विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मध्व- द्वैतमताचा प्रस्थापक आचार्य कर्नाटकप्रांतांत उड्डपीजवळ जरतपीठ म्हणून एक गांव आहे, त्या ठिकाणी याचा जन्म झाला. याच्या बापाचें नांव मध्वगेह व आईचें नांव वेदवेदी असे होते. अंनतेश्वराच्या उपसानमुळें हा मुलगा झाल्यामुळें त्याचें नांव वासुदेव ठेवण्यांत आलें. याच्या गुरूचे नांव अच्युतप्रेक्ष्याचार्यं असें होतें. वासुदेवाला लहानपणापासूनच संसाराचा कंटाळा असल्यामुळें, आपलें वेदाध्ययन संपल्यानंतर त्यानें संन्याशाश्रम स्वीकारला. संन्यासाश्रमीचें त्याचें नांव पूर्णप्रज्ञ होतें. त्यानें वेदांतशास्त्रांचें स्वतंत्र बुध्दीनें अध्ययन केलें होतें व त्यांतील प्रावीण्यानें खूष होऊन अच्युतप्रेक्ष यानें त्याचें आनंदतीर्थ हें नांव ठेवलें. पुढें त्यानें सर्व हिंदुस्थानभर संचार करून अद्वैतादि निरनिराळया विरोधी मतांचा आचार्यांबरोबर वाद करून त्यांच्यावर विजय मिळविला; व हिमालय, वदरिकाश्रम येथें जाऊन नंतर तो परत आपल्या देशाला आला. उडुपी येथें त्यानें कृष्णमूर्तीची स्थापना केली. यानें आपल्या मताची स्थापना करण्याकरितां ब्रह्मसूत्रावर, गीतेवर व इतर कांहीं उपनिषदांवर भाष्यें लिहिलीं. याचे प्रसिद्ध शिष्य पद्मनाभतीर्थ, नरहरितीर्थ, माधवतीर्थ व अक्षोभ्यतीर्थ हे चौघे होत.
मध्वाच्या काळासंबंधीं बराच मतभेद आहे, तथापि डॉ. भाण्डारकर यानीं आपल्या 'वैष्णविझम्, शैविझम् अँड अदर मायनर सेक्ट्स' या ग्रंथांत प्रतिपादन केल्याप्रमाणें तो शके १११७-११९८ या काळांत झाला असावा असें मानण्यास हरकत नाहीं. मध्व हा द्वैतमतवादी होता. द्वैत याचा अर्थ भेद होय. याच्या मतें स्वतंत्र व अस्वतंत्र अशीं दोन तत्त्वें आहेत. भगवान् विष्णु हा स्वतंत्र असून तो सर्व सद्गुणांनीं मंडित व दोषरहित आहे; तदितर सर्व अस्वतंत्र आहेत. जीवेश्वरभेद, जडेश्वरभेद, जीवाजीवभेद, जीवजडभेद, जडाजडभेद, असे पांच प्रकारचे भेद यानें मानले आहेत. सच्चिदानंदस्वरूपी परमात्मा हा या सर्व जगाचें मूळ कारण असून तो अंतर्यामी स्वरूपानें सर्व वस्तूंमध्यें रहातो. तो केवळ सुखाचाच तेवढा उपभोग घेतो, दुःखाचा त्याला स्पर्श देखील होत नाहीं. परमात्मा व जीव यांमध्यें मोक्षावस्थेंत देखील कधींच अभेद होत नाहीं. जो दिसतो तो केवळ भ्रम होय. मोक्षावस्थेमध्यें जीवाला मुळींच दुःख होत नाहीं. या अवस्थेमध्यें त्याला क्रीडादि अनेक प्रकारचीं सुखें उपभोगितां येतात. पण परमात्म्याचीं जीं लक्ष्मी, श्रीवत्स, व जगदुत्पादकशक्ति हीं तीन वैभवें तीं मात्र जीवाला प्राप्त करून घेतां येत नाहींत. सर्व जीवांनां सारखीच मुत्तचवस्था मिळत नाहीं. जीव हा ज्ञाता आहे तरी त्याचें ज्ञान क्षणैक आहे. मोक्षप्राप्तीसाठीं जीवानें परमात्म्याची अंकन (विष्णुचिन्हें अंगावर डागून घेणें), नामकरण व भजन या तीन प्रकारांनीं सेवा केली पाहिजे. श्री विष्णूच्या ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याहि साधनानें मोक्षाची प्राप्ति होत नाहीं. जीव हा सांश व निरंश आहे. या जगाची उत्पत्ति नित्य परमाणूपासून होते. सर्व गुणांनीं युक्त अशा विष्णूच्या ज्ञानानें आपलीं सांसरिक दुःखें नाहींशी करून जीवानें श्रीविष्णूच्या समीप आनंदानें वास करणें हाच मोक्ष होय असें मध्वानें म्हटलें आहे.
मा ध्व किं वा म ध्वा चा री.- भक्तिमार्गाच्या चार संप्रदायांपैकीं हा एक संप्रदाय आहे. या पंथांत विष्णूच्या खालोखाल वायूला फार महत्त्व आहे. रामाचा जसा हुनमान् तसा कृष्णाचा वायुपुत्र भीम (अर्जुन नव्हे) हा सखा होय. मध्वांच्या धर्मग्रंथांतून महाभारतांत भीमाचीं वर्णिलेलीं अनेक अचाट कृत्यें सोडून त्यानें मणिमत् राक्षसाला मारिलें (वनपर्व), हें एवढेंच त्याचें कृत्य महत्त्वाचें गणिलें आहे. मणिमत् हा शंकराचार्य व मध्व हा भीमावतार या दृष्टीनें माध्व या कथेकडे पहातात (माध्वांची 'मणिमंजरी' पहा). मोक्षप्राप्ति जर करून घ्यावयाची असेल तर वायूला (या युगांत मध्वाला) शरण जा असा या संप्रदायाचा उपदेश असतो. (कृष्णस्वामी अय्यर - श्री मध्व अँड मध्विझम्). मध्वाचा द्वैतवाद वर उल्लेखिलाच आहे. प्रत्येक मध्वानुयायानें डागून घेतलेंच पाहिजे असें आहे. माध्व लोक उपास फार करतात. यांचा मुख्य मठ उडुपी येथें असून मध्यतळ व सुब्रह्मण्य (मंगलोर जिल्हा) येथें आणखी दोन मोठे मठ आहेत. मुख्य मठाच्या आठ शाखा आहेत. प्रत्येक मठावरचा अधिकारी एक स्वामी असतो. त्याची मुदत दोन वर्षांची असते. तुळु विभागांत (धारवाड, उत्तर आणि दक्षिण कानडा जिल्हा व म्हैसूर संस्थानचा पश्चिम भाग यांत) मध्वांचा फार भरणा आहे. एकंदर लोकसंख्या सुमारें ७०००० असावीं.
इ. स. ९ व्या शतकाच्या आरंभीं दक्षिण हिंदुस्थानांत मणिसंप्रदायी इराणी लोकांनीं वसाहत करून मणिग्रामावर मालकी मिळविली होती. तेव्हां या मणिसंप्रदायी लोकामार्फत मध्वाला त्यांच्या मताची ओळख होऊन माध्वसंप्रदायांत या मताची छटा दिसूं लागली असावी. एरवीं क्षुद्र अशा मणिमत् राक्षसाला मारल्याचीच फक्त कथा महाभारतासारख्या दुसऱ्या अनेक मोठया महत्त्वाच्या व सुंदर कथांनीं भरलेल्या महाकाव्यांतून घेऊन तिला प्रतिष्ठेला चढविण्याचें कारण नव्हतें असा बर्नेल-ग्रीयर्सनप्रभृति पंडितांचा कयास आहे.