विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलायाद्वीपकल्प- हें सामांतरभुज चौकोनाच्या आकाराचें असून याचा भाग चीनच्या समुद्रांत गेलेला आहे. याचें क्षेत्रफळ सुमारें ७०००० चौरस मैल आहे. याच्या उत्तरेस सयाम, दक्षिणेस सिंगापूर बेट व सामुद्रधुनि; पूर्वेस चीनचा समुद्र व पश्चिमेस मलाकाची सामुद्रधुनि आहे. या द्वीपकल्पांतील पर्वतांनीं याचे दोन भाग केले आहेत. सर्वांत उंच पर्वत गुनाग टाहन हा आहे. हें द्वीपकल्प म्हणजे अफाट जंगल असून त्यांत अगणित लहान मोठया नद्या आहेत. कौन्टन, रांपीन, केलॅटन, पेहाँग या येथील मुख्य नद्या आहेत. येथील हवा जरी उष्ण आहे तरी ती ब्रह्मदेशापेक्षां चांगली आहे.
स्ट्रेट्ससेटलमेंटची वसाहत व संयुक्त मलायासंस्थानें, जोहोरचें स्वतंत्र संस्थान; ब्रिटिश संरक्षणाखालींल विभक्त संस्थनें; व पेराक व पॅहँगच्या उत्तरेस असलेले संस्थानचे जमाव असे या द्वीपकल्पाचे ४ भाग केले आहेत. या द्वीपकल्पाची लोकसंख्या सुमारें २०,००,००० आहे; पैकीं ८,५०,००० चिनी लोक आहेत. स्ट्रेट्ससेटलमेंट्स व संयुक्त मलाया संस्थानें यांत आशियांतील सर्व जातींचे लोक सांपडतात. सयामी लोकांखेरीज जे लोक या द्वीपकल्पांत बरेच दिवस राहिले अशा लोकांच्या सेमँग, सकाइ व मलायी अशा ३ जाती आहेत.
इ ति हा स.- मलयाद्वीपकल्पाचें महत्त्व मोलकाहून आलेला मसाल्याचा माल निर्गत करण्याचें मुख्य ठिकाण म्हणून होतें. येथील मसाल्याचा व्यापार फार प्राचीन आहे. हिंदुस्थानच्या ताब्यांत लंवगाचा सर्व हक्क असतांनां मलायाद्वीपकल्पाला फारसें महत्त्व नव्हतें. इराणांतील व अरबस्तानांतील मुसुलमान व्यापाऱ्यांनीं हिंदूंचा कुलहक्क झुगारून सोळाव्या शतकाच्या आरंभास बहुतेक मसाल्याचा व्यापार आपल्या हातांत घेतला. हे व्यापारी मुसुलमानी धर्माचे उपदेशक होते व त्यांच्या वजनामुळें मलायांतील लोकांनीं अनेकदेववादित्व सोडून देऊन मुसुलमानी धर्माची दीक्षा घेतली. आशियाखंडाच्या अर्वाचीन इतिहासांत 'मसाल्याच्या व्यापाराचा कुलहक्क' मिळविण्याच्या इच्छेस फार महत्त्वाचें स्थान प्राप्त झालें आहे, कारण आशियाखंडाचा अर्वाचीन इतिहास हा बहुतांशीं या इच्छेचाच परिणाम आहे. मोलका बेटावर स्वारी करण्याचें पोर्तुगीज लोकांचें पहिल्यापासून ध्येय होतें. श्वेतवर्णाचे लोक केप ऑफ गुडहोपला वळसा घालून जेव्हां पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर आले तेव्हांच मलाका बेट हें त्यांच्या इच्छेचा विषय झालें. पोर्तुगीज लोक मलायाद्वीपकल्पांत येण्यास १५०८ सालीं निघाले, परंतु त्यांत त्यांनां यश आलें नाहीं. १५११ सालीं पुन्हां मलाका बेटाचा शोध लावण्यासाठीं तयारी करण्यांत आली व त्यावेळीं मलाका त्यांनीं घेतलें व तें कायमचें यूरोपीय लोकांच्या ताब्यांत गेलें. पोर्तुगीज लोक मलाकाच्या मालकीनेंच संतुष्ट होते व त्यांनीं मलायाद्वीपकल्पांत राज्यविस्तार करण्याचा प्रयत्न न करतां तेथील लोकांची मैत्री संपादिली. लवकरच मसाल्याच्या व्यापाराचा कुलहक्क पोर्तुगीज लोकांस मिळाला व मलाका हें त्या व्यापाराचें मुख्य ठिकाण झालें. १५२८ सालीं फ्रेंच लोकांनीं स्वारी केली परंतु ते मलायापर्यंत पोंचले नाहींत. १५९५ सालीं डच लोक इकडे आले, परंतु ते जावा बेटांत गेले, व त्यांनीं आपला कारभार जावा व त्याच्या लगतचीं बेटें येथेंच चालविला. मध्यंतरीं अचीन व पोर्तुगीज यांच्यांत वांकडें येऊन सन १६४१ त डच लोकांच्या मदतीनें अचीनच लोकांनीं पोर्तुगीज लोकांवर स्वारी केली. परंतु डच लोक मलायाचे मालक झाले. स. १७९५ मध्यें ब्रिटिशांनीं मलाका डच लोकांपासून घेतलें, परंतु १८१८ मध्यें तें त्यांनां परत दिलें. पुढें १८२४ मध्यें सुमात्रांतील कांहीं ठिकाणें देऊन मलाका ब्रिटिशांनीं मोबदला म्हणून घेतलें. या द्वीपकल्पांत ब्रिटिशांनीं पहिली वखार १६१३ सालीं पाटनी नांवाच्या पूर्वकिनाऱ्यावरील एतद्देशीय संस्थानांत उघडली होती. परंतु तिचा शेवट १६२० सालीं झाली. स. १७८६ मध्यें केदाहजवळून पेनांग विकत घेतलें. १८१९ मध्यें जोहोरच्या तत्कालीन सुलतानाजवळून सिंगापूर विकत घेतलें. स. १८६७ पर्यंत स्ट्रेट्ससेटलमेंटचा राज्यकारभार हिंदुस्थानांतून पहाण्यांत येत असे. १८६७ सालीं ही क्राऊन वसाहत करण्यांत आली. स. १८७४ मध्यें पेराकचें संस्थान तेथील सुलतानाशीं झालेल्या तहान्वयें ब्रिटिश रक्षणाखालीं आलें, व यामुळें शेवटीं संयुक्त मलायामध्यें येणारीं दुसरीं संस्थानेंहि ब्रिटिश छत्राखालीं आलीं. ग्रेटब्रिटन व सयाम यांच्यामध्यें झालेल्या स. १९०२ च्या तहान्वयें उत्तरेकडील मलाया संस्थानें सयामच्या सत्तेखालीं रहावीं असें ठरलें. परंतु स. १९०९ च्या तहान्वयें सयामनें केलँटन, ट्रेंगानु, केदाह व पेरलिस यांवरील आपला साम्राज्याचा हक्क सोडला. सिंगापूर हें स्ट्रेट्ससेटलमेंटच्या वसाहतीचें राजकीय, व्यापरी राज्यकारभाराचें मुख्य ठिकाण आहे, व येथील गव्हर्नर या अधिकारामुळें संयुक्त मलाया संस्थानें, ब्रिटिश नार्थ बोर्निओ, सारावाक, कोको, कीलींग व ख्रिस्तमस बेटें यांचा मुख्य कमिशनर व लॅबोनचा गव्हर्नर असतो.