विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मॅडिसन- अमेरिका, बिस्कॉन्सिन, संस्थान, मेंडोटा व मोनोना सरोवरांच्यामध्यें हें वसलें आहे. लोकसंख्या (१९२०) ३८३७८. हें शहर सरोवरांच्या भागांत वसलेलें असल्यामुळें हा भाग फारच प्रेक्षणीय झाला आहे. शहराच्या मध्यभागांतील वृक्षाच्छादित टेंकडीवर कॅपिटोल नांवाची सरकारी इमारत आहे या इमारतीसभोंवती विस्तीर्ण बाग असून शहरांतील मुख्य व्यवहाराच्या इमारती हिच्यासभोंवती आहेत. येथील मुख्य इमारती म्हटल्या म्हणजे फेडरल बिल्डिंग, संयुक्ताचें कोर्ट, सिटीहॉल, लायब्ररी व नाटकगृह या होत. जवळील टेंकडीवर विस्कॉन्सिन विश्वविद्यालयाची इमारत आहे. येथील इतिहासमंडळाच्या इमारतींत साडेतीन लक्षांवर पुस्तकें आहेत. विश्वविद्यालयाच्या वाचनालयांत सुमारें दीड लाख पुस्तकें आहेत. शिवाय येथें दुसरी लहान मोठीं वाचनालयें आहेत. येथें शेती व दुधातुपाचा व्यापार बराच असून तंबाखूचा बराच खप होतो. येथें उद्योगधंदेहि बरेच आहेत.