विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मत्स्यपुराण- अठरा पुराणांपैकीं एक. पुराणवाङ्मयांतील प्राचीन पुराणांपैकीं हे एक आहे; निदान जुन्यांपैकीं ज्यांचा बराच भाग शिल्लक आहे अशा पुराणापैकीं हें आहे. तसेंच 'पुराण' या शब्दाच्या व्याख्येप्रमाणें हें लिहिलेलें आहे. याच्या सुरवातीला जलप्रलयाची कथा दिली असून तींत विष्णूनें मत्स्यावतार घेऊन मनूला त्या प्रलयांतून वांचविलें; मनु बसला होता ती नाव त्या जलांतून तो मत्स्य ओढून नेत असतां मत्स्यरूपधारी विष्णु व मनु यांचें संभाषण झालें, हा या पुराणांतील मुख्य भाग आहे.यांत जगदुत्पत्तीचें सविस्तर वर्णन आहे. नंतर वंशावळी आहेत. एका भागांत स्वर्गस्थ पितृदेवता व त्यांची पूजा यांचें वर्णन आहे (अध्याय १४ ते २३). तसेंच नेहमींप्रमाणें भूगोल, खगोल, शकावली वगैरे विषयांची माहिती आलेली आहे. व्हिन्सेंट स्मिथच्या माताप्रमाणें या पुराणांतल्या आंध्र घराण्याच राजवंशावळी विश्वसनीय आहेत. या पुराणांत महाभारतांतला व हरिवंशातला पुष्कळसा भाग आला आहे. उदाहरणार्थ, ययातीची, सावित्रीची व दुसऱ्या कांही कथा. या बहुतेक कथांचें महाभारतांतील कथांशीं अगदीं अक्षरश: साम्य आहे. तथापि यांत अलीकडील मजकूरहि बराच सामील करण्यांत आला आहे. सर्व प्रकारचे सण व व्रतें (अध्याय ५३ ते ९१), प्रयाग-माहात्म्य (अध्याय ९२ ते १०१), काशी-माहात्म्य (अध्याय १६७ ते १७२), आणि नर्मदामाहात्म्य (अ. १७३ ते १८१) यांसारख्या पवित्र स्थानांचीं माहात्म्यें, राजधर्मावर आणखीं कांहीं भाग (२०३-२१४), शुभाशुभ शकून (२१५ ते २३०), घर बांधण्यासंबंधीचे विधी, देवालयें बांधणें व मूर्ति स्थापणें याबद्दल (२४५ ते २५७) तसेंच १६ प्रकारचीं पवित्र दानें (२६१-२७६) आणि इतर कित्येक विषयांवरहि आपणांस या पुराणांत माहिती सांपडते. विल्सनच्या मतानें हें शैव पुराण आहे; परंतु आफ्रंटनें दिलेल्या यांतील सारांशावरून यांस वैष्णवपंथाचेंहि म्हणतां येईल असें विंटरनिट्झ म्हणतो.