विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंडाले, जि ल्हा.- उत्तर ब्रह्मदेश, मंडाले विभागामधील जिल्हा. याच्या उत्तरेस रुबीमाईन्स जिल्हा; दक्षिणेस लॉकसॉक संस्थान, क्यौकसी आणि सगेंग जिल्हे; पूर्वेस सीपौ संस्थान; आणि पश्र्चिमेस इरावती नदी यांत एक ७०० चौ. मैलाचें मोठें मैदान आहे. यांतील सरासरी १५० चौरस मैलाचा एक टापू पावसाळयांत येथील नद्याच्या पुरामुळें जलमय होऊन जातो. याच्या उत्तरेस व पूर्वेस डोंगर आहेत. येथील साग्यिननाग डोंगरांत संगमरवरी दगडांच्या खाणी आहेत.
या जिल्ह्यांतून इरावती, म्यींज व मदय ह्या तीन नद्या वहातात. त्यांपैकीं शेवटच्या दोन इरावती नदीच्या शाखा आहेत. जिल्ह्यांत तळी मुळींच नाहींत. तरी पावसाळयांत नद्यांच्या पुरामुळें येथील जो टापू जलमय होतो त्यालाच बांध घालतात व नंतर त्यांतील पाणी उन्हाळयांत लागवडीकडे उपयोगांत आणतात. येथील हवापाणी चांगले व निरोगी आहे. येथें ३० ते ४० इंचापर्यंत पाऊस पडतो. डोंगराळ भागांत मात्र कधीं कधीं ७५ इंच पाऊस पडतो.
इ ति हा सः- फार प्राचीन काळापासून हा जिल्हा ब्रह्मदेशाच्या राज्यांत मोडत असे. मंडाले शहराचा पूर्वेतिहास शहराच्या माहितींत दिला आहे व ब्रिटिशसरकार आणि येथील थिबाराजा यांमधील व्यवहार ब्रह्मदेशावरील लेखांत सांपडेल. हा भाग ब्रिटिशांनीं खालसा केल्यावर येथें बंदोबस्त राखण्याकरितां जरी खास मंडाले येथें १००० सैन्य ठेवलें होतें तरी या जिल्ह्यांत तीन चार दरवडेखोरांनीं बराच धुमाकूळ उडवून दिला. इ. स. १८८७ त या दरवडेखोरांचा नायनाट करण्यांत आला, परंतु लवकरच ऑगस्ट महिन्यांत मेम्योसबडिव्हिजनमध्यें सेटक्या नांवाच्या तोतयानें बंड उभारलें व तेथील असिस्टंट कमिशनरचा खून केला. इ. स. १८९० पर्यंत या सबडिव्हिजनमध्यें व क्युकसी जिल्ह्यांतील डोंगराळ प्रदेशांत या बंडखोराची लुटलूट चालू होती. पुढें या बंडखोराचा त्याच्या अनुयायांसह नाश करण्यांत आला व १८९० मध्यें येथें स्थीरस्थावर झालें.
येथें बौद्ध लोकांचीं लहानमोठी देवळें (पागोडा) सर्वत्र आढळतात. त्यापैकीं महत्त्वाचीं देवळें खास मंडालेमध्यें अथवा मंडालेच्या आसपास आहेत. १९२१ सालीं जिल्ह्याचीं लोकसंख्या ३५६६२१ होती येथें बौद्ध धर्मीयांचें प्रमाण फार मोठें आहे. ब्रह्मी, हिंदु, मुसुलमान, शान, डानस, शीख, काठे, पोन्ना व खिस्ती हे लोक जिल्ह्यातून आढळतात.
शेतकीः- येथें पाऊस थोडा पडतो म्हणून बरीच जमीन लागवडींत नाहीं. तरी आतां मंडाले कालवा झाल्यापासून बरीच जमीन लागवडींत येऊं लागली. या जमिनींत मुख्यतः भाताचें पीक होतें. कोठें कोठें कडधान्यें चणे, टमाटो, कांदा, तंबाखू, मिरच्या पिकतात. यांतील जंगलांत बांबू फार आढळतो. सागवान, ओक वगैरे इमारती लांकूडहि या जंगलात होतें.
मदयजवळील साग्यीन व टेंकडयांत माणिकांच्या व संगमवरवरी व ग्रॅफाईट दगडांच्या खाणी आहेत. कैंगिथामिन व येग्यी येथें हिराकस, व ऑन्हलट येथें शिसें सांपडतें. श्वेग्यीन येथें अभ्रक, व वेटविन येथें कोळसा सांपडतो. अमरपूर येथें रेशमी कापड तयार होत असून येथें कम्मावा कागदहि तयार होतात. याच कागदावर बौद्ध धर्माचे ग्रंथ पाली भाषेंत लिहिले आहेत येथें नद्यांतून सांपडणाऱ्या माशांचा मोठा व्यापार चालतो. आयात माल लोखंडी सामान, कापूस, धातू, लोंकरी कापड, रंग, इत्यादि व निर्गत माल माणिक, लाख, रबर, धान्य, कातडीं, व रेशमी कापड हा आहे. येथील व्यापारी वस्तूंची ने आण आगगाडीनें व इरावती, मदय व म्यिंज या नद्यांतून होते.
राज्यव्यवस्था - या जिल्ह्याचे पांच तालुके केलं आहेत. मुख्य ठिकाण मंडाले शहर होय. येथें ज्युडिशियल कमिशनर असतो. कारभाराची व्यवस्था ब्रह्मदेशांतील इतर जिल्ह्याप्रमाणेंच आहे. या जिल्ह्यांत मंडाले शहरींच फक्त म्युनिसिपालिटी आहे. साक्षर लोकांचें प्रमाण शेंकडा २९ आहे.
श ह र.- मंडाले विभागाचें मुख्य ठिकाण, व ब्रह्मी राज्याची (१८५८-८५) राजधानी. उ. अ. २१˚६९' व पू. रे. ९६˚६'. शहर इरावती नदीच्या पूर्व तीरावर आहे. इरावती नदीपासून दीड मैलावर जुनें मंडाले आहे. त्याच्या भोंवतीं केट व खंदक आहेत. येथें इंग्रजी सैन्याची छावणी आहे. छावणीच्या पश्र्चिमेस नदीपर्यंत व दक्षिणेस अमरपुरा येथील पुरातन किनाऱ्याच्या परकोटापर्यंत सध्याचें मंडाले शहर पसरलें आहे. येथें चिरेबंदी घरापेक्षां लांकडाचीं व विशेषतः बाबूंचीं घरें मोठया प्रमाणांत आढळतात.
इतिहासः- मिंडन राजा गादीवर बसल्यापासून मंडाले शहरास महत्त्व आलें. नव्या शहराभोंवतालच्या कोट व येथील राजवाडा इ. स. १८५७-५८ च्या दरम्यान बांधण्यांत आला. मिंडन राजाच्या मारणनंतर इ. स. १८७८ त त्याचा पुत्र थिबा नदीवर बसला ('थिबा' पहा). इ. स. १८८६ त थिबास पदच्युत करून ब्रह्मदेश खालसा केला; यापुढें शहरसुधारणा करण्याचें काम म्युनिसिपालिटीनें हातीं घेतलें. येथील जुन्या शहरांत छावणी असून त्याला फोर्ट डफरिन (डफरिन किल्ला) असें म्हणतात. याच्या सभोंवार कोट आहे. आंत शहराच्या मध्यभागीं भव्य राजवाडा आहे; याच्या उत्तरेस क्रीडोद्यानें आहेत. हें स्थळ पहाण्यासारखें आहे. येथील बरींच देवळें जुनीं असून प्रेक्षणीय आहेत. कांहीं तर अकराव्या व बाराव्या शतकांतलीं आहेत.
स. १९२१ मध्यें लोकसंख्या १४८९१७ होती. येथें ब्रह्मी भाषा प्रचलित आहे. येथें चांदीची नक्षीदार भांडीं, लांकडावरील खोदीव काम, लोखंडी काम, चितारकाम, कलाबतूकाम, लाखेचीं खेळणीं हीं उत्कृष्ट होतात. दगडाच्या व पितळेच्या मूर्तीहि येथें उत्तम होतात.
का ल वा.- हा कालवा इरावतीला समान्तर असून दक्षिणोत्तर बांधला आहे. मंडाले जिल्ह्याच्या मध्यभागी जें मोठें सपाट मैदान आहे त्याला कालव्याचें पाणी देण्यांत येतें हा ३९ मैंल लांब असून यांत ८०००० एकर जमिनीला पुरण्याइतकें पाणी आहे. या कालव्याचें काम इ. स. १८९६ मध्यें सुरू झालें, व १९०२ मध्यें तो संपूर्ण होऊन त्यांतील पाणी जमिनीस देणें सुरू झालें. याला एकंदर ५१ लक्ष रु. खर्च आला. इ. स. १९०३-०४ च्या दरम्यान ३०००० एकर जमिनीला यांतील पाणी पुरविण्यांत आलें व त्याचें एक लक्ष रुपये उत्पन्न आलें.