विभाग आठरावा : बडोदें ते मूर       

मनु- एक अति प्राचीन व्यत्तिच्. ॠग्वेदामध्यें मनु अगर मनुस् हा मनुष्यजातीचा आदिपुरुष हाये असें म्हटलें आहे. तसेंच तो दैवी व मानवी अशा दोन्हीं तेजांनीं युक्त होता असें त्याचें वर्णन करण्यांत आलें आहे. एके ठिकाणीं त्याला आदित्य विवस्वानाचा मुलगा म्हटलें आहे तर ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असेंहि त्याचें क्वचित वर्णन करण्यांत आलें आहे; व या नात्यानें त्याला स्वायंभुव असें नांव दिलेलें आढळतें. प्रजापति या नात्यानें त्याला यज्ञाच्या वेळीं पाचारण केलें जातें. मैत्रायण ब्रह्मोपनिषदांत एके ठिकाणीं त्याला ब्रह्म म्हटलें आहे. निरक्तांमध्यें त्याला स्वर्गीय देवता असें म्हटलें आहे. त्याच्या मानुषी स्वरूपाचेंहि वेदादिकांमध्यें वर्णन आलेलें आहे. तैत्तिरीय संहितेंत, त्याला कुटुंबाचा पिता असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत तर जागोजाग मनुष्यजातीचा जनक असा त्याजविषयीं उल्‍लेख सांपडतो. मनूनें मानवजात कशी निर्माण केली यासंबंधीची कथा शतपथ ब्राह्मणांत दिली आहे (वेदविद्या, पृ. १५८ पहा). जगालाच्या प्रलयाच्या वेळीं एका माशाच्या उपदेशानें मनु हा एकटाच जिवंत राहिला, त्यानें संततीसाठीं उग्र तपश्र्चर्या केली. त्यासाठीं त्यानें पाकयज्ञ केला, त्या यज्ञांत दिलेल्या हवींपासून इळा नांवाची एक स्त्री निर्माण झाली व तिच्यापासून पुढें मनूचा वंश निर्माण झाला (कित्ता, प. २३० पहा). मानवजातीचा मूळ पुरुष या नात्यानें मनूला ज्याप्रमाणें संबोधण्यांत येतें त्याचप्रमाणें, मनुष्यजातींतील समाजव्यवस्था व धर्मव्यवस्था लावणारा असाहि त्याचा उल्‍लेख आढळतो. वेदादि ग्रंथांचें ज्ञान प्रथमतः याला झालें व यानेंच पुढें यज्ञसंस्था व धर्म यांची स्थापना केली असेंहि म्हटलेलें आहे. ऐतरेय ब्राह्मणांत राजाच्या अभिषेकप्रसंगीं म्हणावयाच्या मंत्रांत प्रजाप्रतीनें इंद्र, सोम इत्यादिकांप्रमाणें मनूलाहि अभिषेक केला असें म्हटलें आहे. याच कल्पनेच्या पायावर पुढें मनूला मानवजातीचा पहिला राजा असें म्हटलें असून त्याच्यापासून पुढें राजवंश निर्माण झाले असे उल्‍लेख आले आहेत. यज्ञसंस्थेचा व तद्विषयक विधींचा निर्माता या नात्यानें त्याचे ॠग्वेद, यजुर्वेद, शतपथ ब्राह्मण इत्यादि ग्रंथांमध्यें उल्‍लेख आलेले आहेत. आपस्तंबसूत्रामध्यें माणसांनां वगळून सर्व देव, ब्रह्मदेवाकडे यज्ञाबद्दलचें फळ मागण्याकरितां स्वर्गांत गेल्यानंतर मागें उरलेल्या मानवजातीला मनूनें श्राद्धषवधि करण्याचा उपदेश केला अशी कथा आहे व याच्या आधारें महाभारतांत त्याला श्राद्धदेव असें विशेषण लावण्यांत आलें आहे. त्याला मंत्रद्रष्टा असेंहि म्हटलेलें असून त्याच्या नांवावर कांही सूक्तेंहि आढळतात. छांदोग्योपनिषदांत प्रजापतीनें मनूला व मनूनें मानवजातीला हें उपनिषद् सांगितलें अशी कथा आहे. तात्पर्य, मनुष्यजातीचा मूळ पुरुष, धर्मव्यवस्थेचा जनक, मंत्रद्रष्टा, यंज्ञसंस्थेचा निर्माता इत्यादि विशेषणें मनूला लावलेलीं आढळतात. अशा रीतीनें, मनूला प्राचीन ग्रंथांतून अत्यंत उच्च स्थान प्राप्त करून देण्यांत आलें व 'यन्मनुरब्रवीत तद्भेषजम्' अशा प्रकारची मनूला योग्यता प्राप्त झाली होती असें दिसतें. पुढें पौराणिकांनीं व इतिहासकारांनीं मनूसंबंधीं निरनिराळया प्रकारच्या कथा प्रचलित केल्या.

सार्वराष्ट्रीय पुराणामध्यें मनु हा अगदीं पहिला राजा समजला जातो. मनु किंवा मनुस् नांवाचा राजा ॠग्वेदांतील मंत्रांमध्यें अंगिरस व ययाति या नांवाच्या राजांबरोबर आला आहे.

मिसर देशांतील नील नदीवर वसाहत करून ज्यानें लोकांस धर्म व आचार शिकविले, त्या राजाचें नांव मेने असें आंग्ल भाषेंत लिहिण्याचा संप्रदाय आहे. मेने यास मिसर देशांतील आदिराजा समजतात.

आशियामायनरमध्यें सुधारणेचा पाया अति प्राचीनकाळीं मानिस नांवाच्या राजानें घातला असें म्हणतात. प्राचीन ग्रीक लोकांमध्यें मिनोस नांवाचा पहिल्यानेंच कायदे करणारा म्हणून प्रसिद्ध होता. रूमी लोक आपल्या पितारांस 'मेनिस' म्हणत. तेव्हां मनूबरोबर किंवा मनु नांवाच्या लोकांबरोबर रूमी लोक आपला जन्यजनकभावसंबंध लावीत हें उघड होय.

असुरांमध्यें जो अगदीं पहिला राजा झाला त्याला मोलोक किंवा मोलोच म्हणत. मोलोक यानें असुरांस पहिल्यानें सुधारलेलें दिसतें. मोलोक या राजास असुरांमध्यें देवत्वहि मिळालें होतें.

तेव्हां जरी मनु, मनुष्य, मनुज्, व मानव वगैरे शब्द मनुष्यमात्रास लाविले जातात, तरी मूळचा त्या शब्दाचा अर्थ ''विशिष्ट लोक'' असाच समजावा. ज्याप्रमाणें इतर प्रजापती कल्पिलेले आहेत, त्याप्रमाणें मनु हाहि एक प्रजापति कल्पिलेले आहे. राजांचा किंवा क्षत्रियांचा गोत्रकर्ता एकच समजला जातो, व त्या राजर्षीस मनु हा शब्द लाविला जातो. तेव्हां राजे किंवा क्षत्रिय हा जो चार वर्णांमध्यें दुसरा वर्ण तो मनूची संतति ठरतो. क्षत्रियांस ब्राह्मणांप्रमाणें निरनिराळें गोत्र जरी नाहीं, तरी गोत्राचा उच्चार करणें असल्यास मानव, ऐल, व पौरूरवस हे त्यांचे तीन प्रवर समजावे असा निर्देश आश्वलायनानें प्रवराध्यायांत केला आहे. मनूचें आद्य स्थान कोसल देश समजला जातो, पण यास निस्संदिग्ध प्रमाणें मिळत नाहींत असें रा. भागवत म्हणतात (वि. वि. पुस्तक २३.)

(२) मनु हें नांव साधारण आहे. एका ब्रह्मकल्पांत चवदा मनु होऊन जातात. प्रत्येक मनूच्या कालसत्तेस मन्वंतर म्हणतात. एक मन्वंतर एकाहत्तर पर्याय (चौकडया) व वरती कांहीं काळ इतकें असतें. प्रस्तुतचा श्वेतवाराहकल्प चालू झाल्यापासून स्वायंभू, स्वारोचिष्, उत्तम, तामस, रैवत आणि चाक्षुष इतके मनु व त्यांचीं मन्वंतरें होऊन गेलीं असून सांप्रत वैवस्वत नांवाच्या मनूचे सत्तावीस पर्याय व अठ्ठाविसाव्या पर्यायांतील कृत, त्रेता, द्वापार, आणि कलीचीं चार सहस्त्र नऊशें सत्त्याहत्तर वर्षें गत झालीं आहेत. शेष कलियुग आणि त्रेचाळिस पर्यायासहित वरील काल गेला म्हणजे हें मन्वंतर पूर्ण होऊन पुढें सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, देवसावर्णि, आणि इंद्रसावर्णि हे मनु होतील व चवदाव्या मनूची कालसत्ता पूर्ण झाली असतां हा कल्प सरून ब्रह्मदेवाची रात्र होईल म्हणे नित्य प्रलय होईल. ती रात्र सरतांच वैराज नांवाचा सत्ताविसावा कल्प उजाडेल.

म न स्मृ ति.- मनूचा म्हणून हा धर्मग्रंथ प्रसिद्ध आहे. यालाच मानवधर्मशास्त्र असें दुसरें नांव आहे. मनुस्मृति हा ग्रंथ मनूनें रचिला अशी सर्वसाधारण समजूत आहे, तथापि तो त्यानें रचिला नाहीं असें निर्विवाद सिद्ध झालें आहे. मनुस्मृति अगर मानवधर्मशास्त्र हा ग्रंथ कृष्णयजुर्वेदाच्या मैत्रायणी शाखेच्या एक चरणाच्या मानवधर्मसूत्राच्या आधारें रचिला आहे असें बुल्हरनें अंतर्गत पुराव्यानिशीं सिद्ध केलें आहे. मानवधर्मसूत्राचा कर्ता मानवाचार्य असून पुढें प्रसिद्ध मनूच्या व त्याच्या नांवाच्या सारखेपणावरून मानवधर्मसूत्र हें प्रजापति मनूनेंच रचिलें असा समज उत्पन्न झाला असावा व त्यामुळें त्याची अतिशय प्रसिध्दी झाली असावी असें वाटतें. पुढें या मानवधर्मसूत्राच्या आधारें जी मनुस्मृति अगर मानवधर्मसंहिता रचिली गेली तीहि मनूनेंच रचिली अशी समजूत झाल्यामुळें अगर तशी समजूत करून देण्यांत आल्यामुळें मनुस्मृतीला एक प्रकारचें प्रामाण्य आलें असल्यास नवल नाहीं. खुद्द मनुस्मृति ही भृगूनें मानवधर्मसूत्रांत अनेक धर्मनियम भरीला घालून तयार केली कीं, मानवधर्मसूत्रामध्यें हळू हळू कालेंकरून निरनिराळया विद्वानांनीं भर घालून नंतर हल्‍लीची मनस्मृति तयार झाली असे दोन प्रश्र्न टीकाकारांनीं उपस्थित केले आहेत. भृगूनेंच मानवधर्मसूत्रांत भर घालून मनुस्मृति तयार केली असें बुल्हरनें सिद्ध केलें आहे. जॉली-प्रभृति विद्वान त्याच्याविरुद्ध आहेत. हल्‍लींची मनुस्मृति ही भृगूनें रचिली असें मनुस्मृतीच्या पहिल्या अध्यायांतील ५९ व्या श्र्लोकावरून सिद्ध होतें. पण मनूच्या नांवावर ती मोडली जाऊं लागल्यामुळें तिला लोकमान्यता मिळाली असें उघड दिसतें. खुद्द मनुस्मृतींतहि कांहीं भाग प्रक्षिप्त आहेत असें बुल्हर, जॉली, हॉपकिन्स इत्यादि विद्वानांनीं सिद्ध कलें आहे. ही भृगूनें तयार केलेली मनुस्मृति ख्रि. पू. २ऱ्या शतकापासून ते ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असें बुल्हर म्हणतो. डॉ. केतकर या ग्रंथाचा काल इ. स. २२७-३२० च्या दरम्यान धरतात (हिस्टरी ऑफ कास्ट). मनुस्मृतीला विलक्षण लोकमान्यता मिळाल्यामुळें तीवर पुष्कळांनीं टीका लिहिल्या आहेत. त्यांपैकीं मेघातिथ, सर्वज्ञ नारायण, कुल्लूकभट्ट, राघवानंद, नंदनाचार्य इत्यादिकांच्या टीका प्रसिद्ध आहेत.