विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मध्यदेश- सांप्रत, मध्यदेश गंगा व यमुना या दोन नद्यांमधील प्रदेशाला म्हणतात. ('बुद्धपूर्व जग' पृ. २३२ पहा). पौराणिक कालांत मध्यदेशाची मर्यादा सरस्वती नदी गुप्त होते त्या स्थळापासून म्हणजे भटनेरपासून अलाहाबादेपर्यंत होती. ही पूर्व-पश्चिम मर्यादा असून उत्तरेस हिमालय पर्वत व दक्षिणेस विंध्याद्रि पर्वत होता. यांमधील सर्व भाग मध्यदेशांत समाविष्ट होत होता. विद्या, कला, वगैरे दृष्टींनीं पहातां एका वेळेला येथें ब्राह्मणांचे वर्चस्व कळसाला पोचलें होतें. या भागाला हिंदु लोक 'पवित्र भूमि' समजून मान देतात. सहाव्या शतकांत होऊन गेलेल्या वराहमिहिरानें मध्यदेशाची मर्यादा पुढीलप्रमाणें दिली आहेः - पश्चिमेस मारवाडपासून यमुना नदीच्या तीरावरचा भाग व विंध्याद्रि ही दक्षिण सरहद्द. अल्बेरूणीनें कनोजच्या सभोंवतालच्या प्रदेशाला मध्यप्रदेश म्हटलें आहे.