विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंडी संस्थान.- पंजाबमधील एक संस्थान. हें उ. अ. ३१०२३' ते ३२०४' आणि पू. रे. ७६०४०' ते ७७०२२' यांच्या दरम्यान आहे. याच्या उत्तरेस चंबासंस्थानः पूर्वेस हिमालय पर्वत, बियास व बिसना नद्या; दक्षिणेस सुकेत व पश्चिमेस कांग्रा जिल्हा. हें पंजाबांतील पहिल्या प्रतीचें डोंगरी संस्थान आहे. संस्थानांतून बियास नदी पूर्वेकडून वायव्येकडे वहात जाते. ह्या संस्थानांत सैंधव (मीठ) सांपडतें. हवा थंड असून दक्षिण भागांत पावसाळयामध्यें तापाची सांथ असतें. या संस्थानांत हल्लीं १० मजबूत किल्ले आहेत. मंडी येथील सर्व शिलालेख गुप्तलिपींतील असून येथील वाणी लोक आपले जमाखर्च अद्यापि या लिपींत ठेवतात. या राज्यांत सतीचे स्तंभ अतिशय आहेत.
इतिहासः- पूर्वी मंडी हें सुकेत संस्थानांत मोडत असे. सुकेतच्या शाहुसेन राजाचा भाऊ बाहुसेन याच्या वंशांतील अजबरसेन यानें हें शहर बसविलें (१५५७). पुढें येथील राजा सुराजसेन याच्या वेळीं शेजारच्या राजाच्या मानसिंग नांवाच्या एका सेनापतीनें याच्या गमा व दिरंग ह्या मिठाच्या खाणी घेतल्या. सुराजसेनानें येथें. इ. स. १६२५ त कमळगड नांवाचा किल्ला व डमडम राजवाडा बांधला. याचे अठराहि पुत्र याच्यादेखत मरण पावल्यामुळें स. १६४८ त यानें एक रुप्याची मूर्ति तयार करून तिला माधवराव असें नांव दिलें व आपलें सर्व राज्य आपल्यामागें त्या मूर्तीच्या नांवानें ठेविले. त्याच्यामागून त्याचा भाऊ श्यामसिंग स. १६५८ त गादीवर बसला. याच्या जिप्सु नामक दासीपुत्रानें येथील जमाबंदीची जी पुनर्घटना केली तीच सध्यां चालू आहे. पुढें (१६८६) राजा सिद्धसेन गादीवर बसला. त्यानें (१६८८) नाच, हातली, दलेद, व धनेशगड, रायपूर व माधोपूर हीं सुकेत संस्थानांतील गांवें काबीज केलीं, आणि १७०५ मध्यें मंडी येथें एक गणपतीचें देऊळ व हातगड येथें शिवपुरी मंदिर बांधलें. याला गुरुगोविंदाचा प्रसाद होता अशी आख्यायिका आहे. हा १०० वर्षांचा होऊन १७२९ सालीं मरण पावला. नंतर याच्या समशेरसिंग नामक नातवानें कुलूंतील चुबोराई, रामगड, देवगड, हस्तपूर आणि सरण हीं गांवें काबीज केलीं. याच्या मागें याचा पांच वर्षांचा मुलगा श्रीसेन गादीवर बसला. तो लहान असल्यानें कांग्राच्या संसारचंद करोच राजानें मंडीवर स्वारी केली व हातली, चोहर व अनंतपूर हीं गांवें काबीज केलीं. श्रीसेनास कैद करून कांग्रयाच्या किल्ल्यांत ठेविलें परंतु स. १८०६ मध्यें राहूलरच्या राजानें गुरख्यांच्या मदतीनें संसारचंदाचा पराजय केला व श्रीसिंगास पुन्हा मंडीच्या गादीवर बसविलें. पण रणजितसिंगानें १८०९ मध्यें गुरखे लोकांनां हांकून लावलें. व मंडीसहित सर्व डोंगराळ संस्थानावर देशासिंग मजाथिया यास नाझीम नेमलें. रणजितसिंगाच्या मरणानंतर वेंतुर नामक शीख सेनापतीनें मंडी संस्थान खालसा केलें व तेथील बलवीरसिंग राजाला कैद करून अमृतसर येथें पाठविण्यांत आलें. पण लवकरच महाराजा शेरसिंगानें त्याची मुक्तता केली. सोब्रानच्या लढाईनंतर (१८४६) इंग्रज व मंडी यांमधील स्नेहसंबंध येथील राजाला दिलेल्या सनदेच्या रूपानें कायम झाला. बलवीरसिंगाच्या मरणानंतर (१८५१) त्याचा अज्ञान मुलगा विजयसेन गादीवर बसला व वजीर गुसौन याला रीजंट नेमलें. येथील आपसांतील भांडणामुळें इंग्रज सरकारास येथील सर्व सत्ता, विजयसेन वयांत येईपर्यंत वजिराकडे सोंपवावी लागली. विजयसेनाच्या मरणानंतर (१९०२) त्याचा दासीपुत्र भवानीसेन यास गादीवर बसविण्यांत आलें. त्याचा पुत्र हिज हायनेस जोगेंद्रसेन बहाद्दूर हा १९१३ सालीं गादीवर आला. हा सांप्रत राजा असून त्याला ११ तोफांची सलामी मिळते.
या संस्थानांत मंडीगांवाशिवाय आणखी १४६ खेडीं आहेत. एकंदर लोकसंख्या (१९२१) १८६०४८ आहे. राज्याचें क्षेत्रफळ १२०० चौरस मैल आहे. संस्थानचें उत्पन्न सुमारें ८ लाखांचें आहे. मुख्य धान्यें व उत्पन्नाचे पदार्थ तांदूळ, मका, कडधान्यें चणे, ज्वारी, बटाटे, गहूं, तंबाखू, ऊंस, थोडी खसखस, कापूस, व चहा हे होत. संस्थानच्या तीनपंचमाश प्रदेश जंगलयुक्त आहे. येथील सराज वजिरींत लोखंड सांपडतें. गमा व दिरंग खाणींत मीठ सांपडतें. व गोधर किधरांत खनिज पदार्थ मुबलक सांपडतात. लोखंडी सामान, पितळेची भांडी, लांकडी काम, रंगकाम व विणकाम हीं कामें येथें होतात. तांदूळ, गहूं, बटाटे, चहा, मीठ, तूप व इमारती लांकूड हा माल येथून निर्गत होतो व कापड, भांडी, दागिने, साखर, तेल यांची आयात होते. पठाणकोटपासून बैजनाथपर्यत व बैजनाथपासून मंडीपर्यंत पक्की सडक आहे. संस्थानाकडून दरवर्षी १ लक्ष रुपये इंग्रज सरकारास खंडणी दिली जाते.
श ह र.- संस्थानाची राजधानी मंडी याची लोकसंख्या सुमारें ८ हजारांवर आहे. हें १५२७ सालीं अजबरसिंगानें वसविलें असून यांत कित्येक देवळें व महत्त्वाच्या इमारती आहेत. यांपैकीं चबुत्रा अथवा येथील वजीराचा दरबार व डमडम राजवाडा ह्या इमारती मुख्य आहेत. डमडम राजवाडा सतराव्या शतकांत बांधला गेला. हें मोठें व्यापाराचें ठिकाण असून याचा व्यापार लडक व यारकंदशीं चालतो. (कनिंगहॅम; वैद्य - म. भा. भाग १; गोडबोले - एतद्देशीय संस्थानें; इंपे. ग्याझे. पु. १७; ईयर बुक १९२५.)