विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मज्जादौर्बल्य (न्यूरास्थेनिया)- या व्याधीमध्यें रोग्याची दिवसानुदिवस मानसिक आणि शारीरिक श्रम करण्याची ताकद कमी होऊन त्याच्या मस्तकांत रोगलक्षणांचा अगर समशीतोष्ण पीडेचा किंवा दुसऱ्या पीडादायक भावनांचा बळकट आभास उत्पन्न होतो. परंतु वस्तुतः त्याच्या मज्जास्थानांमध्यें कांहीं बिघाड झालेला नसतो.
का र णे.- हा रोग त्यांतल्यात्यांत स्त्रियांपेक्षां पुरुषांनां अमळ अधिक प्रमाणांत होतो व तोहि मोठेपणीं मध्यम वयाच्या सुमारास होतो. परंतु हा रोग होण्याची ज्यांनां आनुवंशिक प्रवृत्ति आहे त्यांनां हा रोग बालपणीं किंवा यौवनारंभाच्या सुमारासहि होतो. मातापितरांपैकीं एखाद्यास वेड, भ्रम, फेंपरें अथवा उन्मादरोग किंवा कांही अन्य तऱ्हेचा वातरोग झाल्याचा पूर्वेतिहास सांपडतो; किंवा ती अति दारूबाज तरी असतात. ह्या रोगाचा आरंभ होण्यास निमित्त म्हटलें म्हणजे मानसिक अगर शारीरिक अति श्रम करून मज्जाशक्तीचा संचय एकदम कमी होणें; व त्यांतच जाग्रणें, अपुरी विश्रांति, अति शोक होणें किंवा भयंकर चिंता असणें, कामधंद्यासंबंधीं अति काळजी लागणें किंवा अपघातामुळें शरीरास व मनास एकदम मोठा धक्का बसणें; तोफेची सरबत्ती चालू असतां किंवा नसतांना युद्धमध्यें शरीरास व मनास ताण बसणें, अपघाताच्या मृत्यूपासून थोडक्यांत बचावणें, मोठालीं दुखणीं येऊन जाणें; स्त्रीरोगी असल्यास अति मैथुन, विटाळ बंद होण्याचें पन्नाशीचें वय, कडक औषधें घेणें. कोकेन अगर दारूबाजी अशासारख्या कारणांची त्यांतच भर पडते. त्यांतहि आणखी निमित्तें म्हणजे पोटांत किंवा आंतडयांत अजीर्ण, मलावरोध, आंव, हिरडयांतून पू येणें अगर अधू दृष्टि असून चष्मा न लावल्यामुळें पडणारा दृष्टीस ताण, किंवा नाक, कान या ठिकाणीं मळ सांचून अगर दांतांस कीड लागणें हीं होत. पोटांतील इंद्रियांचें शैथिल्य हेंहि आणखी एक कारण आहे.
ल क्ष णें.- रोगाचा प्रारंभ अति सावकाशपणें होतो. जें काम नेहमीं रोगी सहज आटोपीत असे तें त्यास करवेनासें होऊन त्यास दमल्यासारखें होतें. अगर एखाद्या भानगडीचा प्रश्र्न सोडविण्यासाठीं पूर्वीप्रमाणें त्यास मनाची एकाग्रता करवत नाहीं. मानसिक विचार मग तो कोणताहि असेना, त्याच्यानें फार वेळ करवेनासा होतो. स्मरणशक्ति अंमळ कमी होते. कांपरें भरण्याची संवय जडते. मालकानें हांक मारली असतां ज्या कारकुनास अगर नोकरास पूर्वी कांहीं एक गडबडल्यासारखें होत नसतें त्यास अशा वेळीं कंप सुटतो. ऑफिसांत थोडा वेळ काम केलें, कीं मस्तक दुखतें व दृष्टीस काम करण्यास नीट दिसेनासें होऊन डोक्यांत गोंधळल्याप्रमाणें होतें. असें वरचेवर झाल्यानें आत्मविश्वास कमी होत जाऊन मनास औदासिन्य येतें, व एखाद्याचा स्वभाव चिडखोरहि बनतो. कोणतेंहि काम आपणाकडून उरकेल किंवा नाहीं याविषयीं वाजवीपेक्षां फाजील शंका व भ्रान्ति उत्पन्न होऊन व आपण असें कांहीं एक न करतां घरीं स्वस्थ बसलों तर त्याचे कुटुंबावर व इतर परिणाम काय होतील याविषयीं चिंता हीं लक्षणें होतात. आत्मविश्वास नाहींसा झाल्यानें रोग्यास कोणतेंहि साधें कृत्य करण्याविषयींच्या जबाबदारीची फारच धास्ती वाटते. कोणी रोगी उघडया मैदानांत किंवा मोकळया जागेंत जाण्यास भितो, तर कोणास तसल्या जागा ओलांडून जाण्याचें भय वाटतें. कोणास कोंदट जागेंत बसण्याचें भय वाटून तेथून कसें निसटून जावें या विवंचनेंत तो असतो; अशा तऱ्हेचीं नाना लक्षणें होतात. चित्तभ्रम, व आभास हे मात्र रोग्यास नसतात. याशिवाय रोग्यास पुढील अनेक शारीरिक लक्षणें होतातः - मस्तकशूळ, पाठ व हातपाय दुखणें, चक्कर, भोंवळ, अस्वस्थता; जीभ, हात, पापण्या थरारणें किंवा कंपायमान होणें; अगदीं जाग्रण जरी नाहीं तरी वरचेवर झोपेंतून जागें होणें, छातींत धडकी भरणें, चेहरा लाल होणें, मुंग्या येणें, पोटांतील शीर जोरानें उडणें, घाम सुटणें, परक्या माणसापुढें लाज अथवा संकोच वाटणें, डचकणें, अपचन, पोटांत वायु धरणें, बद्धकोष्ठता हीं लक्षणें रोगाच्या अगोदरहि होतात. अपघातामुळें इजा होऊन रोग झाला असेल तर त्या ठिकाणीं दुःख वाटतें किंवा भासतें. या रोगाचें कारण मूळची मज्जास्थानची आनुवंशिक अशक्तता व त्यांतच रोग्याच्या कोठयात अजीर्ण, बद्धकोष्ठतेमुळें उत्पन्न होणाऱ्या व कुजणाऱ्या घाणीची विषबाधा असावी असा तर्क आहे.
रो ग नि दा न.- दिसण्यांत यांतील लक्षणें उन्माद रोगाप्रमाणें असलीं तरी त्या दोहोंत महत्त्वाच्या बाबतींत फरक असतो. उन्मादरोग बहुधां स्त्रियांनांच होतो व तोहि लहानपणीं म्हणजे यौवनावस्थेंत होतो. तसेंच ज्यांनां फारशी चिंता अगर कष्ट करावे लागत नाहींत अशा स्त्रियांनां तो होतो. पण हा रोग ज्या पुरुषांनां शारीरिक व मानसिक विशेष श्रम पडतात त्यांनांच फक्त होतो. उन्माद रोग असलेल्या स्त्रिया लोकांनीं आपल्या रोगलक्षणाचें कौतुक करावें याविषयीं उत्सुक असतात. व स्वतः मन बळकट करून लक्षणें कमीं व्हावींत असा कांहींच प्रयत्न करीत नाहींत. उलटपक्षी या रोगानें त्रस्त झालेला पुरुष रोगी आपलीं रोगलक्षणें लोकांपासून कशीं छपवितां येतील या काळजींत असून ती कमीं होण्यासाठीं तो शिकस्तीचा प्रयत्न करतो. परंतु त्यांत त्यास बहुधां यश येत नाहीं, ही गोष्ट वेगळी. उन्मादरोगांत झटके, अंगस्तंभ, दुःख, कंदुकवात इत्यादि लक्षणें असून त्यांपैकीं बहुतेक लवकर बरीं होतात व रोगी दिसण्यांत निरोगी व चांगला दिसतो, व सुखासमाधानांत आनंदानें असतो. या रोगाच्या आरंभीं चित्तभ्रम किंवा पृष्ठवंशरज्जूसंबंधीं शरीरतोलनाभाववातरोग रोग्यास झाल्याप्रमाणें लक्षणें होतात. पण या रोगांत रोगी मजकूर लिहितांना जरी चुक्या करतो तरी त्याच्या चुक्या त्यास नंतर समजतात; पण चित्तभ्रमररोगांत तसें होत नाहीं. शरीरतोलनाभाववातरोगांत रोग्याच्या गुडघ्यावर हातानें लहानसा आघात केल्यास तो मुळींच हलत नाहीं. पण या रोगांत तो निरोगी माणसापेक्षांहि हलून ताडकन उडाल्याप्रमाणें हलतो.
सा ध्या सा ध्य वि चा र.- कांहीं रोगी बरे होतात व कांहींमध्यें बरीच सुधारणा होते पण एकंदरींत हा रोग बराच दीर्घकाळपर्यंत टिक असल्यामुळें त्यास औषधोपचार करणें जिकीरीचें असतें. त्यापासून जिवास अपाय नसतो परंतु कोणी रोगी त्रासून आत्महत्या केल्याचीं उदाहरणें क्वचित् घडतात. ज्यांचा रोग आनुवंशिक असतो, ज्यांनां पुन्हां पुन्हां रोगलक्षणें उलटून होतात; व जेव्हां शरीराची वाढ थांबल्यावर म्हणजे मध्य वयांत रोगास आरंभ होतो तेव्हा रोगी फारसे सुधारत नाहींत.
उ प चा र.- जेव्हां अमुक कारण असावें असा अदमास करतां येईल तेव्हां तें कारण काढून टाकून काय सुधारणा होते ती पहावी. उदाहरणार्थः - किडके दांत, अपचन, बद्धकोष्ठता, अधु दृष्टी यांस योग्य ते इलाज करावेत. अपचनासाठीं अन्नामध्यें योग्य तो फेरफार केल्यानें तें बरें होतें. पुन्हां लढाईवर जाण्याची भीति नाहीं अशी शिपायाची खातरी झाल्यास त्याचा रोग बरा होतो. तसें न झाल्यास तो बरा होत नाहीं.यांत त्याचें ढोंग बिलकुल नसतें. कारणें शोधतों येण्यासारखीं आहेत तीं:- रोग्यास पूर्ण विश्रांति अगोदर पाहिजे व ती शरीरास व मनास दोहोंसहि पाहिजे. त्यास पौष्टिक आहार पोटभर मिळून मलशुद्धि वेळेवर चांगल्या तऱ्हेनें होईल अशी योजना करावी. अंग रगडणें हा चांगला इलाज आहे. पण एखादेवेळीं त्यानें स्नायूस फार उद्दीपन होतें; व तें तसें होणें बरें नव्हे. विजेची पेटी लावून स्नायूंनां उद्दीपित करणें हा उपायहि वरीलप्रमाणेंच आहे; व तो इलाज अधिक झाल्यास इजा होते. तसेंच विश्रांतिहि दीर्घ काळपर्यंत नसावी. म्हणजे ती फक्त एक महिना दीडमहिनाभर झाल्यावर रोग्यानें हिंडू फिरूं लागून सौम्य व्यायाम करावा. उष्ण स्नान, फवाऱ्याचें शीत स्नान, परगांवीं जाऊन हवाबदल करणें यांपासून या रोगांत फायदा होतो. पण वरचेवर अति प्रवास करून शरीरास शीण येईल व दगदग होईल असा तो नसावा. औषधांची फारशी गरज नाहीं. कुचला व कुचल्याचें सत्व यापासून तयार केलेलीं औषधें उपयोगी आहेत. सारक औषधांचीहि मदत मधून मधून घेत जाणें इष्ट आहे. हा रोग होण्याची प्रवृत्ति होऊं नये म्हणून लहानपणापासून जपलें पाहिजे. मुलें अभ्यासांत चलाख नसलीं तर त्यांस कडक रीतिनें वागवून सक्ति करून त्यांच्या मेंदूस ताण पाडल्यानें त्यांची मज्जाशक्ति कमी होते. मुष्टिमैथुनादि घातुक संवयी त्यांना न जडूं देण्याविषयीं फार जपावें, म्हणून तीं उघडया हवेंत व चारचौघात जितका वेळ रहातील तितकीं बरीं. जेणेंकरून शरीर धडधाकट होईल अशी रहाणी ठेवल्यानें या रोगाचा प्रतिबंध होतो पण नाजुकपणाच्या संवयी लावून घेतल्यानें किंवा मनावर फार दडपण पडल्यानें किंवा इंद्रियांनां सुख होईल इकडेच विशेष लक्ष दिल्यानें कल्पनाशक्तीस विशेष चालना मिळून अशीं रोगलक्षणें होतात.