विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंडला, जिल्हा.- मध्यप्रांत. जबलपूर विभागामधील जिल्हा. क्षे. फ. ५०५४ मैल. हा सातपुडा पठाराच्या पूर्व भागांत असून याच्या ईशान्येस अमरकटंक पर्वत आहे. या अमरकंटक पर्वतावर नर्मदा नदी उगम पावते, व ती अमरकंटकाच्या वायव्य दिशेनें मंडला व रेवा यांच्या सरहद्दीवरून वहात जाऊन पश्र्चिमेकडे वळते. नंतर काहीं मैल त्या दिशेनें वहात जाऊन पुढें दक्षिणवाहिनी होते व मंडला गावास वळसा घालून जबलपूरकडे वहात जाते. ही नदी या जिल्ह्यांतील प्रवाहांचें केंद्र आहे. या जिल्ह्यांतील बहुतेक सुपीक प्रदेश या नदीच्या दक्षिणेस आहे. येथील बहुतेक प्रदेश डोंगराळ व जंगलमय आहे. यांतील चौरादादर पर्वत अमरकंटकइतकाच उंच आहे. येथील अरण्यांत साल, साग, कळक हीं झाडें विशेष प्रमाणांत होतात. वाघ, चित्ता, गवा, सांबर, नीलगाय, हरिण व रानकुत्री हीं जनावरें आढळतात. येथील हवा थंड व आल्हादकारक आहे. येथें पाऊस सरासरी ५२ इंच पडत असून पावसाळयांत तापाची साथ नेहमी सुरू होते.
इतिहासः- रामनगर येथील शिलालेखावरून पाहिलें असतां गढामंडलांतील गोंड रजपूत घराण्याच्या वर्चस्वास पाचव्या शतकांत सुरवात होते. व कनिंगहॅमच्या मतें सातव्या शतकांत (इ. स. ६६४) पासून सुरवात होते. या घराण्याचा मूळ पुरुष जाधवराय नांवाचा रजपूत असून तो येथील गोंड राजाच्या पदरीं होता. त्यानें त्या राजाच्या मुलीशीं लग्न लावलें व पुढें गोंड राजाच्या मरणानंतर आपण राजा झाला. या घराण्याचें मुख्य ठिकाण जबलपूरजवळचें गढा हें गांव होय असें मानण्यांत येतें. परंतु ज्या अर्थी येथें १२ व्या शतकापर्यंत कलचुरी रजपुतांच्या घराण्याचें वर्चस्व होतें त्याअर्थी हें मत चुकीचे आहे. एवढें मात्र खरें कीं, येथील ४७ वा राजा संग्रामसाह याच्या राज्यारोहणापर्यंत म्हणजे इ. स. १४८० पर्यंत गढामंडलाचें राज्य म्हणजे एक लहानसें संस्थान होतें. या संग्रामसाहनें मात्र नर्मदेची थडी, भोपाळ, सागर, दमो व सातपुडयाचा बराच मोठा डोंगराळा प्रदेश या राज्यास जोडून तें बरेंच वाढविलें. परंतु यापुढें ह्या घराण्याचें वर्चस्व येथें फार दिवस टिकलें नाहीं. इ. स. १५६४ मध्यें अकबद बादशहाच्या अलफखान नामक सुभेदारानें या राज्यावर स्वारी केली तेव्हां येथील राणी दुर्गावतीनें त्यास थोडा वेळपर्यंत कसेंबसें टिकाव धरून तोंड दिलें परंतु शेवटीं पुढें आपला टिकाव लागत नाहीं असें पाहून तिनें आत्महत्त्या केली. तेव्हांपासून या राज्यास उतरती कळा लागली. इसवी सन १७४२ त पेशव्यांनीं मंडल्यावर स्वारी केली. व नागपूरच्या भोंसल्यानें-सध्यां जेथें बालाघाट व भंडारा आहे - तो मुलुख काबीज केला. सरतेशवेटीं स. १७८१ मध्यें येथील राजाला पदच्युत करण्यांत येऊन हें राज्य सागरच्या मराठी राज्यास जोडण्यांत आलें. त्यावेळीं सागर हें पेशव्यांच्या ताब्यांत होतें. पुढें इ. स. १७९९ त हें नागपूरच्या भोंसल्यानें बळकाविलें. त्यानंतर १८ वर्षेपर्यंत येथें पेंढारी लोकांनीं धुमाकूळ केला. इ. स. १८१८ त हें इंग्रजांच्या ताब्यांत आलें. इ. स. १८५७ त येथें बंडाळी माजली पण लवकरच इ. स. १८५८ मध्यें सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. रामनगरांतील गढामंडलाच्या गोंड रजपूत राजाचा महाल व देवगांवचें देऊळ हीं इतिहासप्रसिद्ध स्थळें होत.
जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) ३८६४४६. येथें हिंदी भाषेची बाघेली नावाची पोटभाषा प्रचलित आहे. कोठें कोठें गोंडी भाषाहि बोलण्यांत येते. येथील शेतकरीवर्गांत ब्राह्मण, कलार, गोंड, लोधी, बनिया व कायस्थ ह्या जातींचा समावेश होतो. या जिल्ह्यातील जमिनींत गहूं, तांदूळ, तीळ, कोद्रु, वगैरे पिकें होतात. लोखंडहि मुबलक सापडतें. येथें जाडेंभरडें सुती कापड सर्वत्र तयार होतें. खास मंडलागावीं काशाचीं भांडीं उत्तम होतात. निर्गत गहूं, गळिताचीं धान्यें, सण, ताग, तूप, इमारती लांकूड असून आयात कडधान्यें पितळेचीं भांडी, मातीचें तेल, रेशमी व सुती कापड वगैरे. व्यापारी जिन्नसांची नेआण सडकांनीं व आगगाडीनें होते.
त ह शी ल.- क्षेत्रफळ २५३६ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) २२२१६९. मंडलागांव हें या तहशिलीचें मुख्य ठिकाण आहे. तहशिलींत १०३३ गांवें आहेत.
गां व.- मंडला जिल्ह्याचें व तहशिलीचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या सु. पांच हजार. इ. स. १६७० हें गांव गढामंडालाच्या गोंड राज्याची राजधानी बनलें. गोंड लोकांनीं येथें एक किल्ला व राजवाडा बांधला. यांच्यानंतर मराठे जेव्हां येथें आले तेव्हां त्यांनीं या गांवाच्या संरक्षणार्थ ज्या बाजूनें नदी नाहीं त्या बाजूस भिंत बांधली. ती आतां पाडण्यांत आली आहे. इ. स. १८१८ त हें इंग्रजांच्या ताब्यांत आलें. येथें इ.स. १८६७ मध्यें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें कांश्याची भांडी होतात.