विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलिक महंमद ज्यायसी (उदयकाल स. १५४०)- एक हिंदी ग्रंथकार. यानें पद्मावत नांवाचा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. स्वतंत्र विषयावर गौडी भाषेंत पद्यमय असा हा पहिलाच ग्रंथ होय. याच्याइतके अभ्यासनीय असे ग्रंथ फारच कमी आढळतील. साधारण विद्वानाला यांतील एक ओळ समजणार नाहीं इतक्या निरनिराळया भाषेंत हा ग्रंथ लिहिला आहे. त्यांत कल्पकता व काव्यमाधुर्य उत्तम आहे. मलिक हा फकीर होता. यांच्या कृपेमुळें आपल्याला मुलगा व संपत्ति प्राप्त झाली अशी अमेथीच्या राजाच्या मनांत भावना उत्पन्न झाल्यामुळें तो याचा भक्त झाला. अमेथी येथें राजवाडयाच्या दरवाज्याजवळ याचें थडगें आहे.
पद्मावताचें कथानक पुढीलप्रमाणें आहेः- चितोडचा राजा रतनसेन याला एका राघूकडून सिंहलद्वीपच्या पद्मिनी राजकन्येच्या सौंदर्याची हकीकत कळल्यामुळें रतनसेन हा सिंहलद्वीपाला भिक्षूच्या रूपानें जाऊन तिच्याशीं लग्न करून चितोड येथें आला. चितोडच्या दरबारांतून हांकून लावलेल्या एका ज्योतिषानें अल्लाउद्दिनाला पद्मिनांच्या सौंदर्याची हकीकत सांगितली. तीमुळें त्यानें चितोडवर स्वारी करून तिला हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा पराजय झाला. नंतर अल्लाउद्दिनानें रतनदेवाला युक्तीनें पकडलें व पद्मिनी वश होत असल्यास सुटका होईल असें सांगितलें. अशा रीतीनें रतनदेव तुरुंगांत असतांना इकडे कुंभलनेरच्या देवपालराजानें पद्मिनीची चेष्टा केली. पुढें गोरा आणि बादल या दोघा रजपूत वीरांनीं रतनची सुटका केली. रतन पुन्हां राज्यावर बसल्यानंतर त्यानें देवपालावर स्वारी करून त्याला ठार मारिलें पण यालाहि भयंकर जखम लागली; व तो चितोडला येतांच प्राणास मुकला, तेव्हां त्याच्या पद्मिनी व नागमती या बायका सती गेल्या. इतक्यांत अल्लाउद्दिनाची फौज शहराच्या दरवाज्यापाशीं येऊन थडकली. बादलनें दरवाज्याचें मोठया शौर्यानें लढून रक्षण केलें. पण तो पडला; व चितोड मुसुलमानांच्या ताब्यांत गेलें. या ग्रंथाच्या शेवटील श्र्लोकांत हें कथानक अन्योक्तिरुप आहे असें कर्त्यानें म्हटलें आहे. चितोड म्हणजे नरदेह, रतनसेन हा आत्मा, राघू व गुरू, पद्मिनी ही शहाणपणा, ज्योतिषी हा सैतान व अल्लाउद्दिन हा मोह असें रूपक त्यानें बसविलें आहे.
पद्मावताचें कथानक चितोडच वेढयाच्या हकीकतीवर रचलेलें आहे; व तें सर्वांनां परिचित आहे. पण नायकाचें भीमसिंहाच्या ऐवजीं रतन नांव ठेवणें इत्यादि मूळ हकीकतीमध्यें महम्मदानें बरेच फेरफार केलेले आहेत. रत्नावली या नाटकाचाहि या काव्यावर परिणाम झालेला दिसतो. (बील; ग्रिअर्सन-हिंदी लिटरेचर)