विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महंमूद बेगडा (१४५८-१५११)- गुजराथचा सुलतान होता. यानें गुजराथच्या इतिहासांत पराक्रमी व जुमी राजा म्हणून नांव मिळविलें. ह्यास बेगडा असें टोंपणनांव होतें; त्याचें कारण यानें जुनागड व पावागड हे दोन गड (बेगड) काबीज केले होते. यानें स. १४६१ त माळव्याच्या राजापासून बहामनी राज्याचें संरक्षण केलें. पुढें (१४६८) त्यानें सौराष्ट्रावर स्वारी करून पुष्कळ प्रांत काबीज केला. पुन्हां एकदां हिंदु लोक बाटविण्यासाठीं त्यानें सौराष्ट्रावर स्वारी केली. गिरनारच्या राजानें आपल्या प्रजेस उपद्रव न होऊं देण्याबद्दल फार प्रयत्न केले, तेव्हां महंमुदानें राजासच बाटवून मुसुलमान केले; तेव्हांपासून जुनागड येथें सुलतान राहूं लागला. म्हणून अहंमदाबादेप्रमाणें त्या शहरास नवीन वैभव प्रापत झालें. जुनागडहून कच्छ, सिंध, बलुचिस्तानापर्यंत महंमूदानें स्वाऱ्या केल्या. महंमुदानें हिंदूंस छळून अनेक लोकांस जबरदस्तीनें मुसुलमान केलें. द्वारका, खंबायत, सुरत वगैरे ठिकाणीं चांचे लोकांचा विशेष उपद्रव असे, ती महंमूदानें नाहींसा केला.
पुढें (१४८३) महंमुदानें चांपानेरचा रजपूत राबळ, पटाई जयसिंह याच्यावर स्वारी करून किल्ला व शहर घेतलें, व जयसिंगास ठार मारिलें. सन १५०७ मध्यें गुजराथच्या किनाऱ्यावर पोर्तुगीज आले असतां महंमुदानें आपलें आरमार त्यांजवर पाठविलें. एक दोन लढाया झाल्या; पण त्यांचा बंदोबस्त न होतां, उलट दमण, दीव, माहीम वगैरे ठिकाणें त्यांनीं काबीज केलीं. ह्या प्रसंगीं तुर्कस्तानचा बादशहा बायझीद याच्याकडून महंमूद यास पोर्तुगीजांविरुद्ध मदत आली होती. सन १५१० त महंमुदानें पाटणावर स्वारी केली, व तेथून परत आल्यावर तो लवकरच मेला. यावेळच्या गुजराथेंत ज्या कांही प्रसिद्ध इमारती आज विद्यमान आहेत, त्या बहुतेक याच्या हाताच्या आहेत. अहमदाबादेनजीक यानें महंमुदाबाद म्हणून एक शहर बसविलें. (बील; भु. रि.)