विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलायी लोक- मलायाद्वीपकल्पांत व मलायाद्वीपसमुहांत रहाणाऱ्या प्रबळ राष्ट्रजातीला मलायी असें म्हणतात. हे लोक मलायाद्वीपकल्पांत अलीकडे आले असावे असें दंतकथांवरून समजते. त्यांच्या भाषेंत स्थानिक फळांनां संयुक्त नांवें दिलेलीं आहेत. यावरून ते मलायाद्वीपकल्पांत येण्याच्यापूर्वी त्यांची एक निराळी भाषा असावी असें दिसतें.
थोडया दिवसापूर्वी मानववंशशास्त्रवेत्त्यांचें असें मत होतें कीं, मलयु लोक मंगोल महावंशापासून झालेले असावे; कारण मंगोल लोकांच्या व यांच्या शरीररचनेंत बरेंच साम्य आढळतें. परंतु मलयु ही निराळी जात असावी हें मत हल्लीं सर्वमान्य होत चाललें आहे. ही जात दक्षिणेकडून येऊन मंगोल जातीच्या शेजारीं राहिली असावी. कारण त्यांच्या भाषादि गोष्टींवरून असें स्पष्ट दिसतें कीं, मलयु महावंश मंगोल-महावंशांतून भिन्न आहे. मलयु व पॉलिनेशियन भाषांमध्यें बरेंच साम्य आहे. या परस्परापासून दूर असलेल्या प्रदेशांतील भाषांत साम्य आहे. या परस्परापासून दूर असलेल्या प्रदेशांतील भाषांत साम्य ओ यावरून असें दिसतें कीं, मलयु व पॉलिनेशियन लोक प्राचीन काळीं एके ठिकाणीं रहात असावें. (ज्ञा. को. वि. १ पृ. १७७ इ. पहा)
हल्लीं मलायी लोक सुनीपंथी मुसुलमान आहेत. इ. स. १३-१५ व्या शतकांत त्यांनीं हा पंथ स्वीकारला आज यांचीं धर्मबंधनें योग्य रीतीनें पाळलीं जात नाहींत. हिंदुस्थानांतील लोकांच्या धर्मसमजुतीचा मलायी लोकांच्या धर्मावर बराच परिणाम झाला आहे असें दिसतें.,
मलायी लोकांचें मुख्य खाद्य भात आहे, तेव्हां ते मुख्यतः तांदुळाचेंच पिक काढतात. रेशमाचें व कापसाचें कापड तयार करण्याचे कारखाने हे मलायी लोकांचें मुख्य धंदे होत. त्यांची लिपी स्वतंत्र असावी असें दिसतें. मलायी लोक आदरशील व स्वाभिमानी परंतु आळशी, सुखोपभोगप्रिय, व अतिशय अदूरदृष्टीचे आहेत. ते फार जुव्वेबाज असून पैशाच्या संबंधांत त्यांनां प्रामाणिकपणाची कल्पना सुद्धंनसते. मलायी लोक दरबारी असून विलक्षण राजनिष्ठ आहेत. बहुधां ते क्रूर, अन्यायी, स्वार्थी व अदूरदर्शी असतात. हे लोक सैल अंगरखा व विजार घालतात. व डोक्याला फेटा बांधतात अगर टोपी घालतात. क्रिस नांवाचें यांचें मुख्य हत्यार आहे; तें लहान जंबियासारखें असून त्याला लांकडाची अगर हस्तिदंती मूठ असते. कधीं कधीं मलायी लोक क्रिससारखेंच परंतु लांब पातें असलेलें हत्यार वापरतात. मलायी-पॉलिनेशियन वर्गाच्या मलायी भागांपैकीं मलयु नांवाची भाषा हे लोक बोलतात. या भाषेंत येथील सर्व कारभार चालतो. या भाषेंतील वाङ्मयाची माहिती पहिल्या विभागांत दिली आहे.