विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मधुपुर- पूर्वबंगालमधील एक विस्तीर्ण जंगली प्रदेश. हा डाकच्या उत्तरेकडे पसरत जाऊन मैमनसिंग जिल्ह्याच्या मध्य भागापर्यंत (नशिराबाद शहराजवळ) पोंचला आहे. हा प्रदेश फार उंचवटयाचा नसून सपाट आहे. तरी उंचसखल भाग-कित्येक ठिकाणीं ४०-१०० फूट उंचीपर्यंत - आढळेल. हिमालयपर्वताच्या पायथ्याशीं ज्या प्रकारचें रमणीय जंगल नजरेस येतें त्या प्रकारचेंच मधुपुर जंगल आहे. येथें मध व मेण यांचा व्यापार बराच चालतो. अलीकडे रेल्वे झाल्यापासून मधुपुर जंगलापर्यंत कित्येक नवे रस्ते तयार झाले असून कांहीं भागांत लागवड केली जात आहे.