विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भोज- या नांवाचें एक राष्ट्र व जाति प्राचीनकाळीं होती. यादवांपैकींच हे भोज होते. त्यांचे राज्य व-हाडांत एलीचपूरच्या बाजूस होतें; सांप्रत तेथें भोजकट नांवाचें एक गांव असून तें रूक्मिणीच्या रूक्मी नांवाच्या भावानें वसविलें असें सांगतात. व-हाडासच त्याकाळीं भोज हें नांव होतें. महाभोज, कुंतिभोज हीं घराणीं महाभारतकाळीं होतीं. ते अवन्ति व मध्यदेशांत रहात असत; यांनींच श्रीकृष्णाच्या वृष्णिकुळास द्वारकेपर्यंत मागें हटविलें. चंपूरामायणाचा कर्ता विद्वान भोज राजा हा या रूक्मी भोजाचा वंशज होता. श्रीरामाचा आजा तो अज त्याची बायको इंदुमति ही भोजकुलांतील (व-हाडच्या) होती. अशोकाच्या लेखांत पैंटनिक, पुलिंद वगैरे लोकांबरोबरच भोजांचाहि उल्लेख आलेला आहे. महाराष्ट्रांतहि भोज नांवानें युक्त अशीं गांवें आढळतात. नाशिक जिल्ह्यांतील भोजपूर गांवीं एक लेणें असून तेथें कांचेचा कारखानाहि होता. बेळगांव जिल्ह्यांतील भोजपूर गांवीं एक रट्टाचा ताम्रपट सांपडला होता. माळव्याचा भोजराजा प्रख्यात आहे, त्याची माहिती 'धार' या शब्दाखालीं (ज्ञानकोश वि. १६) आली आहे. (बाँबे ग्याझे. पु. १६; फ्लीट-कानडीज डिनॅस्टीज; भागवत; इंडि. अँटि. पु. ५; व-हाडचा इतिहास.)