विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मॅसेडोनिया- ग्रीसमधील एक प्रांत. अलेक्झांडपर्यंतचा मॅसेडोनियाचा इतिहास 'ग्रीक संस्कृतीची व्यापकता' व 'इराणचें सत्तावर्धन' या बुध्देत्तर जग या विभागांतल्या प्रकरणांतून व 'अलेक्झांडर' या लेखांत आला आहे. ॲलेक्झांडरच्या मृत्यूनंतर मॅसिडोनियाचें साम्राज्य लयाला गेलें. फक्त मॅसेडोनिया प्रांत तेवढा राहिला. तो पुढें रोम, बल्गेरिया, सर्व्हिया, ग्रीस, तुर्कस्तान इत्यादि राष्ट्रांच्या अंमलाखालीं जात जात, शेवटीं १९१२ सालीं ग्रीसच्या ताब्यांत आला. मॅसेडोनियाची लोकसंख्या १९२३ सालीं ५८५६७३ होती. त्याचे राज्यकारभाराच्या सोयीसाठीं पूर्व व पश्चिम मॅसेडोनिया असे भाग पाडण्यांत आले आहेत. मॅसेडोनियामध्यें मुख्यतः स्लाव्ह लोकांची वस्ती आहे. त्याशिवाय बल्गर, ग्रीक, ख्रिस्ती व महंमदी लोकांचीहि येथें वस्ती आहे.