विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मध्यहिंदुस्थान- या भागात बहुतेक देशी संस्थानेंच आहेत. हा प्रदेश उत्तर अक्षांश २१० २४' ते २६० ३२' आणि पूर्व रेखांश ७४० व ८३' यांच्यामध्यें आहे. झांशी आणि ललितपूर या ब्रिटिश जिल्ह्यांमुळें मध्यहिंदुस्थानचे दोन भाग झालेले आहेत. पूर्वेकडील भागांत बुंदेलखंड आणि वाघेलखंड असून पश्चिमेकडे खरा मध्यहिंदुस्थान आहे. मध्यहिंदुस्थानचें क्षेत्रफळ ५१५०५ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ५९९७०२३ आहे. येथील बहुसंख्याक लोक हिंदु आहेत. मध्यहिंदुस्थानांत मुख्य संस्थानें इंदूर, भोपाळ, धार, रेवा, जावरा, दतिया, ओच्छी हीं सात असून त्यांपैकीं भोपाळ आणि जावरा हीं दोन मुसुलमानीं असून बाकीचीं हिंदु आहेत. याशिवाय लहान लहान संस्थानें अनेक असून तीं वरील मोठया संस्थानांचीं मांडलिक आहेत. या छोटया संस्थानांची संख्या १५३ आहे. ब्रिटिश नियंत्रणाच्या सोयीकरितां या संस्थानांचे पुढील विभाग (एजन्सी) बनविले आहेत. वाघेलखंड एजन्सी, हींत १२ संस्थानें (मुख्य संस्थान रेवा); भोपाळ एजन्सी, हींत १९ संस्थानें (मुख्य संस्थान भोपाळ); सदर्न स्टेट्स एजन्सी, हींत २१ संस्थानें (मुख्य संस्थान धार); बंदेलखंड एजन्सी, हींत २२ संस्थानें (मुख्य संस्थान दतिया व ओर्च्छा); इंदूर रेसिडेन्सी, हींत ९ संस्थानें (मुख्य संस्थान इंदूर ) आणि माळवा एजन्सी, हींत ३८ संस्थानें (मुख्य संस्थान जावरा). मध्यहिंदुस्थानचे भूपृष्ठदृष्टया सपाटी, पठार व डोंगराळ प्रदेश असे तीन विभाग आहेत. पठारी प्रदेशाला माळव्याचें पठार असें नांव असून तें विंध्य पर्वतापासून मारवाडपर्यंत पसरलेलें आहे. सपाट प्रदेश उत्तरेकडे बुंदेलखंड व वाघेलखंड या बाजूंनीं कैमूर पर्वतापर्यंत पसरला आहे, आणि डोंगराळ प्रदेश विंध्य आणि सातपुडा या पर्वतांच्या बाजूला आहे. डोंगराळ प्रदेशांत शेतकी फारच थोडी असून तेथें सर्व रानटी टोळया रहातात. यांपैकीं मुख्य संस्थानांचें क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि उत्पन्न प्रत्येकी पुढीलप्रमाणें आहेः -
संस्थान | क्षेत्रफळ | लोकसंख्या | उत्पन्न |
इंदूर | ९५१९ | ११५१५७८ | १२५ लक्ष रुपये |
भोपाळ | ६९०२ | ६९२४४८ | ५८ '' |
रेवा | १३००० | १४०१५२४ | ३७ '' |
धार | १७७७ | २३०३३३ | १३ '' |
जावरा | ६०१ | ८५७७८ | १० '' |
दतिया | ९११ | १४८६५८ | ११ '' |
ओर्च्छा | २०७९ | २८४९४८ | १० '' |
या संस्थानांची माहिती स्वतंत्र आढळेल.