विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मदनपूर- संयुक्तप्रांत, झांशी जिल्हा. महरोनी तहशिलींतील एक लहान गांव. विंध्यपर्वतावर जाण्याला जी एक सुगम वाट घाटामधून गेलेली आहे त्या वाटेवर मदनपूर वसलेलें असून गांवाजवळ एक सुंदर तलाव आहे. तलावाच्या कांठावर दोन फार सुंदर देवालयें बांधलीं असून जुन्या इमारतींचीं असंख्य अवशेषें दृष्टीस पडतात. एका देवालयावर असा (शिला) लेख आहे कीं, ११८२ सालीं दिल्लीच्या पृथ्वीराजानें चंदेल राजाचा पराभव केला. गांवाच्या जवळच उत्कृष्ट शुभ्र दगडांची एक खाण आहे. पूर्वी याच खाणींतून अशोधित लोखंड पुष्कळ काढलें जात होतं.