विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलकापुर, ता लु का.- वऱ्हाड, जिल्हा बुलडाणें. क्षेत्रफळ ७९२ चौरस मैल. यांत ३३० खालसा आणि ९ जहागिरीची गांवें आहेत. लोकसंख्या (१९११) १८९०४२. यांतील जमीन सुपीक असून काळी आहे. पूर्णा नदीस या तालुक्यांतून तीन नद्या मिळतात. पण त्यांचा बागाइतीकरितां उपयोग करतां येत नाहीं. तालुक्यांतील जमीन खरीप व रब्बी या दोन्ही पिकांनां योग्य आहे. या तालुक्यांतून जी. आय. पी. रेल्वे जात असून तालुक्याचें मुख्य ठिकाण मलकापुर हें रेल्वेस्टेशन आहे.
गां व.- तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें नळगंगा नदीतीरीं आहे. लोकसंख्या १२३९१. कापसाचा व्यापार येथें बराच चालत असल्यामुळें लोकसंख्या वाढती आहे. गांवाला तट आहे. हें गांव फार जुनें दिसतें.ऐने-इ-अकबरींत हें नरनाळयाच्या सरकारांतील परगण्याचें मुख्य ठिकाण आहे असा उल्लेख आहे. १७६० सालं रघुनाथराव पेशव्यांनीं हा गांव लुटूं नये, म्हणून स्थानिक लोकांनीं त्यांस ६०००० रुपये दिले. हा निजामाच्या राज्यांतील सरहद्दीवरील जिल्हा असल्यामुळें, निजाम येथें २०००० सैन्य ठेवीत असे.
१९ व्या शतकाच्या आरंभापासून वऱ्हाड ब्रिटिशांकडे जाईपर्यंत येथें जमीनदार, तालुकदार, रजपूत आणि मुसुलमान यांमध्यें परस्पर लढाया नेहमीं होत असत. हल्लीं मलकापुर हें महत्त्वाचें व्यापाराचें ठिकाण असून तेथें बरेच सरकी काढण्याचे व कापूस दाबण्याचे कारखाने आहेत. येथें १९०५ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथून बुलढाण्यास मोटार-सर्व्हिस चालू आहे.