विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलय- मलय हें एका ठिकाणचें नांव असून तें ठिकाण पश्चिम घटाच्या अगदीं दक्षिणेकडील टोंकांजवळ आहे असें तेलंगांचें मत आहे, परंतु रा. केशवराव ध्रुव यांच्या मतें मलय हें ठिकाणांचें नांव नसून एका जातीच्या लोकांचें नांव आहे; व ते लोक हिंदुस्थानच्या उत्तर सरहद्दीवर व सातव्या शतकांतील काश्मीरच्या पूर्व मर्यादेवर कोठें तरी रहात असावे. महाभारत, रामायण, रत्नकोश वगैरे संस्कृत ग्रंथांतहि मलय शब्दाचा उल्लेख आला आहे. व त्यांवरून नेपाळांत गंडकी व राप्ती यांच्या वरच्या बाजूला असलेला मलयभूमि नांवाचा जिल्हा हाच मुद्राराक्षसांतील व महाभारतांतील मलयांचा देश होय असें डॉ. जे. बर्जेस म्हणतात (इं. अँ. १४).