विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मस्तकविज्ञान (फ्रेनॉलॉजी)- ए. जे. गॉल यानें जें केवळ अनुभवसिद्ध (एंपिरिकल) मानसशास्त्र रचलें त्याला थॉमस इग्नेशियस फॅर्स्टर यानें हें नांव दिलें. नंतर या शास्त्राची वाढ जे. के. स्पुरझीम व जी. कोंब यांनीं केली. यालाच 'क्रेनिओस्कोपी', 'क्रेनिऑलजी', 'फीजिऑग्नमी, किंवा 'झुऑनोमी' इत्यादि नांवें आहेत. मस्तकविज्ञान पुढील पांच तत्त्वांवर मुख्यतः उभारलेलें आहेः - (१) मेंदू हें मनाचें इंद्रिय होय. (२) मानवी प्राण्याच्या मानसिक (शक्तींची कांहीं विशिष्ट स्वतंत्र शक्तींत विभागणी करतां येते. (३) या शक्तीं मानवाला उपजत प्राप्त झालेल्या असतात, आणि त्या प्रत्येक शक्तींचें मेंदूंत एकेक विशिष्ट ठिकाणीं स्थान असतें. (४) या प्रत्येक ठिकाणच्या आकारमानावर त्या त्या शक्तींचें प्रमाण अवलंबून असतें. (५) तत्तशक्तिनिदर्शक मेंदूच्या भागाचें आकारमान मस्तकाच्या बाह्य भागाच्या आकारमानाशीं जुळतें असतें, त्यामुळें मस्तकाचा बाह्यभाग तपासून मेंदूच्या त्या त्या भागाच्या शक्तींसंबंधीं अनुमान करतां येतें. मस्तकविज्ञान हा मानसशास्त्राचाच एक प्रकार (सिस्टिम) आहे असें या शास्त्राचे पुरस्कर्ते म्हणतात. पण विशेषतः या शास्त्राच्या योगानें माणसाच्या स्वभावाचें आणि बौद्धिक शक्तींचें ज्ञान होतें अशी समजूत असल्यामुळें हें शास्त्र लोकांत अधिक प्रसृत झालें आहे.
इ ति हा स.- मानवी मनाच्या व्यापारांचा मेंदूंतील प्रक्रियेशीं कांहीं अंशीं संबंध असतो ही गोष्ट अगदीं प्राचीन तत्त्ववेत्त्यांनांहि माहीत होती पण ॲरिस्टाटलचें मत असें होतें कीं, मेंदू हें शरीराच्या सर्व इंद्रियांत अत्यंत थंड आणि अत्यंत रक्तहीन असें इंद्रिय असनू त्याचें मुख्य कार्य हृदयांत असलेली अतिशय उष्णता मर्यादित करणें हें होय. प्राचीन राष्ट्रांतील बहुतेक लेखकांचें मत असें होतं कीं हृदय हें प्राणाचें (लाईफ) निवासस्थान होय; आणि या हृदयांतच विचार (थॉट्स) व विकार (ॲफेक्शन्स) उत्पन्न होतात; न्यायबुद्धि (जजमेंट) मात्र कधीं मेंदूंत व कधीं मूत्रपिंडांत (किडनीज) असते असें हिब्रू लेखकांचें मत होतें. संवेदना व बुद्धि यांचें स्थान मेंदू हें असून निरनिराळे बौद्धिक व्यापार मेंदूच्या निरनिराळया विशिष्ट भागांमध्यें चालतात असें गेलेन या प्राचीन ग्रीक वैद्यकशास्त्रज्ञाचें मत असून तींच मतें पुढें अरबी वैद्यांमार्फत मध्ययुगापर्यंत प्रचलित होतीं. १३ व्या शतकांत आल्बर्टस मॅग्नस यानें मस्तकाच्या मुख्य तीन भागांपैकीं मागील भागांत निर्णय बुद्धि, मध्यभागांत कल्पनाशक्ति व पुढील भागांत स्मरणशक्ति असते असें ठरविलें. यानंतर १८ व्या शतकापर्यंत गॉर्डन, थिओडोर गॉल, जी. बौहिन, हॉफमन, टी. विलिस, जी. एम्. लँकिझी, आर. डेकार्टे, मेयर, जे. ए. उनझेर, प्रोकास्का वगैरे विद्वानांनीं बौद्धिक व मानसिक व्यापारांचीं निरनिराळीं स्थानें ठरविण्याचे अनेक प्रयत्न केले. १८ व्या शतकानंतर गॉल, स्पुरझीम, जे. एलियरसन, ॲड्स कोंब, सर जी. एस्. मॅर्केझी, आर. मॅकनिश, आर्चबिशप आर. व्हेटले, आणि अमेरिकेंत काल्डवेल व जे. गॉडमन यांनीं ही विद्या पूर्णत्वास नेली.
शक्ती व त्यांची स्थानें.- गॉल, स्पुरझीम व कोंब यांनीं मस्तकाचे एकंदर ३५ विभाग करवून निरनिराळया बौद्धिक व मानसिक शक्तीची स्थानें निश्चित केली. मानवी मनाच्या शक्तींचे मुख्य प्रकार दोन असून त्या प्रत्येकाचे मुख्य भेद (१) संवेदना (फीलिंग्ज) - याचे मुख्य भेद : - (अ) प्रवृत्ति (प्रॉपेंसिटी), (आ) भावना (सेंटिमेन्ट) व (२) बौद्धिक शक्ति हिचे मुख्य भेदः - (अ) ज्ञानग्राहक (पर्सेप्टिव्ह), (आ) विचार (रिफ्लेक्टिव्ह) असे दोन आहेत.
वरील मुख्य भेदांच्या पोटभेदांची यादी व त्यांचे मेंदूतील स्पुरझीमनें निश्चित केलेल्या स्थानांचे निदर्शक आंकडे खालीं दिले आहेत.
(अ) प्रवृत्ति (प्रापेंसिटीज):- (१) विषयासक्ति (ॲमेटिव्हनेस), (२) अपत्य प्रेम (फिलोप्रोजेनिरिव्हनेस), (३) एकाग्रता (कॉर्सेट्रेव्हिनेस), (४) आसक्ति (ॲढीझिव्हनेस), (५) युद्धप्रवणता (काँबटिव्हनेस), (६) विघातकता, (७) गौप्यवृत्ति (सीज्ञा्रेच्टिव्हनेस), (८) संपादनेच्छा (ॲक्विझिटिव्हनेस), (९) विधायकता (कँस्ट्रक्टिव्हनेस).
(आ) कनिष्ठ भावना (लोअर सेंटिमेंटस):- (१०) गर्व (सेल्फ-एस्टीम,)( ११) स्तुतिप्रियता (लव्ह ऑफ अप्रोबेशन) व (१२) सावधान (कॉन्शसनेस)
(इ) उच्च भावना (सुपीरियर सेंटिमेंट्स):- (१३) सद्यता (बेनिव्होलन्स), (१४) पूज्यभाव (रव्हेनेरेशन), (१५) सदसद्विवेकबुद्धि (कॉन्शन्सनेस), (१६) निश्चयीपणा (फर्मनेस), (१७) आशा (होप), (१८) आश्र्चर्य (वंडर), (१९) ध्येयप्रियता, (२०) विनोदी (विट), व (२१) अनुकरणप्रियता (इमिटेशन)
(ई) ज्ञानग्राहक शक्ती (पर्सेप्टिव्ह फॅकल्टीज):- (२२) पृथक्त्व (इंडिव्हिज्युऑलिटी), (२३) रचना, (फॉर्म), (२४) आकार (साईझ), (२५) वजन २६ रंग (२७) स्थान (लोकॅलिटी), (२८) संस्था (२९) व्यवस्थितपणा (३०) आकस्मितता (इव्हेंच्युऑलिटी) (३१) काल (३२) ध्वनि, (३३) भाषा.
(उ) विचार शक्ति (रिफ्लेक्टिव्ह फॅकल्टीज):- (३४) तुलनाशक्ति (कंपॅरिझन), (३५) कार्यकारणभाव (कॉझॅलिटी)
मस्तकविज्ञानशास्त्राचा फोलपणां- मेंदूंतील कार्यपरत्वें स्थानभेदाची कल्पना शास्त्रीय प्रयोगानें सिद्ध होऊं शकत नाहीं; अतएव हें केवळ फलज्योतिषाप्रमाणें (ॲस्ट्रॉलॉजी) एक मिथ्या शास्त्र (सुडो-सायन्स) आहे, अशी तीव्र टीका १९ व्या शतकाच्या उत्तरर्धांत झाली असून टीकाकारांत थॉमस ब्राऊन, जेफ्रे, प्रो. जॉन विल्सन, जे. बार्क्ले, सर चार्लस बेल, सर डब्ल्यू. हमिल्टन, सर बी. बोडी हे प्रमुख आहेत. टीकेंतला दुसरा मुद्दा असा आहे कीं, कवटीच्या बाह्या भागावरून जरी मेंदूसंबंधीं कल्पना सामान्यतः येण्यासारखीं असली तरी कवटी व मेंदू यांच्या परस्पर आकारांत बरीचशी भिन्नता असूं शकते, व त्यामुळें कवटीच्या बाह्य आकारावरून काढलेलीं अनुमानें चुकीचीं असणें शक्य असतें. तसेंच कवटी व मेंदू यांच्यामध्यें जो स्पंजासारखा थर असतो तो थर एकाच डोक्यांत निरनिराळया ठिकाणीं कमजास्त जाड असतो. कृतित्रपणें कवटीला वेडावांकडा बाह्य आकार आला तरी त्यायोगानें मेंदूच्या पृष्ठभागावर फारच थोडा परिणाम होतो.यावरून असें दिसून येईल कीं, मस्तकाच्या बाह्य आकारावरून मेंदूच्या वाढीबद्दल अनुमानें काढून त्यावरून मनुष्याच्या स्वभावाबद्दल अंदाज करणें धोक्याचें आहे. विशेषतः मस्तकविज्ञानावर भरंवसा ठेवून चाकनोकरांची निवड करण्याचें जें खूळ उत्पन्न झालें आहे तें खरोखरच नुकसानकारक आहे, कारण खरोखर लायख इसम मस्तकविज्ञानशास्त्राच्या चुकीच्या अनुमानामुळें विनाकारण नालायख समजला जाण्याचा फार संभव आहे.
(संदर्भग्रंथ - खुरझीम - फ्रेनॉलजी,अथवा दि डॉक्ट्रिन ऑफ दि माईंड; जी. कॉब-सिस्टिम ऑफ फ्रेनॉलजी (१८२५); सिडने स्मिथ - प्रिंसिपल्स ऑफ फ्रेनॉलजी (१८३८); क्रॉक - काँर्पेडियम ऑफ प्रेच्नालजी (१८७८); हॉलंडर - सायंटिफिक फ्रेनॉलजी (१९०२).