विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मसूर- हें पीक पुरातन काळापासून हिंदुस्थानांत होतें. हें यूरोप व आशियाखंडांत सर्वत्र आढळतें. मसूरेचें झाड फूट दीडफूट उंच वाढतें. पानें व शेंगा बारीक असतात. दाण्याचा रंग व डाळीचा रंग शेंदरी असतो. मसूरीच्या बियांच्या लहान मोठया आकाराप्रमाणें दोन तीन जाती आहेत. या पिकाची लागवड पुणें, सातारा, नाशिक व बेळगांव या जिल्ह्यातील मावळी भागांत होते व त्याप्रमाणेंच हें पीक जबलपूर, नरसिंगपूर येथें महत्त्वाचें आहे. संयुक्तप्रांत व मद्रास इलाख्यांतहि याची बरीच लागवड करतात. हें पीक मध्यम खोलीच्या मिश्रजमिनींत करतात. हें पीक मध्यम खोलीच्या मिश्रजमिनींत करतात. सप्टेंबर महिन्यांत जमीन नांगरून तिजवर कुळवाच्या पाळया घालून ती तयार करतात. दर एकरीं २०-२५ पौंड बीं लागतें. पीक जानेवारी महिन्यांत काढण्यास तयार होतें. दर एकरीं सरासरी उत्पन्न ४००-५०० पौंड असतें. मसूर निषिद्ध मानलेली आहे. गरीब लोक मसुरांची डाळ व मसूर. दोन्ही उपयोगांत आणतात.