विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भूषणकवि– हा शिवाजीच्या पदरचा एक आश्रित भाट, असून जातीचा कनोजा ब्राह्मण होता. बापाचें नावं रत्नाकर. यमुनाकांठच्या त्रिविक्रमपूरचा हा रहिवाशी होता; हें गांव हल्लीं कानपूर जिल्ह्यांतील टिकमपूर होय भूषणाला चिंतामणि, मतिराम व जटाशंकर उर्फ नीळकंठ हे तीन भाऊ होतें; याचें आडनांव त्रिपाठी. चिंतामणी हा नागपूकर मकरंदशहा या गोंडराजाच्या पदरीं होता, शहाजहानानें त्याला देणगी दिली होती. भूषणकवि प्रथम छत्रसाल राजाच्या पदरीं होता. तेथून सन १६६४ त तो शिवाजीपाशीं येऊन राहिला. यवनांची नोकरी करण्याचा त्यास मोठा तिटकारा वाटत असे. हिदुस्थानांतील निरनिराळ्या राज्यांतील स्थिति व व्यवस्था भूषणकवीकडुन शिवाजीला कळे. शिवराज- भूषण- काव्य या ग्रंथांत शिवाजीच्या प्रतापाचें सुरस वर्णन यानें केलें आहे. हें काव्य राज्यभिषेकाच्या आदल्या वर्षीं पुरें झालें. शिवाजीनें भूषणकवीस पुष्कळ द्रव्य दिलें. भूषणहजारा, भूषणउल्लास व दूषणउल्लास असे याचे आणखी ग्रंथ आहेत. याचा धाकटा भाऊ मतिराम हा संभाजीच्या पदरीं होता. (का. इ. सं. पु. शि .भू काव्य, प्रस्तावना)