विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मच्छी ('कोळी' पहा)- मच्छी नांवाच्या जातीची एकंदर हिंदुस्थानांत वस्ती तीन लाखांवर आहे. पैकीं पावणेतीन लाख पंजाबांतच आहेत. ते सर्व मुसुलमान आहेत. त्यांचा समावेश झीनवरांत करतां येईल ('झीनवर' पहा). मुंबई इलाख्यांत ही जात बहुधां भडोच, ठाणें व सुरत या जिल्ह्यांत व समुद्रकिनाऱ्यावरील लहान-मोठया गांवांतून आढळते. लोकसंख्यां सुमारें ४० हजार हे दिसण्यांत कोळयासारखे असून रजपुतांबरोबर ठिकठिकाणीं त्यांचा प्रसार झाला आहे. हल्लींचें त्यांचें नांव त्यांच्या उपजीविकासाधनावरून पडलेलें असलें पाहिजे. पोट भरण्याचा त्यांचा धंदा समुद्रांतील मासे धरून ते बाजारांत विकावयाचा होय. मच्छी हा शब्द साधारणतः धंदेवाचक असून यात हिंदुस्थानांतील सर्व कोळयांचा समावेश होतो. इकडे पश्र्चिम किनाऱ्यावर खार्वा, कोळी व मच्छी असे त्यांचे निरनिराळे विवक्षित स्थानिक भेद झालेले असून विवक्षित ठिकाणी त्यांचा नामनिर्देश निराळा करतात. त्यांचे एकंदर जात्यंतरविवाहपद्धतीवरून ८ भेद केले आहेत तेः - ढीमर, खोटी, मिठना, साधारण, खार्वा, कोठी, नदीया, सोळंकी. पैकीं ढीमर दक्षिण गटांतले आहेत. व मच्छी लोकांप्रमाणें यांची बोलण्याची व्यावहारिक भाषा गुजराथी आहे. ठाणें व दक्षिण सुरतमधील मच्छी लोकसंख्येंत ढीमर लोक जास्त आहेत. मध्यप्रांत, मध्यहिंदुस्थान व पंजाबमध्यें कोळयांचा धंदा करणाऱ्या लोकांनांहि मच्छीच म्हणतात ('ढीमर' पहा). उत्तर सुरत भागांत खार्वा व कोळी लोक मुख्यत्वें असून सामाजिकदृष्टया खार्वा श्रेष्ठ समजले जातात. बलसाड भागांत मच्छी पुष्कळ असून त्यांच्या नांवांवरून मूळचे ते रजपूत असावे असें अनुमान काढण्यांत येतें. खार्वा लोकांशीं यांचा संबंध आहे. विधवेला दिराशीं लग्न करण्यास हरकत येत नाहीं. यांच्यात घटस्फोट संमत आहे. सुरत शहरांतील मच्छी लोकांत जर कांहीं तंटा उपस्थित झाला तर जातीची पंचायत भरवून पाटलाला अध्यक्ष करवून त्याचा निकाल करतात. ठाणें जिल्ह्यांतील मच्छी लोकांच्या खेडयांतून पंचायतसंस्था आहेत. (से. रि. (मुंबई) १९११)