विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मनूची (१६३९-१७१७) एक इटालियन प्रवासी. निकोलो मनूची हा व्हेनिसचा असून तो सन १६५६ पासून सन १७१७ पावेतों हिंदुस्थानांत निरनिराळया ठिकाणीं फिरत होता. शिवाजीची व जयसिंगाची भेट झाली तेव्हां तो जयसिंगाजवळ तोफखानाकामगार असून, संभाजी पोर्तुगीजांशीं लढत असतां, त्यांच्याकडून वकील म्हणून तो संभाजीकडे गेला होता. तो लोकांत मिसळणारा असून त्याचें बहुतेक आयुष्य मोंगलांच्या दरबारी गेलें. औरंगझेबाचा वडील पुत्र शहाअलम (मुअज्जम) याजपाशीं मनूची डॉक्टर म्हणून पुष्कळ वर्षे राहिला. तो मद्रास येथें मरण पावला; तेव्हां त्याजपाशीं दीड लाखाची संपत्ति होती. ह्यानें मोंगला बादशाहीचा तत्कालीन वृत्तान्त विस्तृत व खुलासेवार लिहिलेला आहे. त्याचें भाषांतर विल्यम आयर्व्हिन यानें चार भागांत प्रसिद्ध केलें. संभाजीसंबंधानें जो सुमारें शेंपन्नास पानें मजकूर आहे त्यावरून संभाजीच्या पराक्रमाविषयीं आदर वाटूं लागतो, आणि पोर्तृगीज, व इंग्रज व मोंगल बादशहा यांनां त्याची केवढी दहशत पडली होती हें स्पष्ट कळून येतें. मनूची सर्व मराठयांनां 'शिवाजी' हेंच नांव देतो. (आयर्व्हिन-स्टोरिओ द मोगोर; मराठी रियासत, १.)