विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मयुरसिंहासन- शहाजहाननें हें प्रसिद्ध सिंहासन तयार करविलें. त्यानें मोंगल खजिन्यांतून सुमारें ८६ लाख किंमतीचीं चांगली रत्नें निवडून काढिलीं; आणि १ लक्ष तोळें सोनें (किंमत १४ लाख रुपये) खरेदी करून कसबी सोनार कामावर बसविले; आणि बेबादखान याच्या देखरेखीखालीं हें नवीन मयूरसिंहासन तयार करविलें. हें काम सात वर्षें चाललें. सिंहासनाची लांबी सव्वा तीन, रुंदी अडीच व उंची ५ यार्ड होती. त्याला बारा कोन व बारा खांब होते. वर मधोमध एक लहानसें झाड असून प्रत्येक खांबाच्या शिखरावर दोन दोन मोर होते. एवढयाचवरून त्यास मयूरसिंहासन नांव पडलें. वर जाण्यास तीन रत्नखचित पायऱ्या असून, अकरा बाजू कठडे बसवून बंद केलेल्या होत्या. बारावी बाजू प्रवेशाची असून उघडी होती. आंतल्या बाजूस एका फारशी कवीची वीस कवनें कोरविलेलीं होती. ह्या सिंहासनास लागलेल्या साहित्याची किंमत एक कोट रुपये असून, त्याशिवाय मजुरी निराळी होती. ता. १२ मार्च स. १६३५ रोजी ह्या सिंहासनावर शहाजहान प्रथम बसला. नादीरशहानें परत जातांना हें सिंहासन इराणांत नेलें. त्याच्या नंतरच्या शहांनीं कांहीं दिवसांनीं तें मोडलें. लॉर्ड कर्झन जेव्हां इराणांत गेला होता तेव्हां त्यानें याचा तपास केला. सांप्रत याच्यापैकीं कांहीं रत्नें इराणच्या राजाच्या कोशागारांत आहेत.