विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलेरकोटला- ह्या छोटयाशा संस्थानाचा मालक कुर्द पठाण मुसुलमान आहे. येथील मूळ पुरुष प्रथम इराणच्या उत्तरेकडील शेरवाण-प्रांताचा रहिवासी असून, तेथून तो काबुलांतून येऊन मोंगल बादशहांच्या पदरीं नोकरीस राहून सरहिंदमध्यें कामगिरी बजावीत होता. त्यानें मलेर येथें १४४२ त आपलें ठाणें घातलें. ह्या घराण्यानें मोंगलांच्या ऱ्हासकाळांत स्वतंत्र सत्ता स्थापिलीं. पुढें त्यांचें व शेजारच्या शीख संस्थानिकांचे सतत झगडे चालत. लासवारीच्या लढाईनंतर येथील नबाबाचा इंग्रजांशीं प्रथम संबंध (१८०५) आला. त्यावेळीं जो नबाब गादीवर होता, तो लॉर्ड लेक यास मिळाला, त्यामुळें सतलज-यमुना दुआबांतील मराठयांची सत्ता नामशेष झाली. पुढें स. १८०९ मध्यें नबाबाचा व इंगजांचा तह झाला. या नबाबाचे भाईबंद होते त्यांस संस्थानांत हिस्से मिळाले होते. सांप्रत त्यांचे वंशज आपपल्या हद्दींत पूर्ण अम्मल चालवितात. परंतु मलेरकोटल्याचा नबाब हा सर्वांत वरिष्ठ आहे. संस्थानचें क्षेत्रफळ १६७ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) ८०३२२ व उत्पन्न १४ लाख आहे. जमीन रेताड असून संस्थानच्या उत्तरेस लुधिआना जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस पतिआळा संस्थान, व पश्चिमेस लुधिआना जिल्हा, पतिआळा व नाभा संस्थानें आहेत. येथील विद्यमान (१९२५) नबाब लेफनंट कर्नल हिज हायनेस सर अहमदअल्लीखान बहादूर हा १९०८ सालीं गादीवर बसला. संस्थानांत कापूस, साखर, बडीशेप, अजमोदा, तंबाखू, व बहुतेक प्रकारचें धान्य उत्पन्न होतें. मलेरकोटला राजधानीची लोकसंख्या ३०००० आहे.