विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंडावर– संयुक्तप्रांत, बिजनोर जिल्ह्यांतलें गांव. लोकसंख्या सुमारें सात हजार, सेंट मार्टिन व जनरल कनिंगहेंग, हें पूर्वीचें मोतीपूर असून येथें १७ व्या शतकांत ह्युएनत्संग येऊन गेला असें सिद्ध करतात. इ. स. १३९९ त हें गांव तैमूरलंगानें काबीज केलें, व अकबर बादशहाच्या कारकीर्दीत हें एका परगण्याचें मुख्य ठिकाण होतें. येथें एक उंचवटा असून त्यावर जाममशीद आहे व जवळच दोन तळीं आहेत.