विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मल्हारराव होळकर (इंदूर पहा)- इंदूर संस्थानचा संस्थापक. मल्हारराव होळकर हा जातीनें धनगर असून, नीरेकांठच्या होळ खेडयाचा (पुणें जिल्हा) रहाणारा होता. मल्हाररावाचा जन्म १६९४ सालीं झाला. लहानपणीं बाप वारल्यावर तो खानदेशांत आपल्या मामाच्या गांवी (तळोदें) राहिला. त्याची बायको गोतमा ही त्याची मामेबहीण होती.
पुढें (१७२५) माळव्यांतील चौथ व सरदेशमुखी गोळा करण्याचें काम पवार, शिंदें यांच्याबराबर मल्हाररावाकडेहि बाजीरावानें सोंपविलें; व फौजेच्या खर्चासाठीं, त्या मुलुखाच्या मोकासाबाबींत थोडीशी रक्कम तोडून दिली. यानंतर १७३१ (माळवा), ३२ (तिरला), ३५ (आग्रा व गुजराथ), ३६ (अंतर्वेद, दिल्ली), ३८ (भोपाळ), ३९ (कोंकण, वसई) या सालच्या पेशव्यांनीं केलेल्या मोहिमांत मल्हारराव हजर होता. यांपैकीं कांहीं स्वाऱ्या त्यानें स्वतः केल्या. बहुतेक माळवा सर झाल्यावर इतर सरदारांबरोबर मल्हाररावास पेशव्यांनीं माळव्यांतील ८२ परगणे जहागीर दिले. यापूर्वीच रेवाकांठचा बराचसा प्रांत मल्हाररावानें जिंकला होता. त्यामुळें त्यानें आपलें मुख्य ठाणें महेश्वरास केलें. जयपूरच्या गादीबद्दल तंटे लागून मल्हाररावानें माघोसिंगाचा पक्ष घेऊन त्यास गादीवर बसविलें व त्याबद्दल ६४ लाख खंडणी आणि रामपुरा, भानपुरा, टोंग वगैरें प्रांत मिळविला. शाहूच्या मृत्युनंतर पेशव्यांनीं जी माळव्याची व्यवस्था केली तींत माळव्याच्या एकंदर १॥ कोट वसुलापैकीं ७४॥ लक्षांचा प्रांत मल्हाररवास दिला. पुढें मल्हाररावानें रोहिल्यांविरुद्ध अयोध्येच्या सफदरजंगास मदत केली (१७५१), पेशव्यांच्या आज्ञेवरून वजीर गाजीउद्दीन यास दक्षिणेंत आणिलें (१७५२). गाजीच्या मीर शहाबुद्दीन नांवाच्या मुलास जाटांविरुद्ध मदत करून, जाटांच्या मदतीस आलेल्या दिल्लीच्या बादशहाचा पराभव केला (१७५४). व राघोबादादा पेशव्यांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यांत थोडा फार भाग घेतला (१७५६-५७). मात्र या वेळेपासूनच पेशवे-सरकारविरुद्ध मल्हाररावानें नजीबाखानास अंतस्थपणें मदत देण्याचें सुरू केले. दुसऱ्या अलमगिरास हिंदुस्थानांतील उलाढालीच्या वेळी प्रतिकार करण्याच्या कामीं मल्हाररावानें थोडाफार भाग घेतला हाता. पहिल्यापासून मल्हारावा आपलें अंग राखून काम करणारा होता. आपला फायदा ज्यांत नाहीं त्यांत तो सहसा पडत नसे. शिंदू आपल्याकडून वरचढ होऊं लागले हें पाहतांच यानें त्यांच्या विरुद्ध खटपटी सुरू केल्या; एवढेंच नाहीं तर जरूर त्यावेळीं त्यांनां मदतहि केली नाहीं. त्याचप्रमाणें यानें नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत मध्यवर्ती सरकारास जवळ जवळ धाब्यावर बसविलें. स्वतःकडे तुंबलेल्या हिशेबाची दाद लागूं दिली नाहीं. बहुतेक पेशव्यांच्या स्वाऱ्यांत कांहीं तरी खेंगटें काढून जेणे करून आपल्यावाचून अडेल अशा तो अडचणीं आणूं लागला. शिंद्यांच्या विरुद्ध त्यांच्या शत्रूंस आंतून मदत केली, नजीबखानासारख्या मराठयांच्या कट्टया शत्रूस ''पेशव्यांचीं धोत्रें बडवावीं लागतील यासाठीं'' खळी म्हणून व पेशवे ''नजीब हा बेमान हरामखोर, अर्धा अब्दाली आहे'' असें सांगत असतांहि त्याला मुद्दाम शेवटपर्यंत राखून ठेवला, आणि फुसक्या सबबी काढून पानपताच्या प्रसंगीं भाऊसाहेबांनां जास्ती अडचणींत आणून शेवटच्या वेळीं रणांतून पाय काढला. मात्र थोरला बाजीराव किंवा थोरला माधवराव यांच्यासारख्या कडक पेशव्यांपुढें त्याचें कांहीं चालत नसे.
यानंतर राक्षसभुवनाच्या लढाईंत (१७६३), जाटानें दिल्लीस घातलेल्या वेढयांत (१७६४), व राघोबादादाच्या उत्तरेकडील मोहिमेंत (१७६६) मल्हाररावानें भाग घेतला होता. शेवटच्या मोहिमेंत तो ७२ वर्षांचा होऊन अलमपूर येथें मरण पावला (१७६६ मे). त्याला खंडेराव म्हणून एक मुलगा होता, तो कुंभेरीच्या लढाईंत मारला गेला. त्याचीच बायको अहल्याबाई होय. मल्हारराव हा सुजाउद्दौल्याच्या मदतीस इंग्रजांविरुद्ध गेला असतां (१७६५) त्याचा मोड झाला होता, म्हणून त्यानें आपल्या मृत्यूसमयीं दादासाहेब पेशव्यांनां इंगजांचें पारिपत्य करण्याबद्दल सांगितले होतें असें म्हणतात. (नाडकर्णी-होळकरराज्याचें सामान्य वर्णन; डफ; होळकर कैफि; पत्रें - यादि; भाऊ - बखर; कीन - फॉल ऑफ दि मोंगल एंपायर.)