विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भृगु- एक वैदिक ॠषि. ॠग्वेदांत हा शब्द अनेकवचनी येतों. अगदीं क्वचित एकवचनामध्यें येतो. ॠग्वेदांत अग्नि सूत्तचंमध्यें भृगूंचा वारंवार उल्लेख येतो. पृथ्वीवर अग्नि आणण्याचें काम भुगूंनीं केलें असें या सूक्तांत म्हटलेलें आहे. याशिवाय, रथ तयार करणारे असेंहि विशेषण त्यांनां दिलेलें आढळतें. अंगिरस्, अथर्वन, ॠभू यांच्याबरोबर यांचा नेहमीं उल्लेख करण्यांत येतो. सातव्या मंडळांत भृगूंनां सुदास राजाचे मांडलिक असेंहि म्हटलेलें आढळतें. अथर्ववेदांत भृगूंचा चारदां उल्लेख झाला आहे, त्यांपैकीं एकांत, भृगूला त्रास दिल्याबद्दल सृंजय व वैतहव्य हे नाश पावले असें म्हटलें आहे. ऐतरेयब्राह्मणांत भृगु हा ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाला असें म्हटलें आहे. महाभारतांतहि तसाच उल्लेख आढळतो. महाभारतांत दुस-या एका स्थलीं, भृगु हा ब्रह्मदेवाच्या हृदयापासून उत्पन्न झाला असें म्हटलें आहे, तर भागवतपुराणांत भृगु हा त्याच्या अंगापासून निर्माण झाल्याचा उल्लेख आहे. तैत्तिरीय आरण्यकांत व महाभारतांत एके ठिकाणीं वरूणानें भृगूला पुत्र मानल्याची कथा आहे. भृगूची प्रजापतींमध्यें व महर्षीमध्यें गणना केलेली प्राचीन ग्रंथांत आढळून येते. भृगूच्या वंशाला भार्गव हें नांव असून त्यामध्यें जमदग्नि, परशुराम अशा प्रकारचे तेजस्वी ब्राह्मण उत्पन्न झाले. मनुस्मृतींत मनूनें भृगूला पुत्र मानलें असून त्याच्या हवालीं आपला स्मृतिग्रंथ केला असें वर्णन आहे. नहुषाच्या त्रासापासून अगस्त्य ॠषीला भृगूनें सोडविल्याची कथा आहे. ब्रह्मा, विष्णु व महेश यांपैकीं कोणती देवता श्रेष्ठ यासंबंधीं ॠषींमध्यें मतभेद झाला असतां त्यांनीं भृगूला त्या देवांकडे प्रत्यक्ष जाऊन त्यांची परीक्षा करून हा वाद मिटविण्यास सांगितलें व शेवटीं भृगूनें विष्णु ही देवता सर्वांत श्रेष्ठ असा निकाल दिल्याचें पद्मपुराणांत सांगितलें आहे. भृगु हा शब्द भृज्जति = भाजणें या धातूपासून निघाला असें यास्कानें म्हटलें आहे. महाभारतांत अग्नि पेटला असतांना जो आवाज निघतो त्याच्यावरून हा शब्द निघाला असें म्हटलें आहे. भृगु हें अग्नीचेंच नांव आहे असें बर्गायने प्रतिपादन करतो तर कुहनच्या मतानें भृगु म्हणजे विद्युतची देवता होय.