विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मदुरा, जि ल्हा.- मद्रास इलाख्यांतील पूर्व किनाऱ्यावरचा एक जिल्हा. याचें क्षेत्रफळ ८७०१ चौरस मैल आहे. मदुरेच्या उत्तरेस कोइमतून व त्रिचनापल्ली हे जिल्हे असून पुदुकोट्टा संस्थान आहे; ईशान्येस तंजावर; पूर्वेस पाल्कची सामुद्रधुनी व मानारचें आखात आणि दक्षिणेस तिनवेल्ली जिल्हा आहे. मदुरा जिल्हा सपाटीवर असून समुद्राकडे उतरत गेलेला आहे.
जिल्ह्यांतील मुख्य नदी वैगाय असून वलष्णाद टेंकडीवर तिचा उगम होतो. हिच्या खालोखाल गुंदरा व वर्षली या महत्त्वाच्या नद्या आहेत. येथील हवा कोरडी व उष्ण असते. पलनी डोंगरावरील हवा, हिंदुस्थानांत अतिशय चांगली हवा ज्या ठिकाणीं असते त्या ठिकाणांमध्यें उत्कृष्ट आहे. पलनी सोडून मदुरा जिल्ह्यांतील पावसाचें मन २६ पासून ३६ इंच असतें. जिल्ह्याच्या इतिहासाकरितां 'नायक राजे' पहा.
प्राचीन अवशेष.- पलनी येथें जे पुरातन अवशेष आढळतात. त्यांवरून पांडय राजे राज्य करीत असतां ग्रीक व रोमन लोकांचा पांडयाच्या फौजेंत पुष्कळ भरणा होता असें दिसतें. वैगाय नदीच्या भगदाडांतून अजूनपर्यंत ग्रीक व रोमन नाणीं पुष्कळ सांपडतात. यावरून त्या काळीं पुष्कळसे रोमन व्यापारी हिंदुस्थानांत येऊन व्यापार करीत होते असें सिद्ध होतें. बौध्दंचीं नाणींहि बरींच आढळल्यावरून बौद्धधर्माचा प्रसार पांडयांच्या वेळेस होता असें म्हणावयाला हरकत नाहीं. मदुरा येथील प्रसिद्ध शिवालय. त्रिमल नाईकाचा वाडा व रामेश्वराचें भव्य मंदिर हीं प्रेक्षणीय आहेत.
वस्ति व उद्योगः- मदुरा जिल्ह्यांत ११ शहरें असून १०९७ खेडीं आहेत. १९२१ सालीं लोकसंख्या २००७०८२ होती. जिल्ह्यांत ८ तालुके असून रामनाद व शिवगंगा या दोन मोठया जमीनदाऱ्या आहेत. जिल्ह्याचें मुख्य शहर मदुरा आहे. मुख्य भाषा तामिळ असून शें. ८० लोक तामिळ भाषा, १३ तेलुगू व ४ कानडी बोलणारे आहेत. जिल्ह्यांत नाना प्रकारच्या जाती आहेत : उदा. वेल्लळ (यांनां पिल्लन म्हणतात), पलज्न हे बहुधां शेतकीवर उपजीविका करतात; कलज्न बहुधां गुन्हे करणारे असून त्यांच्या उपजाती १० आहेत; इदैथन अथवा धनगर, वलैयन, परैया, मरवन (जमीनदारांची नोकरी करणारे, चेट्टी (व्यापारी), नोतियन (यांत बऱ्याच जमीनदारांचा समावेश होतो), पतनूलकारन (हे मूळचे गुजराथ देशांतले), व बाकीच्या डोंगराळ जाती आहेत. शेतकी करून उपजीविका करणाऱ्या लोकांची संख्या शेंकडा ७५ आहे. जिल्ह्यांत जमीनदारी, व रयतवारी जमीन बहुतेक निम्मेनिम आहे. दिंदिगल, परैकुलम् व पलनी तालुक्यांतून पिकें फार उत्तम प्रकारचीं येतात. उतरणीवर कॉफीची लागवड सुरू आहे. तलावांचीं संख्या ४०८१ असून एवढी संख्या मद्रास इलाख्यांत इतर जिल्ह्यांत कोठेंहि नाहीं. अलीकडे परैयर नदीवर कालवा झाल्यामुळें शेतकीची बरीच सुधारणा झाली आहे. राखीव जंगल ६१९ चौरस मैल आहे. १९२१-२२ सालीं जंगल उत्पन्न सुमारें १६८००० रुपयें होतें.
खनिजः- भेलूर तालुक्यांत कोटमपट्टी येथें उत्तम प्रकारचें लोखंड सांपडतें. दिंदिगल परगण्यांत वैगाय नदींत कमी दर्जाची सुवर्णमिश्रित वाळू सांपडते. समुद्रकिनाऱ्यावर सूर्याच्या उष्णतेनें समुद्राच्या पाण्याचें मीठ अनायासें तयार होतें. तिरुचुलू तहशिलींत पेन्सिली व चुनखडीचे दगड सांपडतात. रामनाद जमीनदारांत लाल स्फटिक दगडाची खाण असून देवालयांतील मोठमोठें खांब याचेच करण्याची चाल आहे. पंबम बेटांत पोंवळीं पुष्कळ सांपडतात.
व्यापारः- मदुरा जिल्ह्यांत मुख्यतः रेशमी कापड होतें. कच्च्या रेशमाचा पुरवठा कलकत्ता, मुंबई, कोलीगाळ व बंगलूरकडून होतो. रंगाची कला कमी अवगत आहे असें मुळींच नसून रंग तयार करण्याचें काम त्रासाचें व खर्चाचें असल्यामुळें अलीकडे मंदावलें आहे. एका वेळेस मदुरा येथें उत्तम लाल रंग होत असे. दिंदिगल येथील विणकामाची अशीच प्रसिद्धि होती. मेलूर, दिंदिगल व पलनी या तालुक्यांतून बायका घोगडया विणतात. चामडें रंगविण्याचेहि कारखाने लहान प्रमाणावर असून तांब्या-पितळेचीं स्वयंपाकाचीं भांडीं व दिवे सण्णमदुरै व दिंदिगल येथें चांगलीं तयार करतात. मदुरा जिल्ह्याचें व्यापारी केंद्र मदुरा असून हें शहर इलाख्यांत दोन नंबरचें आहे. येथील व्यापार मोठया प्रमाणावर असून रेल्वेचें उत्पन्नहि मोठें आहे. कोइमतूर, त्रिचनापल्ली व तिनवेल्ली या जिल्ह्यांशीं व्यापारी घडामोडी नेहमीं चाललेल्या असतात. मदुरेहून बाहेरगांवीं जाणाऱ्या जिन्नसांत तांदूळ, बकरी, गुरें, तंबाखू, मसाले व वेलदोडे हे असून तिनेवेल्लीहून मीठ, ब्रह्मदेशाहून साग वगैरे जिन्नस आयात होतात. अंतर्गत व्यापार कोइमतून खेरीजकरून इतर कोणत्याहि मद्रास इलाख्यांतील जिल्ह्यापेक्षां जास्त आहे. दर्याव्यापार देवीपट्टम, किलकरैं, पंबम व तोंडी या ४ बंदरांतून होतो.
मदुरा, दिंदिगल, पलनी, पेरियकुलम् व कोडैकानल या ५ ठिकाणीं म्युनिसिपल कमिटया आहेत. इतर ठिकाणचीं स्थानिक कामें जिल्हा व तालुकासभांतून होतात. दर दहा हजारी १७६६ लोक साक्षर आहेत.
ता लु का.- हा तालुका जिल्ह्याच्या मध्यभागीं असून क्षेत्रफळ २६७ चौरस मैल आहे. लोकसंख्या १९२१ सालीं २७५९४८ होती. तालुक्याचें मुख्य ठिकाण मदुरा आहे. तालुक्यांतील खेडयांची संख्या २३० आहे. काळीचें उत्पन्न सुमारें ६ लाख आहे. तालुक्यांतून वैगाय नदी वहात जाते. उत्तरेस सिसमलाय व पश्चिमेस नागमलाय डोंगर आहेत.
श ह र.- मदुरा जिल्हा, पोटविभाग व तालुका यांचें मुख्य ठिकाण. हें वैगाय नदीच्या दक्षिणकिनाऱ्यावर असून साऊथ इंडियन रेल्वेचें स्टेशन आहे. येथून मंडपमला एक रेल्वेचा फांटा गेला. येथील लोकसंख्या (१९२१) १३८८९४ असून हें मद्रास इलाख्यांत दुसऱ्या नंबरचें शहर आहे. शहराचा प्राचीन इतिहास फार मोठा असून ख्रिस्ती शकाच्या पूर्वीच्या पांडय राजांपासून त्याचा आरंभ होतो. पुढीलज नायक राजांच्या अमलांतील इतिहास 'नायकराजे' या लेखांत दिला आहे. त्यापुढील माहिती फारशी नाहीं. मुसुलमानांनीं उत्तरेकडून वारंवार हल्ले करून शहरांतील लोकांनां क्रूरपणानें वागवावें, देवालयाची नासधूस करावी, कोटाच्या भिंती पाडून टाकाव्या, असा क्रम चालला होता. पण एवढया अरिष्टांतून सुंदरेश्वराचें व मीनाक्षीचें देऊळ मात्र वांचलें. त्रिमल नायकाचा वाडा म्हणजे मद्रास इलाख्यांतील शिल्पशास्त्रचा एक उत्कृष्ट नमुना म्हणतां येईल. याच राजवाडयांत दुसरें महत्त्वाचें स्थळ म्हणजे सुंदरेश्वराचें हवा खाण्याचें स्थळ होय. वैगाय नदीपासून १॥ मैलावर असलेला रेमाकुलमू नांवाचा एक तलाव त्रिमल नायकानें बांधलेला आहे. याच्या मध्यभागीं एक बेटासारखा चौथरा असून त्यावरहि एक लहानसें देऊळ आहे. तलावाच्या चोहोबाजूंनीं स्फटिकाची फरशी करून वर दीपोत्सव होतो, त्यावेळेस सुमारें एक लाख दिवे लागतात. सन १८६६ पासून मदुरा शहरांत म्युनिसिपालिटी स्थापन झाली. मदुरा शहरांतील मुख्य धंदा विणकरीचा आहे. मदुरा येथें २ पाठशाळा आहेत. मदुरा कॉलेज व अमेरिकन कॉलेज अशीं दोन कॉलेजें आहेत. दुसऱ्या शिक्षणाच्या संस्था म्हणजे सेतुपती, सौराष्ट्र वगैरे हायस्कुलें व अमेरिकन मिशन शाळा, शिवाय उद्योगधंद्यांची एक शाळा वगैरे होत. या गांवीं ५।६ नियतकालिकें निघतात. दोन कापडाच्या गिरण्याहि आहेत.