विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मस्तिष्कावरणदाह (मेनिंजायटिस)- मस्तिष्क म्हणजे मेंदु आणि पृष्ठवंशरज्जू यांभोंवतालीं जें आवरण असतें त्यामध्यें (१) पूयोत्पादक जंतू, (२) क्षयोत्पादक जंतू, (३) फुफ्फुसदाहोत्पादक जंतू, (४) फुफ्फुसावरणविशिष्टजंतू, (५) फिरंगोपदंश जंतू, (६) साथीचा प्रकार व (७) इन्फ्ल्युएंझा, विषमज्वर, परमाजंतू, आणि कॉमा जंतू यापैकीं एखाद्या कारणामुळें दाह होऊन कष्टसाध्य अगर असाध्य रोग होतो. त्यापैकी मेंदूस होणाऱ्या क्षयोत्पादक जंतुजन्य प्रकारचें व सांथीच्या प्रकाराचेंच फक्त वर्णन पुढें दिलें आहे.
का र णें.- स्त्रियापेक्षां पुरुषांत व मोठया माणसांपेक्षां लेंकरांत हा रोग अधिक आढळून येतो. त्याच्या अगोदर शरीरांत कोठें तरी अस्थिव्रण, कफक्षयादि व्याधि, सुप्तावस्थेंत अगर स्पष्ट असते. अगर बाह्यतः प्रकृति उत्तम असून थोडया दिवसांच्या अवस्थतेंनंतर हा रोग प्रगट होतो. कारण दिसलें नाहीं तरी प्रेतपरीक्षेनंतर फुफ्फुसांत अगर अन्य इंद्रियांत पुवाळलेल्या गांठीं (क्षयरोगजनित) सांपडतात. मेंदूंत त्या विशेष सांपडून पुष्कल चिकट लस मेंदूंतील भेगांमध्यें अगर मेंदूच्या भागांतील पोकळींत सांठते.
ल क्ष णें- प्रथम मुलाची प्रकृति बिघडून त्या चैन पडत नाहीं, तोंडास रुचि नसते व एकदम कृशता येऊन वांति होते अगर बद्धकोष्ठता येते. यानंतर मस्तकशूळ व वांतीस सुरवात होऊन एखादा वाताचा झटकाहि येतो. मस्तकशूळ फारच तीव्र असतो.नाडीचा वेग वाढून ज्वर येतो. पुढें वांति थांबते. एखाद्या वेळीं डोळा तिरवा होतो. नंतर वातानें बडबडण्यास सुरवात होते व मधून मधून रोगी गुंगींत पडून रहतो. पोट फार खपाटीस जाऊन बरगडया, कमरेची हाडें उंच दिसतात. नाडीचा वेग फार व अनियमित होतो. ताप १०१˚ ते १०३˚ पर्यंत असतो. कपाळ अगर पोटावर बोटानें दाबलें अगर नखाचा हळू ओरखडा घेतला की तेथें चटकन लाल रेघ उठते व ती पांच सात मिनिटें टिकते. दृष्टिमज्जातंतूचा दाह झाल्याचें दृष्टीस येतें. यानंतर आणखी लक्षणें न होतां मृत्यु येतो. अन्न जात नाहीं व मलशुद्धि होत नाहीं. गुंगी, पोटाची खळगटी, अनियमित नाडी अगर क्वचित तापहि वाढतो, अगर एकदम कमी होतो. किंवा श्वासहि लागतो. बहुधा मृत्यूपूर्वी एका बाजूचा हात व पाय ताठतो अगर लुला पडतो. अगर तोंड वांकडें होतें अगर पापणी लुली पडते. बाहुल्या लहान मोठया होतात व वाताचे झटके येऊं लागतात. व त्यामुळें तोंड काळें निळें होतें. लघवींत कधीं शर्करा सांपडतें. रोगलक्षण आढळल्यापासून १० ते २१ दिवसपर्यंत रोगी जगतो. क्वचित दोन चार आठवडेहि जगतो. शरीरांत अगोदर दुसरीकडे क्षयजंतुजन्यव्याधि असून तीमुळें हा रोग झाल्यास लक्षणें फार त्वरित होऊन मृत्यु येतो.
नि दा न.- कर्णरोग, विषमज्वर, मस्तिष्कदाह, फुफ्फुसदाह यांसारख्या रोगांत ज्वर, मस्तकशूळ वगैरेमुळें दिशाभूल होण्याचा संभव असतो. मूडदूस (मूल झिजत व खंगत जाणें) यामुळें पोट खपाटीस फार जातें. म्हणून हें रोगनिदान काळजीनें केलें पाहिजे. त्यासाठीं माकडहाडाच्या जवळ पाठीच्या कण्याचा जो भाग असतो त्यांतून टोचण्याच्या पिचकारीची सूई घुसवून त्यांत या रोगामुळें तेथें जमलेली विकृत लस काढल्यामुळें रोगनिदान होऊन कोणत्या जंतूमुळें व कोणत्या प्रकारचा दाह झाला हें त्याची सूक्ष्मदर्शकयंत्रानें परीक्षा केल्यास समजतें.
सा ध्या सा ध्य वि चा र.- शेंकडा एक तरी रोगी वांचतो असें म्हणतात पण तेहि संशयितच दिसतें. त्यांतून उठलेल्या रोग्यास हाच रोग पुन्हां उलटून अगर क्षयामुळें मरण येतें; व क्वचित जो एखाद दुसरा रोगी बरा होतो त्याची वाचा, दृष्टि व चलनवलनादि व्यापार कित्येक महिने बरे होत नाहींत. यावरून मेंदूस मोठी विकृति झाली असल्याचें उघड होतें.
उ प चा र.- वरील प्रकारचा असाध्य अगर कष्टसाध्य असा हा रोग असल्यामुळें यावर फारसे उपाय नाहींत. डोक्यावर बर्फाची पिशवी वगैरे थंड उपचार करावे.मलशुद्धि रोज करवीत जावी. खाण्यापिण्यास थोडथोडें दुध वरचेवर देणें. मानेच्या मागें पलिस्तर मारून फोड आणणें व सर्व मस्तकास आयोडोफॉर्मचें अगर. इतर प्रकारचें मलम चोळणें. पोटामध्यें पोटयाशियम आयोडाइड हें औषध मुलांस ३-५ ग्रेन प्रमाणांत द्यावें व मस्तकशूळ व झटक्यासाठी पोटयाशियम ब्रोमाईड हें औषध द्यावें.
सां थी चा (ज्वरयुक्त) म स्ति ष्का व र ण दा ह.- या ज्वराचा जंतु रोग्याच्या मेंदूभोंवतालच्या आवरणांत, सांध्यांत होणाऱ्या पुवांत, फुफ्फुसदाहांतील फुफ्फुसांत आणि नाकाघशांतील शेंबडांत सांपडतो. या रोग्याच्या सांथी येतात असें १८०६ सालापासून दिसून येत आहे.
कारणें:- रोग्याचे कपडे अगर शेंबडामुळें व नुकत्याच बऱ्या झालेल्या रोग्याच्या सान्निध्यामुळें रोग फैलावतो. १६ वर्षें वयाच्या आंतील रोगी शेंकडा ८० असतात. २५ वर्षावरील रोगी शेंकडा ५ आढळतात.
लक्षणें:- कपाळशूळ, वांति, अंग मोडून येणें अशीं पूर्व चिन्हें कधीं कधीं होतात. असाध्य रोगांत आरंभापासूनच रोगी बेशुद्ध होतो. पण बहुधा भयंकर माथेशूळ एकदम उत्पन्न होऊन रोगास थंडी वाजून आरंभ होतो, पाठ व हातापायांत वेदन, ज्वर व वांतीमुळें रोग्यास अंथरूण धरावें लागतें. मानेमागचे स्नायू ताठतात व दुखतात, त्यामुळें मान पुढें वाकवितां येत नाहीं. उलट मान मागेंहि खेंचली जाते. असाच ताठरपणा पाठ व कमरेच्या स्नायूंनां येतो. व म्हणून पाठ सरळ ताठते अगर धनुर्वाताप्रमाणें मागें बांक राहून वांकडी होते. कधीं तर हात व पाय ताठ होऊन वांकतात, व त्यांत कळा उत्पन्न होतात. या लक्षणांवरून पाठीच्या मज्जारज्जूपासून निघणारे मज्जातंतू विकृत झालेले उघड दिसतात. तशीच विकृति मेंदूपासून निघणाऱ्या मज्जातंतूंची झाल्यामुळें पापणी लुली पडणें, निरवेपणा, एकच बाहुली लहान मोठी, तोंड वांकडें होणें, दृष्टितंतुदाहामुळें अंधत्व, डोळयांत सपूय दाह होणें, कर्णदाह, सपूय कर्णरोग, बहिेरपणा, गुंगी, झापड अनियमित श्वास लागणें, वात, बडबडणें, झटके हीं याचीं चिन्हें होत. मृत्यु कधीं लवकर व कधीं उशिरां येतो. ज्वर आरंभापासून असतो; पण तो अनियमित प्रकारचा व मध्यम (१०२˚-४') अगर कधीं फारच (१०७˚-८') असतो. रोगी बरा व्हावयाचा असल्यास ताप हळू हळू कमी होतो. या रोगाचें मुख्य लक्षण हें कीं तोंडावर जर उतल्याप्रमाणें मौक्तिकाप्रमाणें पुटकुळया कडक व सौम्य रोगांतहि येतात; व त्यामुळें अर्ध अगर सबंध चेहरा व्यापला जातो. त्या कधीं छाती-पोटांवर व हातापायांवरहि येतात; अगर गांधी, लाली,काळेनिळे डाग उठतात. कधीं कधीं सांधे सुजतात व बरे होतात अगर त्यांत पू होतो. क्वचित् प्लीहा मोठी होते. लघवींत अलब्यूमिन व शर्करा सांपडते. रक्तांतील पांढऱ्या पेशींचें प्रमाण बरेंच वाढतें. नाडी जलद व अनियमित असते. पृष्ठवंशरज्जूच्या आवरणांतील पाणी सुई टोंचून पिचकारीनें काढल्यास तें फार गढूळ अगर पुवाळलेलें असतें; व त्यांत रोगजंतू सांपडतात.
प्रकारः- कांही रोगी थोडया तासांत अगर दिवसांत मरण पावतात. कांहीचा ज्वर नाहींसा होऊन रोगी थोडया दिवसांत बरा होतो. पण बहुतेक रोगी दोन ते चार आठवडे आजारी असतात. रोग उलटण्याचा प्रकार व सन्निपात ज्वरासारखा प्रकारहि आढळतो. तीव्रतेप्रमाणें शेंकडा तीस ते सत्तर रोगी दगावतात असें साध्यासाध्यतेचें प्रमाण आहे. याचे आणखी प्रकार आढळतात. या रोगांत मेंदूची वेष्टणें व भेगांत दाह होऊन लस जमते व म्हणून रोगलक्षणें होतात.
दुष्परिणामः- कान पिकून वाहून बहिरेपण, दृष्टि जाऊन अंधत्व, डोकें मोठें होणें, अर्धांगवायु अगर सर्वांग लुलें पडणें, वाचा नष्ट होणें इत्यादि. पण हे वायूचे तीन प्रकार लवकरच बहुधां बरे होतात.
रोगनिदानः- सांथ आली असतां वरील लक्षणांवरून रोगनिदान करणें अवघड नाहीं; पण तसें नसतांना फुफ्फुसदाह, इन्फ्लुएंझा व लहान मुलाचा हातपाय लुले पडण्याचा रोग यांपैकीं एखादें दुखणें आहे काय असा संदेह पडणें संभवनीय आहे.
उपचारः- डिपथीरिया अगर घटसर्प रोगांत ज्याप्रमाणें उस तयार करतात तशी तयार केलेली या रोगाची लस टोंचून मृत्यूसंख्येचें प्रमाण कमी होतें (शेंकडा ३०). लिस्टर संस्था व इतर संस्थांकडून ही लस विकत मिळते. सोआमीन म्हणून एक टोंचण्याचें औषध आहे पण त्यापासून कधीं कधीं धोका उत्पन्न होतो हें बरोज वेलकम कंपनीकडे मिळतें. पाठीच्या कण्यांत सुई टोचल्यानें कोंडलेल्या लशीस बाहेर पडण्यास वाव मिळून रोग हलका होतो. म्हणून टोंचणें बंद केल्यावरहि लस मधून मधून काढल्यानें रोगस्थिति ताडतां येतें. ज्वरासाठी बर्फाची पिशवी वगैरे उपचार व वेदनासाठीं मार्फिया टोंचणें हे इलाज आहे. फिरंगोपदंशजन्यरोगी व इतर कांहीं थोडे रोगी पोटांत पारदादि औषधें व पोटयाशियम आयोडाइड देऊन बरे होतात.
रोगप्रतिबंधः- बरे झालेले रोगी समाजांत हिंडू फिरूं देण्याच्या अगोदर जंतुघ्न द्रव्याचा बोळा त्यांच्या नोकांत खोल बसवावा अगर त्या धावनानें नाक सूक्ष्म पिचकारीच्या तुषारानें धुवावें.या कामीं कांहीं थोडया विशिष्ट जंतुघ्न औषधांचा उपयोग होतो. त्यापैकीं पोटयाश परमँगानेट हें एक आहे. (१:१००० पाणी). तसें नीट नाक धुतलें तर बरे झालेल्या रोग्यापासून भय रहात नाहीं. यांशिवाय सपूय मस्तिष्कावरणदाह वगैरे प्रकार आहेत; पण त्यांचीं लक्षणें वगैरे वरीलप्रमाणेंच बहुतेक असतात.