विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंगोलिया- चीन. पूर्वेस किंघन पर्वतांपासून पश्र्चिमेस तर्बतगाई पर्वतापर्यंत हा अफाट देश पसरला आहे. याच्या उत्तरेस सैबिरिया व दक्षिणेस बाह्य कान-सु आणि इतर मुलुख (सिन-कियांगमधील) आहे. मंगोलियाचें क्षेत्रफळ सुमारें १८७५००० चौरस मैल असून लोकसंख्या सुमारें ७५०००० आहे. याच्या मध्यभागीं गोबीचें मैदान आहे. यांत भटके मोंगल व कालमक लोक राहतात. ते सुपीक प्रदेशांतहि शेती करीत नाहींत. पण कांहीं वर्षांपासून मंगोलियांत चीनमधील लोक येऊन राहूं लागले आहेत. त्यामुळें चीनच्या राज्यापासून हा विभक्त करतां येईनासा झाला आहे. आतर्मंगोलिय व चीनमधील प्रांताचे या शेजारचे भाग यांच्या राज्यकारभाराच्या सोयीकरितां तीन जिल्हे पाडण्यांत आले आहेत. व प्रत्येक जिल्हा चिनी सरकारनें नेमलेल्या तार्तर-जनरल्या ताब्यांत असतो. मुख्य शहर उर्गा असून तें कियाख्ताच्या दक्षिणेस १७० मैलांवर आहे. मंगोलियांतून बाहेर जाणारा माल म्हणजे लोंकर, कातडीं, शिंगें वगैरे आहे. उन्हाळयांत गोबीच्या मैदानांतून मोटारीतूंन वहातुक होते. बाह्यमंगोलियांत बऱ्याच सोन्याच्या खाणी सांपडल्या आहेत. पैकीं फारच थोडया चालू आहेत. १९१५ सालापासून मंगोलियाचें स्वतःचें चलन सुरू झालें आहे. बौद्ध लामासंप्रदाय येथे चालतो. येथें मंचुरियाचें वर्चस्व स्थापन होण्यापूर्वी मंगोल लोकांवर त्यांचेच संस्थानिक राज्य करीत. मांचु राज्य आल्यापासून या संस्थानांत फारसा फरक झाला नाहीं. या संस्थानिकांतून एक वरिष्ठ 'खान' निवडला जाई. आज मंगोलियाचा कारभार चीन सरकारनें नेमिलेल्या सुपरिटेंडेंन्सीच्या हातीं आहे. बादशाही एजंट उगा्र येथें असतो. मंगोलियाचा जुना इतिहास चीनच्या इतिहासांत समाविष्ट झाला आहे.
मांचू राजघराण्याच्या नाशापूर्वीपासूनच मंगोलियांतील मोंगल संस्थानिकांच्या मनांत चीनच्या लष्करी व वसाहतवाढीच्या धोरणाबद्दल द्वेषाग्नि धुमसत होता त्यामुळें रशियाच्या मदतीनें स्वतंत्र होण्याची आकांक्षा बाह्यमंगोलियामध्यें प्रबल होत चालली आहे. उर्गामधील चीनचा रेसिडेंट सांटो याच्या जुलमी कृत्यांमुळें या आकांक्षेला प्रत्यक्ष तोंड लागलें. मोंगल पुढाऱ्यांनीं हुतख्तु (जिवंत बुद्ध) याच्याभोंवती जमा होऊन चीनच्या जुलमी धोरणाच्या प्रतिकार करण्याचें ठरविलें. १९११ सालीं त्यांनीं रशियाकडे एक गुप्त हेराचें मंडळ पाठवून स्वातंत्र्यप्राप्तीकरितां रशियाची मदत मागितली. अंबन व इतर चिनी अधिकारी मंडळ यांची हकालपट्टी करण्यांत आली व हुतुख्तुला राजा निवडण्यांत आलें. व पांच मंत्र्याचें मोंगल सरकार उर्गा येथें स्थापन झाले. तथापि मोंगल पुढाऱ्यांमध्येंहि दोन प्रबळ पक्ष होतें. एकाला चीनशीं अजीबात संबंध नसावा असें वाटत होतें तर दुसऱ्या पक्षाला चीनशीं आपला तात्पुरता कां होईना पण संबंध रहावा असें वाटत असे. १९१२ सालीं बार्गुत लोकांनीं आपला व चीनचा संबंध तोडून टाकला व आपला मुलुख उर्गाच्या प्रदेशांत सामील केला. त्यानंतर आंतर्मंगोलियामध्यें बंड उद्भवलें पण तें चिनी सैन्यानें मिटवून टाकलें. याच सुमारास रशियन सरकारनें उर्गा येथील सरकारला व हुतुख्तूला अखिल मंगोलियाचा राजा म्हणून मान्यता दिली. एवढेंच नव्हें तर चीन सरकारनें मंगोलियावर स्वारी केल्यास मंगोलियाला मदत करण्याचें ठरविलें. या सहानुभूतीबद्दल रशियाला मंगोलियांतील पूर्वकालीं असलेल्या व्यापाराच्या सर्व सवलती मिळाल्या. यानंतर चीन, रशिया व बाह्यमंगोलिया या तिघांमध्यें खूप वाटाघाट सुरू होऊन शेवटीं चिनी सरकारनें बाह्यमंगोलियाला प्रांतिक स्वायत्तता दिली व त्याच्या ऐवजीं बाह्यमंगोलिया हा चिनी साम्राज्यामध्यें गणला जाऊं लागला. उर्गा येथें चीनचा रेसिडेंट नेमण्यांत आला. १९१२-१९१७ च्या दरम्यानच्या काळांत रशियानें बाह्यमंगोलियांतील आपले हितसंबंध दृढ तर केले, पण महायुद्धच्या अमदानींत बोल्शेव्हिाकंची सरशी झाल्यामुळें बाह्यमंगोलियाला आधार नाहींसा झाला. एवढेंच नव्हे तर जर्मन व बोल्शेव्हिक यांची स्वारीहि होण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं. त्याचप्रमाणें सेमेनाफ नांवाचा एक धाडसी पुरुष, रशियांतून पळून गेलेल्या कांहीं भाडोत्री सैन्यानिशीं बाह्यमंगोलियावर स्वारी करण्याचा विचार करीत होता. अशा स्थितींत बाह्यमंगोलियाला चीनकडे मदतीसाठीं याचना करण्याशिवाय गत्यंतरच उरलें नाहीं. चीननेंहि या संधीचा फायदा घेऊन मंगोलियानें प्रातिक स्वायत्ततेचे हक्क बिनशर्त सोडून चीनचें स्वामित्व कबूल करावें अशी मागणी घातली व ती बाह्यमंगोलियावर चीनचें स्वामित्व प्रस्थापित झाल्यावर चीननें त्याच्यावर जुलुम करण्यास सुरवात केली. त्यामुळें बाह्य मंगोलियांतील असंतुष्ट व त्रासलेल्या लोकांनीं रशियन व जपानी बाजारबुणग्यांच्या साहाय्यानें स. १९२० च्या आक्टोबरमध्यें उर्गायेथील चिनी सैन्यावर हल्ला केला. याचा प्रतिकार म्हणून चिनी सैन्यानेंहि उर्गांतील लोकांनां फार छळिलें. याचा परिणाम असा झाला कीं, १९२१ सालीं सर्व लोकांनीं चिनी सैन्याविरुद्ध संगनमत करून उर्गा येथील चीन सरकारला हांकलून लावलें. अशा रीतीनें स. १९२१ च्या फेब्रुवारीमध्यें हुतुख्तु हा मंगोलियाचा पुन्हां राजा झाला. रशियन बाजारबुणग्यांचा पुढारी बॅरन डंगर्न हा सेनापति झाला. हुतुख्तुनें मंगोलियामध्यें मोठें सैन्य उभारण्यास सुरवात केली. यावेळीं चीन सरकार कमकुवत असल्यामुळें हुतुख्तूशीं सामना देण्याची त्याची छाती झाली नाहीं व त्यामुळें हुतुख्तूशीं गोडीगुलाबीचे बोलणें लावण्यास चीननें सुरवात केली पण कांही केल्या मंगोलियाचें स्वातंत्र्य गमावण्यास हुतुख्तु तयार झाला नाहीं.