विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मस्कत- अरबस्तानच्या आग्नेय किनाऱ्यावर हें शहर वसलेलें असून ओमेनप्रांताची राजधानी आहे. तेथें आरमारी ठाणें असून इराणच्या आखातांत शिरण्याच्या रस्त्यावर या ठाण्याचा वचक असतो. मस्कतचें बंदर गोदर हें ब्रिटिशांच्या ताब्यांत असून हिंदुस्थान-इराणच्या विद्युत्संदेशाचें तेथील ठाणें इंग्रजांच्या हातीं आहे. हिंदुस्थान सरकारचा पोलिटिकल रेसिडेन्ट येथें रहातो. येथें ब्रिटिश पोस्ट व तार ऑफिस आहे. याच्या बाजूंनीं दुर्गम पर्वत असल्यामुळें हें ठिकाण अरबस्तानापासून तुटक झालें आहे. जमिनीच्या बाजूनें स्वाऱ्या होऊं नयेत म्हणून भिंत घातलेली असून भिंतीवर मनोरे बांधलेले आहेत. समुद्राच्या बाजूला दोन मोडके किल्ले आहेत. पोर्तुगीजांनीं इराणचें आखात घेतल्यावर या शहराचें महत्त्व वाढलें. शहराच्या मध्यभागीं सुलतानाचा तीनमजली राजवाडा आहे. खजुराची मोठयाप्रमाणावर निर्गत होते. मस्कती डाळिंबें हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहेत. पोर्तुगीजांनीं इराणच्या आखातावर अंमल बसविल्यावर मस्कतच्या अर्वाचीन इतिहासास सुरवात होते. स. १५०८ पासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत मस्कत पोर्तुगीजांच्या ताब्यांत होतें. त्यानंतर बरींच स्थित्यंतरें होऊन अठराव्या शतकांत येमेनाईट घराण्यांतील अहमदबीन सय्यदाच्या हातीं हें पडलें. याचेच वंशज आज सुलतान म्हणून येथें (ओमेनप्रांतावर) राज्य करीत आहेत.