विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मध- हा एक गोड, काकवीसारखा दाट द्रव आहे. फुलांतील अमृतकोशांतून एक प्रकारच्या माशा तो जमा करतात. त्या माशांस मधमाशा म्हणतात. यांच्या अनेक जाती आहेत. मध फुलांतून काढून त्या माशा तो पोळयांत सांठवितात. पोळयांत मध सांठविण्यासाठीं लहान लहान घरें केलेलीं असतात. पोवळयांत ठेवल्यानंतर त्याचें रूपांतर होतें, कीं तो फुलांत असतो त्याचप्रमाणें राहतो याविषयीं निश्र्चयानें सांगतां येत नाहीं. मेक्सिको देशांत मधाच्या मुंग्या असतात. यांच्या पोटाजवळ एक पिशवी असते, या पिशवींत मध असतो व ती पिशवी मधानें भरलेली म्हणजे ओल्या द्राक्षाप्रमाणें (अंगुराप्रमाणें) दिसते.
निर्द्रव व उष्ण हवेंत फुलांत मध पुष्कळ असतो. अशीं एक म्हण आहे कीं, जेथें उत्तम मध सांपडतो तेथें उत्तम लोंकर सांपडते. कित्येकांचें असेंहि मत आहे कीं, फुलांनां मधामुळेंच सुवास येतो. तरी कांहीं फुलांनां वास मुळींच नसतां त्यांत मध पुष्कळ असतो. मध फुलांतच असतो असें नाहीं तर झाडांच्या पानांत देखील मधुवाहक नळया असतात. मधांत साधारणपणें साखर, पाणी, मेण, रंग व क्वचित् तेल हे पदार्थ असतात. याचें विशिष्टगुरुत्व १.४१ असतें. मध उन्हांत ठेवून मग थंड केला तर तो रवाळ होतो. मधांत, पिष्ट, कणीक, सरस, खडू, साखर, व पाणी या पदार्थांची भेसळ करतात. कांहीं जातींचा मध विषारी असतो. ट्रिबिझाँड येथील फुलांपासून निघालेला मध मद्याप्रमाणें अम्मल चढवितो. इराण देशांतील मधास वाईट घाण येते.
प्राचीन काळीं साखरेच्या ऐवजी मधाचा औषधांतहि उपयोग करीत असत. आर्य वैद्य सुश्रुत यानें मधाच्या आठ जाती सांगितल्या आहेत; पैकीं अर्घ्य, छात्रेक, औद्दालक व दालक या चार उपलब्ध आहेत. पौरस्त्य देशांत फळें व पक्ष्यांची अंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीं मधांत घालून पाठवितात. आतिथ्यप्रसंगीं हिंदु लोकांत मध व दूध किंवा मध व दहीं मिळून मधुपर्क तयार करतात. लग्नाच्या वेळी सासुरवाडीस गेल्यावर वरास मधुपर्क देतात. नुकत्या उपजलेल्या मुलाच्या तोंडास मधाचें बोट लावितात. अरब लोक मध व मलई एके ठिकाणीं मिसळून खातात. मादागास्करमध्यें राणी व तिचे पाहुणे वर्षप्रतिपदेच्या दिवशीं मध व भात जेवतात. व त्याच देशांत सुंता करतांनां मध व पाणी डोक्यावर शिंपडतात. पेरू देशांतील लोक मध सूर्यास अर्पण करीत असत.
मध काढण्याची रीत फार निर्दयपणाची वाटते. पोळीं काढतांना मधमाशांनां भाजण्यांतहि येतें. कांही देशांतून मधमाशा पाळतात. मातीची गोल नळकांडीं केलेलीं असतात. त्यांस दोन बाजूंस बारीक भोकें ठेवितात. त्यांत मधमाशा पोळें बांधितात. तें मधानें भरलें म्हणजे ती नळकांडी फोडून मध काढून घेतात.
हिंदुस्थानांत मधमाशांचें संवर्धन करण्याचा धंदा खालच्या दर्जाचा गणला जातो. कोठें कोठें डोंगरांतील लोक हा धंदा करतांना आढळतात. हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश या ठिकाणीं मधमाधा सर्वत्र विपुल आहेत व मध आणि मेण यांचा पुरवठा पुष्कळ असून चांगल्या प्रकारचा आहे.