विभाग आठरावा : बडोदें ते मूर         
 
भेडा, त ह शी ल.- पंजाब. शाहपूर जिल्ह्यांतील एक तहशील. क्षेत्रफळ ११५१ चौरस मैल. हिच्या उत्तरेस झेलम व आग्नेयीस चिनाब या नद्या आहेत. लोकसंख्या (१९११) २३०५०७. हिच्यांत गांवें दोन व खेडीं ३४६ आहेत.

गांव.- भेडा तहशिलीचें मुख्य ठिकाण. हें गांव झेलम नदीच्या डाव्या तीरावर आहे. हें नार्थ-वेस्टर्न रेल्वेच्या भेडा शाखेचें शेवटचें स्टेशन आहे. लोकसंख्या (१९०१) १८६८०. हें गांव महंमद गिझनीनें व चेंगीझखानानें लुटलें. हें अलेकझांडर बादशहाच्या वेळीं झेलम नदीच्या उजव्या तीरावर होतें व येथें सोफायरीजची राजधानी होती असें कनिंगहेंमचें मत आहे. १५१९ सालानंतर थोड्याच वर्षांनीं या गांवाचा नाश येथील रानटी लोकांच्या टोळ्यांनीं केला.

सन १५०० मध्यें नवीन गांवाचा पाया एका मुसुलमान साधूच्या कबरीजवळ घालण्यांत आला. अकबराच्या वेळीं हें गांव महालांतील मध्यवर्ती स्थान होतें. १७५७ सालीं हें गांव अहंमदशहा अबदालीच्या सेनापतीनें लुटलें. शीख लोकांच्या भंगी संघटना नायकानें येथें वस्ती केली. इंग्रजी राज्यांत हें गांव भरभराटीस आलें आहे. हें गांव व्यापाराचें मुख्य ठाणें झालें आहे. कराची व अमृतसर येथून विलायती माल काबुलास या गांवांतून रवाना होतो. येथें सु-या व जंबिये तयार करतात. १८६० सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें एक हायस्कूल आहे.