विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंत्री- शिवाजीच्या अष्टप्रधानांतील मंत्री हा एक होय. यास वाकनीस अशीहि संज्ञा असे. याजकडे खासगीची व्यवस्था आहे. याच्या ताब्यांत अठरा कारखाने, बारा महाल, हुजूरपागा व जिलबीचें पायदळ, इतक्यांचा कारभार असून खासगीकडील दप्तर व पत्रव्यवहारहि याच्याच ताब्यांत होता. तसेंच भोजनाची तजवीज, आमंत्रणें करणें इत्यादि कामें याजकडेस होतीं. राजपत्रावर संमतमंत्री व बार असे शेरे यानें करावयाचे असत. १६४७ सालीं गंगू मंगाजी या नांवाच्या गृहस्थास शिवाजीनें वाकनीस हें पद दिले. १६६४ सालीं गंगू मंगाजीवर इतराजी होऊन दत्ताजी त्रिमल नांवाचा एक हुषार कारकून पागेकडे होता. त्याजला वाकनिशीचें काम सांगितलें. राज्याभिषेकाच्या वेळेस या हुद्दयाचें नांव मंत्री असें ठेवण्यांत आलें. दत्तोपंतानें हें काम शाहू गादीवर येईपर्यंत केलें. शाहूनें नारो राम शेणव्याला १७१३ सालीं मंत्री नेमिलें. तेव्हांपासून त्याच्याच घराण्यांत तें पद चाललें. हल्लीं यांचें घराणें सातारा जिल्ह्यांत वांगणी या गावीं आहे. छत्रपतीच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूस बसण्याचा मंत्र्याचा मान असे. (अष्टप्रधानांचा इतिहास)