विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मधुरा- ज्या तापापासून शरीरावर पुटकुळया, पुरळ, फोड येतात त्यास सामान्यतः विस्फोटक ज्वर असें म्हणतां येईल. विस्फोटक ज्वरांत देवी, गोंवर, मधुरा अशा विशिष्ट जाती आहेत. मधुऱ्याच्या तापाची मुदत बारा दिवसांपासून वीस दिवस किंबहुना तीस दिवसपर्यंत देखील जाते. हा ताप बहुधा उन्हाळयांत येतो; हा सांथीनें येतो. लहान मुलांवर याचा अम्मल विशेषेंकरून असतो, तथापि कधी कधी पंधरा वीस वर्षांच्या वयाच्या मनुष्यांस देखील हा ताप येतो. या तापांत रोग्यास थोडासा घाम येतो, पण हींवतापाप्रमाणें केव्हांहि हा अगदीं नाहींसा होत नाहीं. ताप भरण्याची वेळ बहुधां रात्रीं असते. या तापाच्या भरामध्यें शरीरांतील उष्णतेचें मान १०४० ते १०५०पर्यंत वाढतें. तें सकाळच्या वेळीं १०१० पासून १०२०पर्यंत तरी असतेंच, यापेक्षां कमी सहसा होतच नाहीं. तापाच्या भरांत रोगी बडबडतो. लहान मुलें दचकतात, रोग्यास उलटया होतात, हगवण लागते, तहान फार असते. रोगी तळमळ फार करतो, निद्रानाश असतो तथापि तापामुळें गुंगींत पडून रहातो, तोंड, जीभ, नाक, हीं लाल होऊन उतून येतात, अन्न खाण्याची इच्छा रहात नाहीं. कोरडी ढांस लागते. या तापावर पहिला उपचार म्हटला म्हणजे रोग्यास कडूलिंबाच्या पाण्यानें स्नान घालणें हा होय. किंवा मनुका, पित्तपापडा, नागरमोथा, खारीक, गुळवेल अशा प्रकारच्या सौम्य जिन्नसांचा काढा सकाळसंध्याकाळ द्यावा. देवी, गोंवराच्या तापाप्रमाणें या तापासहि औषध देण्याची फारशी गरज नाहीं. स्वाभाविक गतीनें औषध देण्याची फारशी गरज नाहीं. स्वाभाविक गतीनें आपोआप मधुरा बाहेर पडतांच रोगी हुषार होतो. (भिषग्विलास, पु. १४)