विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंजिष्ट- हा सरळ पसरणाऱ्या अथवा वर चढणाऱ्या वनस्पतीच्या जातींचा एक वर्ग आहे. आर्थिक दृष्टया महत्वाच्या अशा याच्या देशी, नागा व विलायती मंजिष्ठ अशा जाती आहेत देशी मंजिष्टाचा वेल, वायव्य हिमालयापासून पूर्वेस व दक्षिणेस सिलोनपर्यंतच्या डोंगराळ प्रदेशांत सांपडतो. हा वेल फार वेगवेगळया तऱ्हेचा असतो परंतु याच्या दोन मुख्य तऱ्हा ओळखतां येतात. (१) कार्डिफोलिआप्रॉपर मंजिष्ट - याला पांच पानें असून मधल्या तीन शिरा क्वचितच असतात. शिरा स्पष्ट दिसत असून पृष्ठभाग खरखरीत असतो. (२) खासकाना-याला तीन पानें असून मधल्या पांच शिरा क्वचित असतात. पृष्ठभाग गुळगुळीत असून शिरा स्पष्ट नसतात. या दुसऱ्या जातींत रंगद्रव्य जास्त प्रमाणांत सांपडतें. नागामंजिष्टाचे वेल नागाटेंकडयांत आढळतात. व विलायती मंजिष्ट काश्मीरपासून पश्र्चिमेकडे आढळतो. याच्याहि मुळाचा रंगविण्याकडे उपयोग होतो.
उ प यो ग.- जाडयाभरडया कापडावर शेंदरी, तपकिरी वगैरे रंगाच्या छटा देण्यासाठीं पूर्वी याच्या मुळाचा उपयोग करीत असत. संध्यां याबद्दल डांबरापासून तयार केलेला रंग वापरतात. विशेष कामासाठीं दूरच्या प्रदेशांत अद्यापि मंजिष्टाचें मूळ उपयोगांत आणतात. रंग देण्याची सर्व ठिकाणची एकच रीत आहे. दाडा अथवा मुळाचे तुकडे टाकलेल्या पाण्यांत प्रथम कपडा बुडवितात. नंतर तुरटीच्या पाण्यानें पक्का रंग देतात. पूर्वी देशी औषधांत मंजिष्टाचा फार उपयोग करीत, परंतु अलीकडे फक्त कांहीं तेलांनां रंग देण्यासाठींच याचा उपयोग करतात. कृत्रिम रंगामुळें मंजिष्टाचा व्यापार सारखा मंदावत चालला आहे. याचा मुख्य पुरवठा इराणमधून होतो. बहुतेक माल मुंबई इलाख्यांत जातो. निर्गत अगदींच नाहींशी होत चालली आहे. पुनर्निगत मात्र थोडी आहे.
रा सा य नि क.- मंजिष्ट हा एक तांबडा रंग असून तो पूर्वी मंजिष्ट नांवाच्या झाडाच्या मुळापासून तयार करीत. इ. स. १८६८ मध्यें मंजिष्ट जशद-चूर्णाबरोबर तप्त केलें असतां कर्बसंकाशिन मिळतें असें ग्रीन व लिबरमन यांच्या दृष्टोत्पत्तीस आलें. हें त्यांस समजल्याबरोबर मंजिष्ट संयोगीकरणाच्या योगानें तयार करतां येईल किंवा काय ह्याच्या शोधार्थ त्यांनीं प्रयत्न चालू केले. लवकरच हे त्यांचे प्रयत्न सिध्दीस जाऊन मंजिष्ट संयोगीकरणाच्या योगानें मिळतो असें सिद्ध झालें. ह्या संयोगीकरणाकरितां प्रथमतः त्यांनीं कर्बसंकाशिन घेऊन त्यांचें कर्बकिनोनमध्यें रूपांतर केलें. ह्या किनोनचें द्वि-स्तंभिदामध्यें रूपांतर करून तें दाहक पालाशसह तप्त केलें. तप्त करून मिळालेल्या पदार्थामध्यें पाणी टाकून त्यामध्यें हराम्ल टाकल्याबरोबर मंजिष्ट सांका रूपानें खाली जमला. पण ही रीत काटकसरीच्या दृष्टीनें श्रेयस्कर नसल्यामुळें व्यापारी दृष्टया ही उपयोगिली जात नाहीं. संयोगीकरणाच्या योगानें मंजिष्ट मोठया प्रमाणावर तयार करण्याकरितां कर्बकिनोनचें गंधकित करून त्याचें गंधनिताम्लमध्यें रूपांतर करतात. या अम्लावर सिंधुकर्बिताची क्रिया करून मिळालेला सिंधु-गंधनित-क्षार दाहक सिंधुक्षारासह तप्त करून तें मिश्रण द्रवीभवन होऊन तयार झालेल्या पदार्थावर हर किंवा गंधकाम्लाची क्रिया केली असतां मंजिष्ट तयार होतो.
शुद्ध मंजिष्ट पाण्यामध्यें विद्रुत होत नसून अल्कोहलमध्यें थोडया प्रमाणांत विद्रुत होतो. दाहक-अनाम्लामध्यें त्याचें ताबडतोब द्रावण मिळतें. धात्वीय-प्राणिदाबरोबर अविद्राव्य पदार्थ देण्यावरून ह्या रंगाची रंगद्रव्य म्हणून किंमत ठरविली जाते. वनस्पतीच्या तंतूवर हा रंग चढत नसल्यामुळें कापूस किंवा तत्सम पदार्थांस हा रंग देण्याच्या पूर्वी ते रंगवंधकरानें माखले पाहिजेत. हा मंजिष्ट रंग दार्वम्ल व नत्राम्ल यांसह तप्त केलां असतां आपणांस नारिंगी मंजिष्ट मिळतो. व तोच स्निग्धशर्करा आणि गंधकाम्लासह तप्त केला असतां नीळमंजिष्ट मिळतो. त्रि-प्राण-कर्ब-किनोनचे आणखीहि कांही रंग महत्त्वाचे आहेत. त्यांपैकीं परपरिन, अँग्रापरपरिन, फ्लेव्हो परपरिन व ॲथ्रॅगॅलॉल हे बरेच महत्त्वाचे आहेत. ह्यांपैकीं परपरिन हा मंजिष्टाच्या मुळयांतच सांपडत असून तो मंजिष्टाचें मंगल-द्वि-प्राणिद व गंधकाम्ल यांच्या मिश्रणानें प्राणिदीकरण केलें असतां तयार होतो. व ॲथ्रॅगॅलॉल हा उदाम्ल, व मायु-आम्ल यांचें गंधकाम्लासह दृढीकरण केलें असतांत तयार होतो.