विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मग (लोक)- प्राचीन पारशी धर्मांतील पुरोहितवर्ग. मग या शब्दाची व्युत्पत्ति प्राचीन इराणी 'मगु' संज्ञेपासून आहे. दरायसच्या बेहिस्तान शिलालेखांत याचा उल्लेख् आहे, पण सदरहू शिलालेखांत मगूचा अर्थबोध होत नाहीं. हिरोडोटस (१.१०१) ज्या सहा आर्यन ज्ञातिसंज्ञा देतो त्यांत ही एक येते.
पण मग हे प्रथम आर्येतर मूळ देशस्थ लोक असून पुढें आर्यांच्या वर्चस्वामुळं ते त्यांच्यांत समाविष्ट झाले असें कांहीं संशोधक समजतात. कांहीं असलें तरी मिडियन लोकांतील मग ही एक जात होती हें निश्चित आहे. मग हे इराणांतील आर्यन साम्राज्याच्या अमदानींत लोकांचे उघड उघड पुढारी होते. मगांचा धार्मिक दर्जा हिंदु ब्राह्मणांइतकाच पायरीचा होता. आरंभीं मगांनीं आर्यांचें इराणांतील राजकीय वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांत त्यांनां यश न आल्यानें ते स्वतःला इराणी लोकांचे धर्मगुरू म्हणवून घेऊं लागले. स्वतःच्या धर्माचें आर्यधर्माशीं साम्य दाखविण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. या कामीं आर्यधर्मांतील सूर्य व अग्नि यांची उपासना त्यांनां उपयोगी पडली. सूर्योपासनेच्या वेळीं दर्भमुष्टि (संस्कृति बर्हिस्-अवेस्ता बरेस्मन) तोंडापुढें धरण्याची आर्यांची चाल मागांनं उचललेली दिसते.
यावरून मगांच्या स्वतंत्र हालचालीचा इतिहास इसवी सनापूर्वी ५९१ पर्यंत मागें नेतां येतो. या सुमारास त्यांनीं जुडिया प्रांतांतील लोक आपल्या धर्मांत घेतले. त्याच कालांतील बाबिलोनचा इतिहास घेतला तर रब-मग यांचें नांव नेबुचाडनेसर याच्या अधिकारी वर्गांत असल्याचें आढळतें.
झरथुष्ट्री गाथांत 'मोठा पुरवठा करणारा मग' व 'बोहुमनोचा मग' असे उल्लेख आढळतात; शिवाय एक झरथुष्ट्री पंथाचा कवि मनाचीं अपवित्र कृत्यें सोडून देण्याविषयीं उपदेश करतो आहे ('बुध्देत्तर जग' पृ. २७ पहा), पण अवेस्तांत आजच्या मगियन मग लोक) अर्थांनें मग शब्द वापरलेला नसून शक्ति किंवा जादू या अर्थानें वापरलेला दिसतो. मगी व पारशी धार्मिक चालीरीतींत व विचारांत कांहीं महत्त्वाचे फरक आढळून येतात. मग पारशी धर्मांतील द्वैतमतवादी आहेत असें म्हणतां येईल. झरथुष्ट्राच्या गाथेंत द्वैतमतवाद दिसत नाहीं. मग अर्हिमनची प्रत्यक्ष पूजा करीत; असली पूजा अवेस्तांत कोठेंच आढळत नाहीं. यावरून असें दिसतें कीं मग,ओर्मझ्द व अर्हिमन यांच्यांत प्रत्यक्ष भेद असल्याचें दर्शवितात.
पण मग हे इराणी लोकांचें धर्मगुरू होते ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. मग लोक स्वप्नाचे अर्थ सांगत व भविष्यें वर्तवीत. त्यावेळीं मंत्रांचें (जादूटोण्यांचेंहि) फार प्राबल्य असल्यानें ते करणाऱ्यांच्या नांवावरून त्या क्रियेला 'मॅजिक' असें नांव पडलें. यापुढील मगांचा इतिहास झोरोआस्टरच्या सस्तानियन काळांतील इतिहासाबरोबर दृग्गोचर होतो. बायबलांत मगांचा उल्लेख आहे. हिंदुस्थानांत मगांचें अस्तित्व वैदिक लोक येण्यापूर्वीपासून असावें. मगध हा मगांचा देश होय (बुद्धपूर्वजग, पृ. २१० पहा) बृहत्संहिता व भविष्यपुराण यांतून मगांचे उल्लेख आहेत. मग ब्राह्मण आज जे दिसतात ते यांचेच वंशज होत. (या विषयाकरितां 'इराणचें सत्तावंर्धन' हें 'बुध्देत्तर जग' विभागांतील प्रकरण (३) नजरेखालीं घालणें उपयुक्त होईल.)