विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंडलिक, विश्वनाथ नारायण (१८३३-८९) - यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यांत मुरुडगांवीं झाला; शिक्षण एलफिन्स्टन स्कूल व कॉलेजांत झालें. स. १८६३ सालपर्यंत अनेक हुद्यांवर नोकरी केल्यानंतर वकिलीची परीक्षा देऊन मंडलिक हायकोर्टांत वकिली करूं लागले. थोडक्याच वर्षांत या धंद्यांत यांनीं विलक्षण कीर्ति आणि संपत्ति मिळविली; रत्नागिरीच्या खोतीप्रकरणांत यांनीं उत्कृष्ट कामगिरी बजाविली; १८६४ सालीं 'नेटिव्ह ओपिनियन' पत्र सुरू केलें; म्युनिसिपालिटींत बऱ्याच महत्त्वाच्या सुधारणा केल्या; स. १८७३ त सरकारी वकील झाले; १८७४ सालीं मुंबईच्या कायदेकौन्सिलांत यांनां सभासद नेमिलें; तेथें आठ वर्षे उत्तम प्रकारें काम केल्यावर १८८४ सालीं यांची व्हाईसरायांच्या कौन्सिलांत योजना झाली; १८७७ च्या दिल्ली दरबारांत यांनां 'सी. एस्. आय' हा किताब मिळाला; १८८९ सालांत मुंबई युनिव्हर्सिटीनें यांनां आर्टसचे डीन नेमले; एतद्देशीयांस मिळालेला हा मान पहिलाच होय. हे चांगले लेखकहि होते; हिंदु कायद्यावर यांनीं चांगले ग्रंथ लिहिले. यांनीं एलफिन्स्टनकृत इतिहासाचें मराठींत भाषांतर केलें. वक्तशीरपणाबद्दल यांची फारच ख्याति होती; हे सनातन धर्माभिमानी होते.