विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मगध- एक प्राचीन भारतीय राष्ट्र. बिहारमधील गयापाटणा व शहाबाद या जिल्ह्यांचा आज मगधांत समावेश होतो. या राज्यांत मौर्य व गुप्त हीं दोन सुप्रसिद्ध भारतीय राजकुलें उदयास आलीं. बौद्धसंप्रदाय व जैनसंप्रदाय या दोन बलाढय धर्मपंथांचें मगध हें माहेरघर होतें. पूर्वी त्याची राजधानी राजगृह असून नंतर पाटलीपुत्र झाली. संयुक्तप्रांतापर्यंत त्याचा विस्तार झालेला होता. गौतमाच्या वेळच्या बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी मगधांत घडल्या असून त्यावेळेस मगधाला फार महत्त्व आलेलें होतें. मगध राष्ट्राविषयीं वैदिक माहिती 'बुद्धपूर्व जग' विभागांत (पृ. २०९-२१०) सविस्तर आली आहे. मगधांतील राजघराण्याचा इतिहास 'बुध्देत्तरजग' विभागांत ९ व्या प्रकरणांत विस्तारानें दिला आहे. तेव्हां या ठिकाणीं मगध देशाच्या इतिहासाचा संक्षेप केला आहे. चंदगुप्त व अशोक यांच्या वेळेस मगध राज्य जास्त भरभराटीस आलें. अशोकानंतर मौर्य घराण्याचा ऱ्हास होऊन ख्रिस्ती शकापूर्वी १५० वर्षे कलिंग राजानें मगध जिंकलें. परंतु पुन्हां चवथ्या शतकांत कोणी गुप्त घराणें उदयाला येऊन मगधाचें गतवैभव फिरून परत आणले, इतकेंच नाहीं तर अलाहाबाद, कनोज व गुजराथपर्यंतचा प्रदेश मगधाला जोडला. सहाव्या शतकांत गुप्त घराण्याला ओहोटी लागली व मगधावर चालुक्य सत्ताधीश झाले. ९ व्या शतकांत बंगालच्या पाल घराण्यानें मगध बळकावून पुढें स. ११९७ त महंमद बखत्यार खिलजीनें पालांनां पदच्युत केलें, तेव्हां मगध दिल्लीच्या गुलाम राजांकडे आलें. कांहीं कालपर्यंत जोनपूरकडें मगध असून नंतर तो बहार प्रांताचा भाग बनला.
गया, पुनावान, गुणेरी, धरावात, कवडाल, जैतवन, सोनभांडार, नालंदा यांसारखीं बौद्ध संप्रदायाच्या उज्वल अवशेषांचीं ठिकाणें मगधांत आहेत. ससरण, मोंघीर व शेरगड या स्थळीं मुसुलमानी शिल्पांचे नमुने पहावयास मिळतात. गंगा व गंडकी यांच्या संगमावर स्नान करण्याकरितां जेथें मोठी यात्रा जमते तें प्रसिद्ध सोनपूरगांवहि या मगधांत आहे. ('कीकट' पहा)