विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मॅक्समुल्लर (१८२३-१९००)- एक आंग्लो जर्मन भाषाशास्त्रज्ञ व संस्कृतज्ञ. याच्या बापाचें नांव वुइल्हेम मुल्लर असें असून, त्याची जर्मनींतील उत्तम वीणाकाव्यांचा कर्ता म्हणून ख्याति होती. मॅक्समुल्लची आई डेसौ येथील जहागिरीचे मुख्य प्रधान प्रसिडेंड व्हॉन बेसॅडौ यांची कन्या होती. सन १८४१ मध्यें प्रवेशपरीक्षा पसार झाल्यावर लिप्झिक विश्वविद्यालयांतील प्रो. ब्रोकेअस व बर्लिन येथील विश्वविद्यालयातील बॉप, शेलिंग तसेंच पॅरिसमधील बर्नूफ इत्यादि अनेक विद्वानांनीं मॅक्समुल्लर यास संस्कृत वाङ्मय व तत्संबंधीं तुलनात्मक भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्म, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादि विषयांचा अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन दिलें. १८४८ सालीं मुल्लर यानें ऑक्सफोर्ड येथें कायमची वस्ती केली.
१८५० सालीं त्याला अर्वाचीन यूरोपीय भाषांचा अध्यापक नेमण्यांत आलें. व १८५६ सालीं तो बोडलियन लायब्ररीचा व्यवस्थापक झाला. त्याच वर्षी त्याल एम. ए. ची पदवी देण्यांत येऊन ख्राइस्ट चर्च या संस्थेचा सन्माननीय सभासद करण्यांत आलें. १८७२ सालीं स्ट्रासबर्गच्या विश्वविद्यालयांत त्याचीं व्याख्यानें करण्यांत आलीं. १८९२ सालीं त्याला ओरिएंटल काँग्रेसचा अध्यक्ष केलें. १८९६ सालीं मॅक्समुल्लर यास प्रीव्ही कौन्सिलर नेमण्यांत आलें, आणि १९०० सालच्या आक्टोबर च्या २९ तारखेस तो मृत्यु पावला. तुलनात्मक भाषाशास्त्र, जगांतील धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व संस्कृत भाषा यांविषयीं महत्त्वाचें कार्य आणि ॠग्वेदसंहितेंचें संपादन या गोष्टी हीच मॅक्समुल्लरच्या आयुष्यांतील महत्त्वाची कामगिरी होय. प्राचीन वेदग्रंथांमध्यें विकास पावलेल्या हिंदूंच्या ईश्वरकल्पनेविषयीं मॅक्समुल्ल यास सूक्ष्म जाणीव झाली होती.
मॅक्समुल्लरनें केलेल्या उत्तम ग्रंथांपैकीं 'चिप्स फ्रॉम ए जर्मन वर्कशॉप' हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाचे तीन खंड असून त्यापैकीं पहिल्या खंडामध्यें ॠग्वेद, झेंदावेस्ता, ऐतरेय ब्राह्मण, बौद्धधर्म, सेमिटिक एकेश्वरी पंथ, इत्यादि विषयांवर व्याख्यानें आलीं असून, दुस-या खंडामध्यें तुलनात्मक दैवतशास्त्र हा एकच विषय आहे. तिस-या खंडामध्यें वाङ्मय, चरित्रें व प्राचीन वस्तू इत्यादींसंबंधीं विवेचन आले आहे. याहिपेक्षां मॅक्समुल्लरचे चरित्रात्मक निबंध हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुलनात्मक भाषाशास्त्राभ्यासाची त्याची आवड या ठिकाणी निदर्शनास येते. या ग्रंथांत राजा राममोहनराय, केशवचंद्र सेन, दयानंद सरस्वती, कोलब्रुक वगैरे महनीय व्यक्तींचीं चरित्रें आलीं आहेत. 'औल्ड लँग साइन्' या ग्रंथाचेहि दोन खंड असून त्यामध्यें पहिल्या खंडांत मॅक्समुल्लरशीं समकालीन अशा अनेक वाङ्मयाभ्यासी हिंदी व यूरोपीय पंडितांशीं झालेल्या भेटीचें प्रसंग, वाङ्मयलेखनकलेचें सर्वसामान्य विवेचन वगैरे मनोरंजक माहिती दिली आहे. हिंदुस्थानच्या दृष्टीनें दुसरा खंड अत्यंत मौल्यवान आहे. या खंडामध्यें मुख्यतः हिंदुस्थानसंबंधीं माहिती असून द्वारकानाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर, राधाकांत देव, नीलकंठ गोरे, केशव चंद्रसेन, रामतून लाहिरी, दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, बेहरामजी मलबारी, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी व गौरीशंकर उदय शंकर ओझा या सुप्रसिद्ध व्यक्तींची माहिती आली आहे. विशेषतः ब्रह्मो पंथांतील सुधारकांची मॅक्समुल्लर यास प्रत्यक्ष माहिती होती. रामकृष्ण परमहंस याजवर त्यानें लिहिलेलें पुस्तक पाहिलें असता भारतवर्ष व त्याची परंपरागत संस्कृति यांचा या पंडितावर किती परिणाम झाला होता हें स्पष्ट दिसून येतें.
मॅक्समुल्लरनें केंब्रिजच्या विश्र्वविद्यालयामध्यें दिलेल्या बहुमोल व मनोरंजक व्याख्यानांचें संकलन 'इंडिया; व्हॉट कॅन इट् टीच अस' या पुस्तकांत करण्यांत आलें आहे. यापैंकीं पहिल्या प्रकरणांत हिंदुस्थानसंबंधी थोडक्यात परिचय करून देण्यात आला असून सबंध दुसऱ्या भाषणांत हिंदु लोकांच्या हाडींमांसीं खिळलेले सत्याचार सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकंदर मानवजातीच्या सार्वत्रिक हितास संस्कृत वाङ्मयाचा कसा उपयोग होणार आहे याचा विचार तिसऱ्या प्रकरणात आला असून केवळ धर्म हेंच प्राचीन हिंदूंचें सार्वत्रिक अधिष्ठान कसें होतें हें दाखविलें आहे. मॅक्समुल्लरचा ''प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा इतिहास'' हा बहुमोल ग्रंथ तर भारतवर्षीयाच्या नित्य परिचयाचा झाला आहे. या ग्रंथांतील कलनिर्ययपद्धति जरी सदोष असली तरी त्यामध्यें मॅक्समुल्लरचा वेदवाङ्मयाशीं झालेला गाढ परिचय व सूक्ष्म अवलोकन वगैरे स्पष्टपणें दिसून येतात. ''षड्दर्शनें'' हा तर मॅक्समुल्लरचा एक सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे व त्यांतील किरकोळ दोष काढून टाकले तर अशा प्रकारचा हा ग्रंथ अद्वितीयच आहे असें म्हटलें पाहिजे. मॅक्समुल्लरचा अत्यंत आवडता विषय म्हटला म्हणजे धर्मकल्पना, भाषा, विचार व दैवतविज्ञान या गोष्टींचें तात्त्विक विवेचन करण्याचा होय धर्मकल्पनांची वाढ कसकशी होत गेली, यांचें तात्त्विक विवेचन करणारे तीन ग्रंथ मॅक्समुल्लरनें लिहिले. हे तीन ग्रंथ म्हणजे (१) फिजिकल रिलिजन, (२) ॲन्थ्रॉपॉलॉजिकल रिलिजन, व (३) सायकॉलॉजिकल रिलिजन हे होत. यांपैकीं पहिल्या पुस्तकामध्यें वेदग्रंथांतील विशेषतः ॠग्वेदांतील धर्माचें स्वरूप मुख्यतः सृष्टिपूजात्मक कसें आहे, त्याचप्रमाणें धर्मकल्पनाविकासाच्या तीन पायऱ्या नेहमी कशा समकालीन असतात इत्यादि मुद्दयांचें विवेचन आहे. या विवेचनांतील कांहीं भागाबद्दल मतभेद होण्यासारखा आहे. दुसऱ्या पुस्तकामध्यें इतर दोन पुस्तकांतील प्रमेयांचा सारांश देऊन त्यावरून असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे कीं, मनुष्याच्या मनांत प्रथम अशी कल्पना आली कीं या विश्वांतील प्रत्येक हालचालीस कोणीतरी प्रेरक असला पाहिजे, कारण कोणत्याहि भाषेंतील धातू हे मानवी क्रियेचे द्योतक असतात. तिसऱ्या पुस्तकामध्यें ईश्र्वर व जीव यांचें ऐक्य कशा प्रकारचें असतें याचा विचार केला असून, इंद्रियजन्य पुराव्यासंबंधीं संशय प्रदर्शित करूनच तत्वज्ञानास प्रारंभ कसा होतो याचें विवेचन आलें आहे. या ठिकाणीं मॅक्समुल्लरनें शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या तत्वज्ञानाची थोडक्यांत रूपरेषा दाखविली आहे. याच विषयासंबंधी मॅक्समुल्लरचें महत्वाचें आणखी एक पुस्तक ''इंट्रोडक्शन टु दि सायन्स ऑफ रिलिजन,'' हें होय. परंतु या सर्वांपेक्षां अत्यंत महत्त्वाचें मॅक्समुल्लरचा प्राच्यविद्यासंशोधन कार्याचें निदर्शक असें स्मारक म्हटलें म्हणजे ''दि सेक्रेंड बुक्स ऑफ दि ईस्ट'' ही सुप्रसिद्ध ग्रंथमाला होय. ह्या मालेच्या प्रकाशनास इ. स. १८७५ पासून सुरवात झाली, व ज्ञानकोशाप्रमाणें अत्यंत महत्त्वाच्या अशा या मालेच्या ५१ खंडापैकीं फक्त तीन खंडांस मॅक्समुल्लरची देखरेख लाभली नाहीं. हिंदुस्थान व प्राचीन हिंदुसंस्कृति यांबद्दलच्या मॅक्समुल्लरच्या सुप्रसिद्ध प्रेमामुळें, हिंदुस्थानामधून विलायतेस गेलेल्या लोकांस मुल्लरच्या आदरातिथ्याचा लाभ होत असे.