विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंजुश्री- बौद्धसंप्रदायांतील एक देवता. मंजुश्रीपंथाचा उगम हिंदुस्थानांत झाला असला तरी चीनमध्यें त्याची एका विशिष्ट प्रकारें वाढ झाली. बहुधां चीनमधून तो नेपाळांत शिरला. नेपाळच्या संस्कृतीचा प्रणेता मंजुश्री होय असें मानण्यांत येतें. ही देवता बोधिसत्वाचाच अंश असून मंजुषोषा, कुमार, कुमारभूत अशीं हिंची दुसरीं नांवें आहेत. प्रज्ञापारमिताग्रंथ यानें प्रकाशांत आणिले असल्याबद्दल पौराणिक कथा आहे. महायानपंथी लोक प्रज्ञा, मंजुश्री व अवलोकितेश्र्वर यांनां भजत, असें फाहिआन म्हणतो (लेगे-फाहिआन, ए रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्टिक किंगडम). मंजुश्रीच्या प्रतिमा बऱ्याच आहेत. सर्वांत जुन्या मूर्तीस दोन हात असून त्याचें वैशिष्टय जी प्रज्ञा तिला त्यानें कमलावर धारण केल्याचें दाखविलें आहे.
तिबेटी धर्मग्रंथांच्या तांत्रिक भागांतून मंजुश्रीची अपूर्व वाढ झालेली दिसते. सहा तंत्रग्रंथांनां याचे नांव आहे. धर्मधातुवागश्र्विर व वज्रानंग अशीं तांत्रिक देवांमध्यें मंजुश्रीला नांवें मिळालीं आहेत. मंजुश्रीची तुलना हिंदुदेवांतील ब्राह्मणाशीं करण्यांत येतें. 'आदिबुद्ध' (ज्ञानकोश. विभाग ७, पृ ११८-११९) पहा.