें मुख्य लक्षण, वैयक्तिक हित आणि सामुदायिक हित (स्वार्थ व परार्थ) यांचा योग्य मेळ बसविणें हें होय. पण शौर्याच्या युगांतील सर्व नीतित्त्वें वैयक्तिक दृष्टीच्या पायावर उभारेलीं असतात. उदाहरणार्थ, होमरच्या काळांत 'चांगला' मनुष्य म्हणजे तो कीं जो इतरांवर छाप पाडतो व कार्यकर्ता असतो, आणि वाईट मनुष्य तो कीं जो कर्तृत्वहीन, अप्रसिद्ध व कुरूप असतो. हें युग म्हणजे थोडक्या व्यक्तींच्या सत्तेचा काळ (अरिस्टोज्ञा्रॅच्टिक एज) होय. जो दुसऱ्यांवर अम्मल चालवूं शकेल तो 'उत्तम' मनुष्य, अशी व्याख्या या युगांत असते. अशा युगांत महाकाव्यें निर्माण झालीं.
महाकाव्याचे 'वस्तुस्थितिदर्शक' (ऑथेंटिक) आणि वाङ्मयीन (लिटररी) म्हणजे केवळ काल्पनिक किंवा ध्येयात्मक असे दोन प्रकार आहेत. होमरचें ईलियड वस्तुस्थितिदर्शक म्हणजे तत्कालीन समाजाचें सर्वांगीं ज्ञान करून देणारें आहे. ज्या प्राचीन काळासंबंधीं इतर ज्ञानसाधनें फारशीं उपलब्ध नाहींत अशा काळांतील ग्रीकांचें ईलियड, हिंदूचें रामायण व महाभारत, इराणी लोकांचा शहानामा, असीरियन लोकांचें गिलगामेश वगैरे वस्तुस्थितिदर्शक महाकाव्यें हीं इतिहासच आहेत; व त्यामुळें त्यांचें महत्त्व व उपयुक्तता इटालियनांचें 'डिव्हाइन कॉमेडी, ' इंग्रजांचें 'पॅराडाइस लॉस्ट' किंवा 'फेअरी क्वीन, ' वगैरे काल्पनिक महाकाव्यांपेक्षां फार अधिक आहे. हिंदूंचें महाभारत हें केवळ इतिासच नव्हे तर एक ज्ञानकोश आहे, असा अभिप्राय ज्ञानेश्वरांनीं 'व्यासोच्छिष्ठ जगत्रयं' या वाक्यांत दर्शविला असून एका इंग्रज कवीनें होमरबद्दल अशीच स्तुति केली आहे (रीड होमर वन्स अँड यू कॅन रीड नो मोअर-अँड होमर विल बी ऑल दि बुक्स यू नीड), पण वास्तविक ईलियंडपेक्षां महाभारताला हा अभिप्राय अधिक यथार्थत्वानें लागूं पडतो. फार काय पण साहित्यदर्पणकारांच्या महाकाव्याच्या व्याख्येप्रमाणें वर्षाचे सर्व ॠतू, पर्वत, समुद्र, मृगया, पुत्रजन्म वगैरे अनेक साध्या गोष्टींचें सुद्धांवर्णन ईलियडमध्यें नाहीं, कारण ईलियडमधील सर्व कथा केवळ दोन महिन्यांतील आणि ट्रॉय नामक शहरानजीकच्या रणमैदानावरील असल्यामुळें पुष्कळ विषयांचें वर्णन करण्यास कवीला कालसंकोच तसाच स्थलसंकोचहि नडला आहे.
महाकाव्य म्हणजे इतिहास आणि काव्य यांचा संयोग, अशी व्याख्या एका विद्वानानें केली असून या व्याख्येप्रमाणें पहातां इतिहासांत, आधूनिक व्याख्येप्रमाणें, सामाजिक तत्त्वज्ञानाचाहि समावेश होतो. त्यामुळें महाकाव्यांत इतिहास, तत्त्वज्ञान व काव्य या तिहींचा संयोग असावयास पाहिजे. या दृष्टीनें पौरस्त्य व पाश्र्चात्य सर्व महाकाव्यांची तुलना करून योग्यता ठरविण्याचा प्रयत्न अद्याप झालेला नाहीं. पण अशा तुलनेंत जगांतील सर्व महाकाव्यांत महाभारत हें एकच सर्वोत्कृष्ट महाकाव्य ठरेल असें वाटतें. एका समाजाचा दुसऱ्या समाजाशीं सांस्कृतिक कलह चालू असतां महायुद्धसारखे जे सर्वसंक्षोभकारी प्रसंग उद्भवतात, त्या प्रसंगांच्या वर्णनाच्या निमित्तानें विषयीभूत समाजाचें सर्वांगीण वर्णन करून राष्ट्रीय संस्कृतीच्या गाडयास पुढें ढकलण्यास समर्थ होईल इतक्या योग्यतेचें व अत्यंत विस्तारपूर्वक लिहिलेलें जें काव्य तें महाकाव्य होय. महाकाव्याची साधारण पद्यसंख्या लाख पन्नास हजार ओळी होतील इतकी असते आणि हें एकच लक्षण लागू केल्यास जगांत महाकाव्यें हाताच्या बोटावर मोजतां येतील इतकींच कायतीं आहेत. शिवाय सुधारणेच्या प्रगतीबरोबर महाकाव्य निर्माण होण्याची शक्यता कमी होत चालली आहे, असा मेकॉले-चिपळूणकर-प्रभृति विद्वानांचा अभिप्राय आहे. पण सदरहू मत चुकीचें असून तसाच महाविद्वान् व प्रतिभासंपन्न कवि निपजल्यास तो गेल्या महायुद्धसारख्या प्रसंगावर एखादें उत्कृष्ट महाकाव्य रचूं शकेल.
महाकाव्याच्या उत्पादनाला ज्या अनेक अडचणी आहेत त्यांपैकीं कांहीं धंद्याच्या दृष्टीच्या आहेत. ज्या काव्याचा खप प्रथम फारच थोडा होईल आणि जें कालांतरानें लोकमान्य होईल अशा व्यवसायाकडे अक्षरोपजीवी वर्ग जाणें शक्य होत नाहीं. महाकाव्याच्या उत्पादनास कवीचें अनेक मानसिक अवस्थांतून संक्रमण व्हावें लागतें. आणि त्या कवीस जगांतील अनेक अवस्थांचा व कार्यांचा अनुभव यावा लागतो. मोठया पदावरील लोक व त्यांच्या मनोभावना त्याला परिचित असून मोठालीं कार्येंहि त्याला समजलीं पाहिजे असतात, अशा स्थितीस जे ग्रंथकार पोंचतात आणि जे नित्य संसाराच्या म्हणजे उपजीविकेच्या अडचणींतूल दूर झाले असतात, अशांतूनच महाकाव्यलेखक निपजणें शक्य आहे. वर सांगितलेल्या प्रकारचीं माणसें प्रत्येक देशांत व कालांत थोडींच असावयाचीं, आणि त्यांतल्या त्यांत ज्या माणसांनां आपल्या अवलोकनच्या विस्तीर्णत्वाची जाणीव होऊन मनांतील कल्पना आणि अर्थ ही स्फुट करण्याची आवश्यकता तीव्रत्वानें भासेल अशांकडूनच महाकाव्य लिहिणें शक्य होईल, इतरांकडून होणार नाही. (संदर्भग्रंथ - मॅकनील डिक्सन-इंग्लिश एपिक अँड हीरॉइक पोएट्री; डब्ल्यू. पी. केर-एपिक अँड रोमान्स; ग. रा. हवलदार-ईलियडचें मराठी भाषांतर (प्रस्तावना).