विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मक्का- हें अरबस्तानांतील मुख्य शहर व मुसुलमानी धर्माचें पवित्र क्षेत्र आहे. तांबड्या समुद्राच्या किना-यावर असलेल्या जेद्दा शहराच्या पूर्वेला सुमारें ५ मैलांवर हें शहर आहे. मक्का हें पहिल्यापासून व्यापाराचें मध्यवर्ती ठिकाण असलें पाहिजे. महंमदापूर्वीं तें व्यापाराकरितां व यात्रेचें ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतें. मुसुलमानी धर्माच्या विजयाबरोबर मक्का शहराचें महत्त्व वाढलें. तेथील मोठाले व्यापारी साम्राज्याचे सत्रप अथवा पेन्शनर होऊन बसले. इब्नझुबेरच्या मरणानंतर येथील धर्म व राजकीय सत्ता नष्ट झाली. काबा हें अतिशय पवित्र स्थान गणलें गेलें व लांबलांबचे यात्रेकरू मक्केस येऊं लागले. यात्रा हेंच मक्केचें फार महत्त्वाचें व्यापारी साधन झालें आहे. मक्केचे लोक जागा भाड्यानें देणें, वाटाड्याचा धंदा करणें, धर्मकृत्यांत मदत करणें इत्यादि गोष्टींवर निर्वाह करतात.
मक्का शहर एकंदरींत रमणींय असून रस्ते साधारण रुंद आहेत. घरें दगडांचीं बांधलेलीं असून कांहीं चार, पांच मजली आहेत. स्नानगृहें, हिंदुस्थान व जावा या ठिकाणाहून येणा-या यात्रेकरूंसाठीं सदावतें, रूग्णालयें व अन्नछत्रें इत्यादि सार्वजनिक संस्था येथें आहेत. मक्का येथील कायमची वस्ती ५०००० पासून ६०००० पर्यंत असावी. येथें पाण्याचा पुरवठा चांगला आहे.
मुसुलमानी मध्यवर्ती सत्ता नाहींशीं झाल्यानंतर या ठिकाणीं वेगळे तट, लढाया इत्यादि गोष्टींमुळें बरीच अशांतता होती. इ. स. ९३० सालच्या यात्रेच्या वेळेला कारमाथियन लोकांनीं मक्का शहर लुटून फस्त केलें. फातिमा वंशातील सुलतानांच्या वेळेला ईजिप्शियन लोकांचा अंमल येथें दृढ होऊं लागला होता. आबासी वंशाचा -हास झाल्यानंतर ईजिप्तचें वर्चस्व प्रस्थापित झालें. तुर्कांनीं ईजिप्त जिंकल्यावर ओटोमन सुलतानांच्या (१५१७) ताब्यांत मक्का येऊन त्यांनीं देवळे, पवित्र स्थानें इत्यादि बरींच लोकोपयोगी कामें केली. ओटोमनसत्ता हळूहळू कमी होऊन अमीर अथवा शेरिफ यांची सत्ता वाढतच चालली. शेवटीं घालिबच्या अंमलाखालीं सत्ता अतिशय वाढली (१७८६). नंतर वहाबी युद्धाला सुरवात होऊन महामदअल्लीनें तुर्की सत्ता पुन्हां स्थापिली. गेल्या महायुद्धांत मक्केचा शेरीफ हुसेन ब्रिटिशांच्या बाजूचा होऊन त्यानें सुलतनाचा अम्मल झुगारून दिला व हेजाझचा स्वतः राजा बनला ('अरबस्तान' पृ. ३९८, पहा.) महायुद्धनंतर हेजाझला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळाला. १९२४ च्या आक्टोबर महिन्यांत वहाबीं लोकांनीं मक्का काबींज केलें व आज मक्का त्यांचा पुढारी व नेज्दचा सुलतान इब्न सौंद याच्या ताब्यांत आहे.
मो ठी म शी द व का बा- महंमदापूर्वीं मक्का येथील पवित्र देवस्थान काबा हेंच होय. महंमदानें यांतील मूर्ती फोडून इस्लामी धर्माकडे काबा देवस्थान उपयोगांत आणिलें. येथील पूजेचा मुख्य विषय म्हणजे एक काळा दगड आहे. याचा इतिहास असा सांगतात कीं हा गॅब्रिएलेंन अब्राहिमास दिला होता. काबाच्या उत्तरेला डारएल अथवा कुरेश लोकाची जमण्याची जागा आहे. काबाच्या खालोखाल महत्त्वाच्या इमारती म्हणजे झमझम व मॅकम इब्राहिम या मशिदी होत.
सफा आणि मरवा:- या नांवाच्या दोन टेंकड्या आहेत, आणि धर्मासंबंधीं त्यांचा मान काबाच्या खालोखाल आहे. इस्लामी धर्माच्या पूर्वींपासून मक्का हें स्थानिक यात्रेचें पवित्र ठिकाण होतें. मुसुलमानांत एक वेळ मक्केची यात्रा करून भागत नाहीं, तर दोन वेळां करावी लागते. पहिली ओमरा अथवा मक्केची यात्रा करण्याचा नवस व दुसरी हाज अथवा वार्षिक मोठ्या मेजवानीच्या वेळची यात्र. मक्केची यात्रा करणा-याला हाजी म्हणतात.